Sunday 10 September 2017

सोनाकाकीची जिद्द खरी, कमनशिबावर मात करी



सोनाकाकी. वय ७५. चेहरा थकलाय आणि हाताला थोडासा कंप सुटतो. पण तरीही काकीची जिद्द काही कमी नाही झालेली. मी समोर बसून प्रश्न विचारतो, "काय काय कामं केली काकी आयुष्यात?" किंचित हसून काकी मिश्किलपणे म्हणते, "चोरी न शिंदळकी सोडून बाकी सारं केलं बापा मी आयुष्यात."
काकीचा नवरा अपंग. नांगर हाणला; पाळी, कोळपन, पेरणी सगळं काकी एकटी करायची. पुढं काकीच्या हाती मोटारसायकल आली. मोटरसायकल चालवत ती डेअरीला दूध टाकायला जायची. काकीनं मळणीयंत्र, ट्रॅक्टर चालवला. ती अडाणी असूनही कशातच मागे नाही राहिली.




पण या जिद्दी सोनाकाकीच्या आयुष्याची कहाणी म्हणावी तितकी सोपी नाही. माहेर औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील पिपरगाव. ती थोडी वयात आली आणि गरिबीला वैतागलेल्या तिच्या बापाने तिचं लाखेगावतल्या गुलचंद चुंगडे यांच्याशी लग्न लावून दिलं. इथं मात्र काकीची घोर फसवणूक झाली होती. नवऱ्याची पहिली बायको जळून मेली तेव्हा तिला वाचवताना गुलचंद यांचा कमरेखालचा सगळाच भाग जळून गेला होता. नवरा अपंग झालेला.





नवरा अंथरणाला खिळून असायचा. अन काकी..! भर उन्हाळ्यात वरून सूर्य आग ओकत असताना, तापलेल्या मातीत वखर हणायची, भर पावसात एकटीनं पेरणी करायची, आणि भर थंडीत रात्री पिकाला पाणी द्यायची. भुताखेताची भीती तर तिनं केव्हाच फेकून दिली होती. मळणी झाल्यानंतर काकी स्वतः पोतं उचलून गाडीत भरायची, घेऊन यायची. काकीनं एकटीच्या जिद्दीवर शेतात 30 फूट खोल विहीरही खोदली.
संसाराचा गाडा ओढता ओढता काकीने आता या घराला सोन्याचे दिवस आणलेत. घरी किराणा दुकान आहे. दत्तक घेतलेल्या मुलासाठी मोटारसायकल आहे. शेतात भरभक्कम कडं टाकलेली विहीर आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत शेतीची अवजारं काकीच्या कोठारात आहेत. कधीकाळी बैलगाडीत बसून कासरा ओढणारी ही बाई आता नव्या यंत्रांचे ब्रेकही तितक्याच सहजतेने दाबते.
सोनाकाकीची जिद्द आणि संघर्ष सर्वांनाच प्रेरक ठरो.

- दत्ता कानवटे.

1 comment: