Saturday, 7 September 2019

टोलीवरचे दोन हिरो

नागपूर शहर. इथलं राहाटेनगर. हाच भाग रहाटे टोली म्हणूनही ओळखला जातो. जवळपास शंभर वर्ष जुनी असलेली ही मांग-गारुडयांची वस्ती. येथील लोकांकडे आजही स्वतःची ओळख पटवून देता येईल असा एकही पुरावा नाही. शासन दरबारीसुद्धा त्यांची नोंद नाही. मग मुलांचे भविष्य कसे असेल, ते कसे जीवन जगत असतील हे विचारायलाच नको.
खुशाल ढाक व नागेश मोते हे दोन मित्र इथल्या मुलांचं आयुष्य घडावं म्हणून झटत आहेत. मागील 14 वर्षापासून कोळशाच्या खाणीतून हिरे शोधून काढण्यात गुंतले आहेत. खुशालचं एमए.बी.एड. झालेलं असून एका खाजगी कंपनीत ते कम्प्युटर आपरेटर आहेत. तर नागेश नगरसेवक आहेत.
खुशालला शिक्षक व्हायचं होतं. मात्र डोनेशन अभावी ते स्वप्न मागे पडलं. परंतु त्यांच्या आईने हातात ब्लॅकबोर्ड व चॉक देऊन ‘जा, हो शिक्षक’ म्हणून खुशालचे ख-या अर्थाने शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. वयाच्या 14 व्या वर्षीपासून यशवंत स्टेडियम परिसरात एका हॉटेलात कपबश्या धुण्याचं काम करता करता फूटपाथवरील मुलांना शिक्षणाचं दान देऊन खुशालने सुरुवात केली होती. आज हेच काम मोठया प्रमाणात विकसित झाल्याचं चित्र राहाटे टोलीमध्ये बघायला मिळत आहे.
खुशालने शिक्षणासोबत मुलांमध्ये खेळण्याची रुची वाढवली आहे. मुलं खेळांमध्ये एकाग्र होऊन व्यसनापासून दूर राहतात. त्याने या मुलांना फुटबॉल व क्रिकेटचं प्रशिक्षण देणं सुरू केलं आहे. त्यांनी एक फुटबॉल टीम बनवली असून ही टीम झोपडपट्टी लीग फुटबॉल मॅचेसमध्ये सेमी फायनलपर्यंत पोहोचली आहे. या टीमला जर्मनीचे मार्मीन नावाचे प्रशिक्षक आठवडयातून दोन दिवस प्रशिक्षण देत असतात. येथील मुलीही खेळात पुढं आहेत. ही मुलं मोठी होऊन डॉक्टर, पोलीस, शिक्षक बनण्याचं स्वप्न बघत आहेत. खुशालने फुटबॉलच्या माध्यमातून एका विद्यार्थ्यांला नेवीमध्ये तर 2 विद्यार्थ्यांना सीआरपीएफ व इतर ठिकाणी नोकरी मिळवून देण्यात यश मिळविलं आहे.
चार हजार लोकवस्ती असलेला हा समाज स्त्री प्रधान आहे. या समाजातील स्त्रिया कामाला जातात तर पुरूष घर सांभाळतात. फुगे विकणं, कचरा व भंगार गोळा करणं असा त्यांचा नित्यक्रम. टोलीवरील समाज पूर्वीपासूनच गून्हेगारी व व्यसनामध्ये गुरफटलेला. यातून बाहेर पडण्याची समाजाची इच्छा आहे, परंतु हाताला काम नाही वा दुसरा उद्योग नाही. त्यासाठी अडचण म्हणजे शासकीय कागदपत्रांची! त्यांच्याकडे साधा जन्मदाखला नाही. अशा या कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊनही मुलं बेरोजगारीच्या वाटेला लागून गुन्हेगारीकडे वळली आहेत. या सर्व समस्यावर उपाय म्हणून खुशालने आपली नोकरी सोडून त्यासाठी उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला आहे. तर नागेश मोते हे आपल्या पदाचा वापर करत वस्तीतील लोकांची कागदपत्रं बनवण्यासाठी शासकीय दरबारी खेटे घालत आहेत. खुशाल आणि नागेशच्या प्रयत्नांमुळे वस्तीत सिमेंट रोड, वीज, पाणी आणून वस्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या आहेत.
- निता सोनवणे, नागपूर

No comments:

Post a comment