Tuesday 17 July 2018

ट्रॅफिक पोलीस नव्हे स्वयंसेवी 'ट्रॅफिक मॅन'!


औरंगाबाद शहर. जालना रोड. अमरप्रित चौक. गाड्यांचा कर्णकर्कश आवाज, जीवघेणी धूळ. धूर. वाहनांची प्रचंड वर्दळ आणि त्यासोबत प्रचंड गोंगाट. या गोंगाटाला चिरत एक अत्यंत शांत स्वभावाचा मध्यमवयीन माणूस संयमाने, नम्रपणे या चौकात वाहतुकनियमन करत असतो. विवेक श्रीकृष्ण चौबे. तुम्हाला वाटेल, या चौकात ड्युटी करणारा हा कुणी ट्रॅफिक पोलीस असावा. पण नाही. हा आहे एक सामान्य माणूस तुमच्या माझ्यासारखा..! रोज संध्याकाळी शहरातल्या वेगवेगळ्या चौकात वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वतःचे तीन तास खर्च करणारा. अगदी स्वेच्छेने.
विवेक चौबे औरंगाबादच्या सिडको भागात झाम्बड इस्टेट या भागात राहणारे. 52 वर्षांचे. शिक्षण दहावीपर्यंत. अख्खी हयात वॉचमनची नोकरी. सध्या महाराष्ट्र बँकेत गनमॅन. पगार जेमतेम. ड्युटी संपल्यानंतर पोलिसांनी दिलेला लाल डगला अंगावर चढवून हातात पोलीस स्टिक घेऊन चौकात दाखल होणं, हा दिनक्रम. एक-दोन दिवस नाही, तर गेल्या आठ वर्षांपासूनचा. थंडी, ऊन, वारा- पावसात कधीच सुट्टी न घेता चौबे ही सेवा देतात.

आठ वर्षांपूर्वीची एक घटना यासाठी कारणीभूत ठरली. रोपळेकर चौकात सिग्नल बसवलेला नव्हता. रोजच वाहतूक कोंडी. एकदा, रुग्णवाहिकेलाही रस्ता मिळेना. तिथेच उभ्या असलेल्या विवेक चौबे यांना राहवलं नाही. अस्वस्थ झालेल्या चौबे यांनी शेजारी उभ्या असलेल्या एका गार्डची शिट्टी घेतली. रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला. पण त्यांची अस्वस्थता एवढ्यावर थांबली नाही. रोज तीन तास चौबे त्या चौकात थांबू लागले. वाहतूक सुरळीत होऊ लागली. त्यांचे कष्ट पाहून वाहतूक शाखेनं तिथं सिग्नल बसवला. 
चौबे सांगतात, "लोक माझा आदर करतात. आठवणीत राहिलेला एक क्षण म्हणजे माझं हे काम पाहून एका मुलीनं मला खूप अदबीनं गुलाबाचं फूल दिलं होतं. आपल्याबाबतही कुणालातरी आदर वाटतो , ही भावना सुखावणारी होती. त्यामुळे, हे काम करण्यासाठी माझा विश्वास दुणावत गेला."
प्रिय औरंगाबादकरांनो, कधी भेटलाच तुम्हाला हा स्वयंसेवी ट्रॅफिक माणूस, तर तुम्हीही त्याला नक्की एक गुलाबाचं फूल द्या... आपण त्यांचं तेवढं देणं लागतोच.
-दत्ता कानवटे.

No comments:

Post a Comment