Friday 22 November 2019

बॅडव्हेंचर ऑफ शेरलॉक होम्स (आखुडबुद्धी बहुशिंगी)

"इन्स्पेक्टर लेस्ट्रेड, खुनाच्या जागी काही धागेदोरे मिळालेत?"
"नाही श्रीयुत होम्स, पण एक दोरखंड मिळालाय. कदाचित त्याला बांधून-"
"तो आपण नंतर बघू. पहिल्यांदा आपण काही छोट्या, नजरेतून सुटणाऱ्या पण महत्त्वाच्या गोष्टी बघू, जसे… आह! हा बुटाचा ठसा. वॉटसन, या ठशावरून तू काय सांगू शकतोस?"
"हेच की होम्स, खुन्यानं बूट घातला असावा."
"जवळपास बरोबर वॉटसन. पण कदाचित हा सुगावा आपल्याला गुंगारा देण्यासाठीही इथं सोडला असावा. याचा अर्थ खुनी भलताच हुशार, किमान सहा फूट उंच, सिगारेट न ओढणारा-"
"होम्स, हे कशावरून?"
"वॉटसन, या बूटाच्या मापावरून माणसाच्या उंचीचा अंदाज बांधता येतो. या बूटाचा मालक पाच फूटापेक्षा अधिक उंच नसणार. अर्थात, तो सहा फूट उंचीचा आहे हीच एक शक्यता उरते."
"आणि सिगारेट न ओढणारा कशावरून?"
"कारण, खुनाच्या जागी सिगारेटचं एकही थोटुक सापडलं नाही."
"आणि हे आपल्याला फसवण्यासाठी केलं असेल हे कशावरून?"
"कारण, माझ्या प्रिय लेस्ट्रेड, काही मिनिटांपूर्वी आपण या खोलीत प्रवेश केला तेव्हा हा ठसा इथं नव्हता. याचा अर्थ, खुन्यानं नंतर येऊन हा ठसा उमटवलाय."
"किती सोपं आहे हे! पण होम्स, हा तर लेस्ट्रेडच्या बूटाचा ठसा आहे!"
"याचा अर्थ-"
"वेडपटपणा करू नकोस वॉटसन. इन्स्पेक्टर लेस्ट्रेडनी नक्कीच हा खून केला नाही."
"धन्यवाद होम्स. पण हे कशावरून?"
"कारण तुमची उंची फक्त सव्वापाच फूट आहे, शिवाय तुम्ही पाईप ओढता. हुशारीबद्दल बोलायलाच नको. चला, आपण उगाच या चुकीच्या सुगाव्याच्या नादी लागून भरकटलो. आता तुम्ही दोघं शांतपणे-"
"कोचावर बसू?"
"अजिबात नको! कदाचित कोचावर काही सुगावे असतील. आठवतंय वॉटसन, तीन विद्यार्थ्यांच्या प्रकरणात सगळ्यात मोठा पुरावा कोचावरच होता."
"हो हो, आठवलं. आम्ही इथंच उभे राहतो. तू शोध घे."
"अहा! हे बघ मला काय सापडलं!"
"काय?"
"काही नाही. माझीच किल्ली पडली होती खिशातून. माझ्या कोटाच्या खिशाला भोक पडलंय बहुतेक. अरेच्चा! पण हे काय?"
"आता काय सापडलं?"
"काहीच नाही सापडलं. म्हणूनच वैतागून म्हणालो."
"होम्स, फायरप्लेसमध्ये काही सापडू शकेल का?"
"नाही वॉटसन. मला नाही वाटत खुनी फायरप्लेसमध्ये लपून बसला असेल. पाच फूटी माणसालाही तिथं अवघडून बसावं लागेल. आपला खुनीतर सहा फूट उंच आहे."
"होम्स, मला एक कोडं पडलंय की खुनी खोलीत कसा आला असेल?"
"सोप्पंय लेस्ट्रेड. तो दरवाज्यानं आत आला. त्यानं खून केला आणि दरवाज्यानंच परत गेला."
"कशावरून होम्स?"
"कारण या खोलीला एकच दरवाजा आहे. एकही खिडकी नाही. अर्थात, तो दरवाजातून आला हे उघड आहे."
"होम्स, कॉन्स्टेबलच्या म्हणण्यानुसार दरवाजाला आतून कडी घातलेली होती. तू याचं कसं स्पष्टीकरण देशील?"
"खुनी गेल्यावर मृतानं आपला कुणी खून करू नये म्हणून कडी लावली असावी. किंवा कदाचित-"
"दुसरी शक्यता काय आहे?"
"मृत माणसानंच खुन्याचा खून केला असावा आणि मृत माणूस लपून बसला असावा."
"पण यावरून खुन्याला शोधायचं कसं होम्स?"
"मी कशाला आहे मग? खुनी व्यक्ती पुरूष किंवा स्त्री आहे-"
"बरोबर. मलाही हेच सुचलेलं. आणि किमान सहा फूट उंच?"
"अगदी बरोबर. त्याला सिगारेटचं व्यसन नाही. डाव्या भुवईखाली तीळ नाही."
"कशावरून?"
"मला आहे. आणि मी खुनी नाही, त्यावरून. शिवाय त्याला लांब झुपकेदार शेपूट आहे."
"आं?"
"मला कोचाच्या पायापाशी हा केसांचा पुंजका सापडला. याचा अर्थ खोलीत फिरताना त्याची शेपूट इथं अडकली असावी."
"वाहवा होम्स! मी आताच अशा वर्णनाच्या लोकांच्या शोधाला लागतो. हॅलो, आपणच श्रीमती मॅकब्राहम्स का?"
"अच्छा! म्हणजे खुन्याची पत्नी आहेत त्या याच का? मिसेस मॅकब्राहम्स, मला तुम्हांला काही प्रश्न विचारायचे आहेत."
"मी श्रीमती मॅकब्राहम्स नाही. आणि मला तुम्हांला एकच प्रश्न विचारायचा आहे- तुम्ही माझ्या घरात काय करताय?"
"काय म्हणजे? खुनाचा तपास करतोय! तुमच्या नवऱ्याचा काल रात्री खून झाला हे विसरलात का?"
"माफ करा, पण माझा नवरा वारून अडीच वर्षं झालीत."
"अच्छा! म्हणजे-"
"म्हणजे होम्स, आपण चुकीच्या घरात तपास करतोय."
"पण श्रीमती मॅकब्राहम्स, आता आम्ही आलोच आहोत तर आम्हांला थोडा तपास करू द्या ना. भविष्यात कधी तुमचा खून झालाच तर हा तपास उपयोगी पडेल."
"अजिबात नाही! जिमीऽ ए जिमीऽ…"
हाक ऐकून म्हशीच्या छोट्या रेडकाइतक्या उंचीचा एक केसाळ कुत्रा दात विचकत आतून पळत आला आणि आमचा तपास अर्धवटच राहिला. होम्सला एका कुशीवर आत्ता कुठं वळता येऊ लागलंय.
#नवीउमेद 
- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment