Saturday 30 September 2017

सामाजिक जाणिवेचा यवतमाळचा दुर्गोत्सव


रात्र चढत जाते तशी रस्त्यांवर वाढणारी गर्दी...जिल्ह्या-जिल्ह्यातून, परराज्यातून आलेले लाखो भाविक...डोळे दिपवणारी रोषणाई...थेट इतिहासात नेणाऱ्या, जुनं वैभव दाखविणाऱ्या कलाकृती...आणि प्रत्येक मंडळाकडून दिला जाणारा सामाजिक संदेश हे चित्र आहे यवतमाळच्या नवरात्रोत्सवाचं. अमरावती परिमंडळात तीन हजार सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळं. त्यातील 2 हजार 590 मंडळं एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहेत. या दुर्गोत्सवातले खरे कलाकार म्हणजे इथले मूर्तिकार. 'जिवंत' भासणारी दुर्गेची मूर्ती हे इथलं वैशिष्ट्य. या मूर्ती थेट भक्तांच्या मनाचा ठाव घेतात.
दरवर्षी येथील दुर्गोत्सव गर्दीचा उच्चांक मोडत आहे. या काळात यवतमाळ शहरात अंदाजे 100 ते 200 कोटींच्या वर उलाढाल होते. दररोज किमान 1 ते 2 लाख भाविक या उत्सवात सहभागी होतात. नवरातरी आधी दोन महिने सर्व मंडळांचं काम सुरू होतं. कोणता देखावा, त्यातून कोणता सामाजिक संदेश देणार, यासाठी मंडळांमध्ये स्पर्धा लागलेली असते.
‘स्व. बब्बी पहेलवान सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळा’चे हे 76 वे वर्ष. यावर्षी अवयवदान, देहदानाबाबत जनजागृती करून इच्छुकांचे अर्ज भरून घेत आहे. तसंच व्यापाऱ्यांना डस्टबीन वाटप, वृक्षलागवड केली जात असल्याचं मंडळाचे अध्यक्ष अतुल दवंडे आणि सचिव देवा राऊत यांनी सांगितलं. ‘समर्थ दुर्गोत्सव मंडळा’ने बेटी बचावचा संदेश देत दुर्गादेवीच्या दरबारात नऊ कन्यांचा देखावा साकारला आहे. तुळशीचे महत्व अधोरेखित करून ऑक्सीजन देणारे रोपटे घरी लावा, असा संदेश मंडळाने दिला आहे. यवतमाळचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी अध्यक्ष असलेल्या ‘जयहिंद दुर्गोत्सव मंडळा’ने रक्तदान शिबिराचे आयोजन करून शासकीय रक्तपेढीला मदत केली आहे. या मंडळाचं 54 वे वर्ष आहे. ‘शिवराय दुर्गोत्सव मंडळा’चं हे पहिलंच वर्ष. या मंडळाने नऊ दिवस प्रबोधनपर व्याख्यानमालेचं आयोजन केलं आहे. या नऊ दिवसात शासकीय दवाखान्यात जन्माला येणाऱ्या कन्येचा आणि मातेचा विशेष सत्कार या मंडळाकडून केला जात असल्याचं मंडळाचे अध्यक्ष सचिन येवले यांनी सांगितलं. होतकरू महिलांना शिलाई मशीन वाटप, शाळकरी मुलींना सायकल वाटप असे विविध सामाजिक उपक्रम मंडळांमार्फत सुरू आहेत. एकविरा दुर्गोत्सव मंडळाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 'आत्महत्येचा विचार आल्यास तत्पूर्वी आम्हाला प्रत्यक्ष भेटा, बोला मार्ग निघेल', असं आश्वासक आवाहन त्यांनी केलं आहे. अनेक मंडळांनी स्वच्छ भारत मोहिमेचे कॅम्पेन केलं आहे. मंडळाचे पदाधिकारी सामाजिक संघटनांना सोबत घेऊन दररोज सकाळी शहर स्वच्छ करतात.
कोलकातानंतर देशात यवतमाळ येथे सर्वात मोठा दुर्गोत्सव साजरा होतो. या उत्सवाला १०० पेक्षा अधिक वर्षाची परंपरा आहे. यवतमाळच्या दुर्गोत्सवाची पाहिजे तशी प्रसिद्धी होत नसल्याने अस्वस्थ झालेल्या चंद्रेश सेता यांनी 1 ऑक्टोबर 2016 रोजी 'यवतमाळ नवरात्री डॉट कॉम' या संकेतस्थळाची निर्मिती केली. यावर यवतमाळच्या नवरात्र उत्सवाचा इतिहास, मंडळांची नावं, पदाधिकारी, मूर्तींची छायाचित्रे, व्हीडीओ, नवरात्रीतील प्रत्येक दिवसाचे महत्व अशी सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे आता 55 देशातील नागरिक थेट उत्सवात ऑनलाइन सहभागी होतात. नवरात्रीत दररोज 3 ते 4 हजार भाविक या संकेतस्थळावरून नवरात्र उत्सवाचा आनंद लुटतात.
दुर्गोत्सव पाहण्यासाठी बाहेरगावावरून येणाऱ्या‍ भाविकांसाठी विविध सामाजिक संघटना फराळ, पाणी, चहाची व्यवस्था ठेवतात. विशेष म्हणजे सर्व धर्माचे लोक या दुर्गोत्सवात आत्मियतेने सहभागी होतात. त्यामुळे या काळातही शहरातील सामाजिक सौहार्द कायम असते. त्याची दखल घेत यावर्षी जिल्हा पोलीस दलातर्फे प्रथमच 'दुर्गोत्सव अवार्ड' मंडळांना देण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस दलाने मंडळांसाठी स्पर्धेचं आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील क्रमांक एकचा हा दुर्गोत्सव! पण पुणे, मुंबईतील गणेशोत्सवाच्या तुलनेत प्रसिद्धीपासून काहीसा दूर असल्याची खंत मात्र यवतमाळकरांना आहे.

- नितीन पखाले.

No comments:

Post a Comment