Friday, 22 November 2019

गावात फिरते बैलगाडी, लावते वाचनाची गोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातलं दर्गनहळ्ळी हे गाव. गावाची लोकसंख्या जेमतेम साडेचार हजार. याच गावात राहणाऱ्या काशीराज कोळीची ही गोष्ट. काशीराज तीस वर्षांचा. भिलार गावापासून प्रेरणा घेत गावात बैलगाडीच्या माध्यमातून फिरतं वाचनालय त्याने सुरू केलं आहे. दर रविवारी सकाळी बैलगाडीत फिरतं वाचनालय उपलब्ध असतं.
काशीनाथला वाचनाची प्रचंड आवड आहे. सध्या तो पूर्व विभाग वाचनालय सोलापूर येथे ग्रंथालय लिपिक पदावर कार्यरत आहे. आपल्याही गावात छोटेखानी वाचनालय असावे अशी त्याची मनोमन इच्छा होती. वाचन संस्कृतीचा वसा घेतलेल्या काशीनाथने पदरमोड करून साडेपाच हजार रूपये खर्चून दोनशे पुस्तक घेतली. त्याची धडपड पाहून त्याला श्रीमती वनिता कायत आणि सचिन बिजगे, कल्लप्पा डांगे, कल्लप्पा चतुर्भुज यांनी आर्थिक मदत केली. आणि वाचनालय सुरू झालं.
आपलं वाचनालय अधिकाधिक समृद्ध व्हावे, यासाठी त्याने मित्र तसंच कामांवरील अन्य सहकाऱ्यांना पुस्तकं रद्दीत टाकण्याऐवजी मला द्या, असं आवाहनही केलं. काशीनाथच्या या
प्रयत्नाला त्याच्या मित्रांनीही पुस्तकं देऊन मदत केली. काशिनाथने दहावीपासूनच पुस्तकं गोळा करण्यास सुरुवात केली होती. हीच पुस्तकांमुळे वाचनालय उभे करण्यास मदत झाली. कुठल्याही सरकारी अनुदानाविना त्याचं ‘माउली सार्वजनिक ग्रंथालय’ २०१७ साली मोफत सुरू झालं. हे वाचनालय ग्रामस्थांना, लहान मुलांना वाचनाची गोडी लावण्यास मदत करेल.
सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थी वाचनाकडे पाठ फिरवतोय अशी ओरड पालक आजही करत आहेत. असा आरडाओरडा करण्यापेक्षा कृतीवर भर देत त्याने वाचकांना वाचनाकडे खेचून आणण्यासाठी नवा उपक्रम म्हणून फिरतं वाचनालय चक्क बैलगाडीत सुरू केलं. गावाकडच्या विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं पोहोचण्यासाठी ही चळवळ उभारली. काशीनाथ ग्रामस्थांना ही पुस्तके परत देण्याच्या अटीवर मोफत देतात. भरमसाठ पुस्तकं, अन् वाचनालयाचा मोठा बॅनर पाहून लहान मुलं बैलगाडीभोवती एकच गलका करतात. या कामी काशीनाथचा भाऊ रवींद्र कोळी देखील त्याला मदत करतो. शैक्षणिक, मनोरंजनात्मक, आत्मचरित्र, माहितीपट, अनुवाद, कथा आणि वर्तमानपत्रे या बैलगाडीत उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेकडे कल पाहता ती देखील पुस्तके या वाचनालयात पुढे उपलब्ध राहणार आहेत.
ग्रामीण भागात आजही बैलगाडी हा आपुलकीचा अन् जिव्हाळ्याचा विषय आहे. ग्रामीण संस्कृती जपत काशिनाथने पुढे बैलगाडीत फिरतं वाचनालय सुरू केलं. यासाठी त्याने स्वतःच्या सूर्या आणि चंद्र्या नावाच्या बैलांना गाडीला जुंपलं. बैलगाडीत असंख्य पुस्तके पाहायला मिळतात. दर रविवारी गावात फिरून लोकांना पुस्तके वाचण्यासाठी दिली जातात.
रविवारी काशीनाथला कामावरती सुट्टी असते. त्या सुट्टीचा सदुपयोगच त्यानं केला आहे. तंत्रज्ञानाने आपण कितीही प्रगती केली असली तरी अजूनही खेडय़ातील छोटे शेतकरी बैलगाडी हीच आपली सर्वात मोठी संपत्ती समजतात. याच संपत्तीला हाताशी धरत व लोकांना वाचनाकडे खेचून आणण्यासाठी केलेली ही छोटीशी भन्नाट आयडिया गावात चर्चेचा विषय आहे.
काशीनाथ म्हणतो, “भिलार हे महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. त्या गावासारखी आमच्या गावाची ओळख व्हावी, या दिशेने मी भविष्यात वाटचाल करू इच्छितो. जेणेकरून प्रत्येक घराघरामध्ये वाचन संस्कार रुजविण्यास मदत होईल.”
- अमोल सिताफळे, सोलापूर 

No comments:

Post a Comment