Saturday 7 September 2019

हडप्पा म्हणजे काय ? ( इतिहासात डोकावताना )

हडप्पा शब्दाभोवतीच एक वलय आहे. जादू आहे. मला आठवतंय, शाळेत असताना सहावीत मला ‘हडप्पा संस्कृती’ अशा नावाचा एक धडा होता. मला तो धडा इतका आवडायचा की मी जेवता जेवता देखील तो सतत वाचायचे. त्यात वर्णन केलेले ते काटकोनी रस्ते, खेळण्यातल्या बैलगाड्या, उत्खननात सापडलेला साधू पुरुष, सार्वजनिक न्हाणीघर याबद्दल वाचायला भारी मजा यायची. परंतु शहर गाडलं गेलं म्हणजे नक्की काय झालं ते काही समजायचं नाही. भयंकर कुतुहूल तेवढं वाटत राहायचं. सहावी संपली आणि कुतुहूल संपलं. पुढे अनेक वर्षांनी पुरातत्त्वशास्त्र शिकताना लहानपणी पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. 
संशोधनावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावली तयार करताना लहानपणची ही आठवण परत एकदा वर आली. आणि हडप्पा संदर्भात एक फारच वेगळा आणि थक्क करणारा अनुभव आला. भीमाशंकराच्या पायथ्याशी असलेल्या खांडस या गावातल्या शाळेमध्ये मी प्राथमिक प्रश्नावली घेऊन गेले होते.
प्रश्नावलीत एक प्रश्न हडप्पा संदर्भात होता. पुरातन स्थळं असलेल्या जागांवर खूण करायची होती. पाच पर्याय होते : शनिवार वाडा, रायगड, हडप्पा, तुमच्या शाळेची इमारत आणि १५० वर्ष जुना वाडा. जवळ जवळ १००% विद्यार्थ्यांनी हडप्पावर खूण केली होती. नंतर मी विद्यार्थ्यांशी सहजच गप्पा मारायला लागले. ही एक पद्धत मी संपूर्ण पीएचडीच्या काळात अवलंबवली. प्रश्नावली भरून घेतल्यानंतर मुलांशी त्याबद्दल चर्चा करणे. कारण बरेच वेळा प्रश्नावलीत दिलेली उत्तरं ही एकमेकांची बघून आणि घोकून पाठ केलेल्या माहितीच्या आधारे दिलेली असतात. त्यामुळे काही ठराविक प्रश्नांबद्दल मी नेहमीच चर्चा करायचे. जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांनी हडप्पावर खूण केलेली बघून मी हडप्पाबद्दलच बोलायचं ठरवलं. मग सहजच मुलांना विचारलं की हडप्पा म्हणजे काय आहे. बऱ्याच वेळ वर्गात पूर्ण शांतता. कोणीही बोलायला तयार होईना. मला वाटलं मुलं बुजत असतील. उत्तर तर त्यांना माहितीये. प्रश्नावलीमधून तसं अगदी स्पष्ट दिसत होतंच की. जरा वेळाने एका मुलाने हळूच हात वर केला. तो म्हणाला "हडप्पा म्हणजे ना हाडांचा चुरा सापडलाय कुठेतरी एका पोत्यात". हे उत्तर अतिशय अनपेक्षित होतं. मी फारसं काही बोलले नाही. मग अजून दोन तीन जणांनी हात वर केले. कोणी म्हणालं “हडप्पा म्हणजे एक सोन्याच्या पैशांनी भरलेला घडा आहे.” कोणी म्हणालं “हडप्पा म्हणजे हाडांची हत्यारं आहेत.” कोणी म्हणालं “हडप्पा नावाच्या गुहा आहेत लांब कुठेतरी.” हे बराच वेळ चाललं. मुलं त्यांच्या कल्पनाशक्तीला सुचतील अशी अचाट उत्तरं देत होती. नंतर मी त्यांना हडप्पा कुठे आहे असं विचारलं. त्यावर देखील पुणे, दिल्ली, कन्याकुमारी ते यवतमाळ अशी नानाविध उत्तरं आली. मग पुढचा प्रश्न हडप्पाच्या काळाविषयी होता. मग तर वर्गात एकच गोंधळ उडाला. ५० वर्षांपूर्वीपासून ते ३०० वर्षांपूर्वी पर्यंत अशा विविध उत्तरांच्या आवाजाने अख्खा वर्ग दणाणून गेला.
ह्या गप्पांकडे परत एकदा नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येईल की ह्यामध्ये अनेक छोटे छोटे मुद्दे आहेत. हडप्पाविषयी एक स्वतंत्र धडा असून मुलांना हडप्पा म्हणजे काय ते नीटसं कळलेलच नाहीये. ह्याचं मुख्य कारण हे इतिहासाच्या पुस्तकांमधील चित्रांचा अभाव हे आहे. जमिनीखाली गाडलं गेलेलं गाव आणि कालांतराने तेथे झालेलं उत्खनन मुलांच्या सहज डोळ्यासमोर उभं राहणं अशक्यच आहे. म्हणूनच मग त्यांनी त्या नावाचा त्यांना जमेल आणि सुचेल असा अर्थ लावलाय. मुदलात हडप्पा म्हणजे नक्की काय आहे तेच न समजल्यामुळे बाकीची सगळीच माहिती आणि तपशील हे संदर्भांहीन ठरलेत मुलांसाठी. काळाच्या बाबतीतही तेच आहे. इतक्या लहान वयात त्यांना २०००, ३००० वर्षांपूर्वीचं काहीतरी म्हणजे नक्की किती जुनं ह्याचं आकलन होणं अतिशय कठीण आहे. त्यामुळे हडप्पावर खूण करताना ती फारशी काही उमजून न करता "इतिहासाच्या पुस्तकात आहे खरा असा काहीतरी धडा" ह्या भावनेतून केलेली असण्याची दाट शक्यता आहे.
खांडसच्या अनुभवाने मला फारच विचार करायला भाग पाडलं. चित्रांचा अभाव हे मुख्य कारण जरी असलं तरी महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये ही अडचण दूर होईल असा एक पर्याय आहे. तो म्हणजे वस्तू संग्रहालयांना भेटी. मुलांना वस्तुसंग्रहालयामध्ये नेल्यामुळे इतिहासातील अनेक संदर्भ त्यांना समजायला सोपे जातील असा हेतू ह्यामागे आहे. त्यामुळे खांडसच्या अनुभवानंतर प्रश्नावलीमधील वस्तुसंग्रहालयाबद्दलच्या प्रश्नाबद्दलही मी विद्यार्थ्यांशी चर्चा करायला सुरवात केली. त्यामध्ये समजलेल्या अनेक धक्कादायक गोष्टी पुढील भागात. ll3ll

- डॉ. अनघा भट

No comments:

Post a Comment