Saturday, 7 September 2019

दात्यांचा पुढाकार, वंचितांना मदत

संतोष काकडे मूळचे कोल्हापूरचे, पण आता कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाले आहेत. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेकरता लागणारी औषधं, वैद्यकीय साधनं आणि उपकरणं विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. पूर आला आणि आपल्या जन्मगावाशी जोडलेली नाळ त्यांना स्वस्थ बसू देईना. संतोष यांनी मदतीचं सामान स्वतः पूरबाधित भागात घेऊन जाण्याचं ठरवलं. त्यांनी चटकन याकरता दोन पातळ्यांवर काम करायला सुरूवात केली.
पहिलं, त्यांनी त्यांच्या कोल्हापुरातील मित्रांशी संपर्क साधून कोणत्या भागात किती नुकसान झालंय आणि तातडीने आवश्यक बाबी यांची माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी सांगलीतील सतीश पाटील या मित्राची मदत झाली. दुसरं, त्यांनी चार माणसांच्या कुटुंबाला चार दिवस दोन वेळचं जेवण आणि नाश्ता याकरता तांदूळ, डाळी, ज्वारी-गव्हाचं पीठं, तेल, मीठ, मसाला याप्रकारचे जिन्नस किती प्रमाणात लागतील याची यादी बनवली. या एका किटला किती खर्च येईल याचा होलसेल बाजारात जाऊन अंदाज घेतला. त्यांना शक्य होईल तितक्या कुटुंबांना त्यांनी ही किट देऊन मदत करण्याचं ठरवलं. हे काम करत असतानाच संतोष यांनी सोसायटीत राहणाऱ्या संदीप देशपांडे आणि मिलिंद कुलकर्णी या दोन मित्रांनाही आपल्या योजनेबद्दल सांगितलं. या दोघांनाही संतोष यांची कल्पना आवडली.  
संदीप यांनी लगेचच त्यांच्या जवळच्या व्यक्तींचा एक ग्रुप बनवून त्यांना त्यांच्या या योजनेची माहिती दिली. ‘मदत स्वतः घेऊन गरजूंपर्यंत पोहचवणार’ आणि ‘सामानाची किट’ यामुळे त्यांना लगोलग ग्रुपमधून प्रतिसाद मिळू लागला. या एका किटला किती खर्च येईल हेही ग्रुपमध्ये सांगण्यात आलं. यामुळे मदत करावीशी वाटतेय पण आपली मदत नक्की गरजूंपर्यंत पोहचेल का ही शंका असणारे किंवा वेळेअभावी प्रत्यक्ष जाऊन मदत करता येत नाही अशा लोकांनी पटापट संपर्क साधला. आर्थिक मदतीसोबतच इतर सामानाचीही मदत करण्याची तयारी लोकांनी दाखवली. एका व्यक्तीने सॅनिटरी पॅड तसेच प्रायमरी हेल्थ किट ज्यात अँटी डायरिया टॅब्लेट, पॅरासिटेमॉल, पेन किलर यासारखी औषधं द्यायची तयारी दाखवली. आणखी एका व्यक्तीने विद्यार्थ्यांकरता वह्या आणि पाचशे पेनं देत असल्याचं सांगितलं. ग्रुपमधील प्रत्येक जण आपापला खारीचा वाटा उचलत होतं. या ग्रुपमधील सदस्यांच्या परिचयाच्या लोकांना कळल्यावर त्यांच्याकडूनही मदत येऊ लागली. विशेष म्हणजे हा ग्रुप बनल्यावर दहाच मिनिटांत संतोष यांच्या बँक खात्यात दुबईतून पाच हजार रुपये जमा झाले. संतोष यांच्या नातेवाईकाचे मित्र, मूळचे कर्नाटकतले पण सध्या दुबईत राहणारे रिझवान यांनी ही मदत केली. 12 ऑगस्टला हा ग्रुप बनला केवळ 48 तासांमध्ये 70 हजार रुपये आणि सर्व साहित्य जमा झाले.
संतोष यांची आता टीम बनली, कामाची विभागणी झाली. स्वयंपाकाच्या सामानाचं किट बनवणं, प्रायमरी हेल्थ किट बनवणं अशी कामं पटापट हातावेगळी होऊ लागली. संतोष आणि त्यांच्या टीमने स्वयंपाकाच्या जिन्नसाची सव्वाशे किटची व्यवस्था केली. कोल्हापूरच्या मित्रांकडून माहिती घेणं सुरूच होतं. पूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिरोळ तालुक्यात ही मदत करण्याचं पहिलं ठरलं. कवठेसार गावात मदत पोहोचवायचं ठरवलं. फार्मा क्षेत्रात असल्यामुळे संतोष यांचा या सर्व भागात चांगला संपर्क आहे. त्या लोकांकडून संतोष यांना सतत माहिती मिळत होती. कवठेसार गावात प्रचंड प्रमाणात मदत आल्यानं, आपली मदत अतिरिक्त ठरेल याचा संतोष आणि त्यांच्या टीमला अंदाज आला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरिल हासूर गावात मदत पोहोचली नसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी हासूरमध्ये मदत पोहोचवण्याचे ठरवले.
वेगवेगळ्या भागातून वैयक्तिक आणि संस्थांमार्फत पूरबाधित क्षेत्रात मदतीचे ट्रक निघत होते. सर्व परिसरातील मदतीचा आढावा संतोष घेत असताना त्यांना एक अत्यंत खेदजनक गोष्ट कळली. काही पूरग्रस्त दमदाटी करून त्यांच्या गावच्या रस्त्यावरून जाणारे मदतीचे ट्रक अडवून, सर्व सामान जबरदस्तीने उतरवून घेत होते. त्यांना मदत मिळाली असतानाही इतरांकरता असणाऱ्या मदतीचे ट्रक पुढे जाऊन देत नव्हते. कित्येक जण साठा करत होते. त्यामुळे कित्येक गरजवंतांपर्यंत मदत वेळेत पोहचत नव्हती. कित्येक महापालिका कर्मचाऱ्यांनीही मदतीचं सामान लाटलं. त्यांच्यावर आता कारवाई होत आहे. त्यामुळेच मदत घेऊन जात असताना दक्ष राहण्याची जबाबदारी आणखी वाढल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
15 ऑगस्टला सकाळी मदतीचा ट्रक पुण्यातून निघणार असं ठरलं होतं. हासूरच्या गावकऱ्यांशी संपर्कही साधला. पण नेमकं 14 तारखेला रात्री संतोष यांचा मुलगा तापाने फणफणला. त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. संतोष यांचा जीव कासावीस होऊ लागला. एकीकडे मुलगा तर दुसरीकडे मदत पोहोचवण्याची धडपड अशा ताणात संतोष होते. मुलाला शुक्रवारी संध्याकाळी रूग्णालयातून सोडलं. त्यांनी लेकीला मुलासोबत बसवून शनिवारी पहाटे पत्नीसोबत हासूर गावाकडे कूच केली.
गावात पोहोचल्यावर संकटाच्या परिस्थितीतही हासूरच्या गावकऱ्यांनी त्यांच्यातील समंजसपणा आणि व्यवस्थापन खूप छानपणे टिकवून ठेवल्याचं संतोष आवर्जून नमूद करतात. हासूर गावात लोकवर्गणीमधून एक कम्युनिटी हॉल बांधण्यात आला आहे. या हॉलच्या एका भागात गावाला मिळत असलेली मदत एका रांगेत पद्धतशीरपणे जमा करून घेण्यात आली होती. नवीन येणारी मदत घेण्याकरता महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगा करण्यात येत होत्या. मदत घेणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची नोंद गावातीलच स्वयंसेवक एका नोंदवहीत करत होते. जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला समान मदत मिळेल आणि न्यायही. गावातल्या लोकांच्या सौजन्याची आणखी एक प्रचिती संतोष यांना आली. आपल्याला मदत करणाऱ्या येणारी लोक खूप लांबून आल्याची जाणीव गावकऱ्यांना होती. दोन-तीन दिवसात आता ते जरा सावरले होते. मदत घेतल्यानंतर मिळालेल्या मदतीमधूनच येणाऱ्या लोकांच्या चहाची आणि पोह्यांची व्यवस्था हे गावकरी करत होते. इथं माणुसकीचं अनोखं दर्शन घडत होतं.
संतोष यांनी गावच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला. मुख्यध्यापक त्यांना म्हणाले, विद्यार्थ्यांना जूनमध्ये सांगितलेल्या वह्या मिळायला इथं ऑक्टोबर उजाडतो. आता विद्यार्थ्यांकडे ना वह्या आहेत, ना पाठ्यपुस्तक त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर खूप बिकट परिस्थिती असणार आहे. आता संतोष यांचा पुढील उपक्रम या गावातली शाळा उभारणं हा आहे. त्यांनी कोल्हापूरातल्या त्यांच्या गणेश मंडळाशी संपर्क साधून यंदा गणेशोत्सव साधेपणानं करण्याचं सांगितलं आहे. हे मंडळ बाहेरुन वर्गणी गोळा करत नाहीत. मंडळाचे सदस्यच आपापसांत वर्गणी गोळा करून देखावा, कार्यक्रम सादर करून उत्सव साजरा करतात. या मंडळाकडून यंदा जमा झालेली वर्गणी हासूरच्या शाळा उभारणीकरता खर्च करण्यात येणार आहे. आपला उद्देश चांगला असेल तर लोकं आवर्जून मदत करतात असा विश्वास संतोष यांना आहे. त्यामुळेच त्यांच्या या उपक्रमाला लोक मदत करतील अशी आशा संतोष यांना आहे.
शब्दांकन – साधना तिप्पनाकजे 

No comments:

Post a comment