Friday, 22 November 2019

पाण्डुरङ्ग लवङ्गारे प्रशालेतील एक तासिका- (आखुडबुद्धी बहुशिंगी)

गुरु: (अकस्मात निद्रा भङ्ग झाल्याने, कृद्धवदने) अरे काय हा दङ्गा? पाठशाला म्हणजे धूम्रवर्णांची गोन्धलिका आणि लत्ताप्रहरांची विपुलता असं झालंय. काय रे अनङ्गबाहू?
शिष्य १: गुरुदेव, आज अर्धसत्रपरीक्षेच्या फलितांशाची घोषणा करणार होतात ना? त्यासाठीच आम्ही जमलो आहोत.
गुरु: अर्थातच, आपल्याकडे उकडलेल्या तृणधान्याचे तुकडे असतील तर अतृप्त आत्म्यांचे संमेलन भरणारच! हा हन्त!! काय त्या दिव्य उत्तरपत्रिका? तपासताना माझे नेत्र व्याकुळले, कण्ठस्थळ शुष्क झालं आणि मस्तकास चक्राकार गती मिळाली.
शिष्य ९ (उतावीळपणे) : गुरुदेव, पण आम्ही सगळे उत्तीर्ण तर झालो आहोत ना?
गुरु: उत्तीर्ण? उप्या, सन्मुख ये पाहू माझ्या. (उपमन्यू गुरुसन्मुख होतो) भूकम्पाचे कारण काय लिहिलंयस रे गर्दभा? (गुरुदेव उपमन्यूच्या पृष्ठकावर जोरदार धप्पिका मारतात. तो कळवळतो.)
उपमन्यू: पृथ्वीच्या अन्तर्भागात जी कम्पने ...
गुरु: एक शब्द वदू नको मूर्खा! शेषनागाची आकृती काढून तुला नीट समजावून सांगितलं होतं ना रे श्यामकर्णा?
उपमन्यू: (भयभीत होत) म्हणजे माझं उत्तर चूक होतं?
गुरु: चूक नाही तर काय? आत्यन्तिक विद्वानाचा गोवत्स रिक्त. आणि काय रे घण्या, वर्षा कशी येते?
घनश्याम: (विस्खलत) गुरुदेव, सहसा प्रतिदिनी ती द्विचक्रीका घेऊन येते. किन्तु आज चक्रात वात नसल्याने एकादश क्रमाङ्काच्या...
गुरु: मूर्खा, तुला वात झालाय का? मी काय शिकवलं होतं रे इक्या?
इक्ष्वाकु: माहीत नाही गुरुदेव, त्याऐवजी मी वन्दना कशी येते हे साङ्गू?
गुरु: मूढा! वर्षा म्हणजे पर्जन्य कसा येतो ते विचारलं मी. आणि काय रे शतमूढा, पत्रिकेत काय लिहीलंस रे तू चन्द्रग्रहणाबद्दल?
इक्ष्वाकु: गुरुजी, मी तर पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चन्द्र आला तर…
गुरु: चूप बस मूर्खा!
शिष्य २: गुरुदेव, आपण तर सन्तापाच्या भरात मरहट्टी भाषेत बोलू लागलात.
गुरु: अरे, शिव्याशाप देण्यासाठी ही सर्वोत्तम भाषा आहे असं नासाचं संशोधन असल्याचं कालच वातक्षपवर वाचलं. नाहीतर अळुमाळु, तिंवडसे, घडसून, उठामठी असले शब्द वापरणाऱ्या या प्राकृत हूणांची भाषा वापरतो कोण?
शिष्य ४: गुरुदेव, आपण ग्रहणाबद्दल काहीतरी बोलत होतात.
इक्ष्वाकु: गुरुजी, किन्तु रसायनशास्त्राच्या पुस्तकात ग्रहण असेच होते असं प्रतिपादन केलेलं आहे. शशि धरित्री आणि मित्राच्या मध्ये आल्यास चन्द्रग्रहण, तसेच दिनकर आणि धरणीच्या…
गुरु: पुस्तकात चुकीचं लिहीलंय. हल्ली शिक्षणमण्डलाचा कारभार म्हणजे दृष्टीहीन पेषण करतो आणि सारमेय पिष्ट खातो असा झालाय. आमच्या समयी हे असं नव्हतं.
शिष्य ४ (हा थोडा जास्तच आगाऊ आहे.): गुरुजी, मग त्याला शिक्षणमण्डल का म्हणतात हो?
गुरु: अरे, हे म्हणजे पितृभगिनीस श्मश्रू असती तर तिला पितृव्य म्हटलं असतं अशासारखं झालं. ते काही नाही, आजपासून तुम्हां सर्वांना कृष्णसुदामा पद्धतीचे शिक्षण देणार. कळलं?
शिष्य ५: (कुतुहलानं) म्हणजे कसे गुरुदेव?
गुरु: जन्या आणि शन्या, तुम्ही जङ्गलात काष्ठ गोळा करायला जा, नन्दिनी आणि वन्दना तुम्ही गोमातेचे दुग्ध काढण्यास जा, रागिणी तू गोमयात मृत्तिकामिश्रण करून त्याच्या गोवर्या बनव, हणम्या आणि लक्ष्या, तुम्ही सरितेवरून जल घेऊन या आणि बाकी सगळे पाकशाळेत पाकसिद्धी करायला जा. आता बघू कोण कसं नापास होतं ते.
(समस्त शिष्य ललाटावर हस्त मारत साङ्गितलेल्या कामाला निघून जातात.)
- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment