Thursday 7 September 2017

ठळकपणाच्या पलीकडचा प्रदेश

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी :
- तर मग असं आहे की निरोपाची वेळ आलीय. तात्पुरत्या का होईना! तसे निरोप असल्याशिवाय पुनर्भेटीची मजा नाही, नाही का?
गेले चौदा आठवडे आपण भेटतोय. इतक्या सलग मी आजवर फेसबुकवर कधीच लिहिलं नव्हतं नि इतक्या प्रतिसादाची अपेक्षा तर बिलकुलच केलेली नव्हती. ‘नवी उमेद’चं यात श्रेय मोठंय. खूप नव्या माणसांशी ‘नवी उमेद’नं मला जोडून दिलं नि खरंच नवा उत्साह दिला. जगण्यातल्या माझ्या छोट्याछोट्या अनुभवांना नि सापडलेल्या इटुकल्या युक्त्यांना समजून घेत माणसं बोलती झाली. शारीरिक अपंगत्त्वापलीकडे नि टिपिकल ‘प्रेरणादायक’ कॅटेगरीतून मुक्त अशी माणसं पाहायला लावावीत, त्यांचे प्रश्न कळावेत हा ही माझा इथं प्रयत्न राहिला. तो वाचकांनी बर्‍यापैकी समजून घेतला. नुसतंच भारावून जाण्यापेक्षा माणसं कृतीशील झाली तर बदल होणारच आहेत, फक्त भावुकतेच्या वेष्टणातून त्यांना बाहेर काढण्याचं काम चालूच राहायला हवं, सारखे एकमेकांना चिमटे काढत जाग ठेवायला हवी हे जाणवलं. माझ्या मैत्रिणीनं, रेणुकानं बोलता बोलता मला सांगितलेलं की बघ ना गं, आपल्याला वाटत होतं, फेसबुक हे व्हर्च्युअल माध्यम आहे... जगण्यापासून एका विशिष्ट अंतरावर राहणारं...तसं आता उरलेलं नाही. माणसांना खर्‍याखुर्‍या जगण्यासाठी मदत करणारी सिस्टीम इथं उभी राहते, व्यवस्थांना या भिंतींवर लिहिलेल्या मजकुराची दखल घ्यावी लागते नि बदल होतात. मळभ फिटतं. आता पूर्वीसारखं व्हर्च्युअल म्हणता येणार नाही या माध्यमाला! - या तिच्या म्हणण्याची प्रचिती मला आलीच! नवी उमेद टीम तर हा अनुभव रोज घेतेय...
तरीही मित्रांबरोबर याच्या उलटही चर्चा झाली.
- म्हणजे असं की फेसबुकवरच्या माणसांशी मैत्री होऊन काही तुरळक भेटी झाल्या तेव्हा ती माणसं सहजसाधी, कुठल्याही आविर्भावाविरहित भेटली होती. गप्पा झाल्या होत्या. आचरट विनोद शेअर झाले होते. समजुतींचे कसलेही घोटाळे उद्भवले नव्हते. पण फेसबुकवर जेव्हा यापैकी काहींच्यात बारकीसारकी हमरीतुमरी, चकमक किंवा स्फोटक युद्धं घडली तेव्हा धक्का बसलेला की हे असं कसं सगळं? आपल्याला कळलंच नव्हतं की काय? जी माणसं आत्ता आपल्यासमोर पेटलीहेत ती प्रत्यक्षात आपल्याला नि एकमेकांनाही किती छान भेटली होती नि वागली होती! रामायण-महाभारतात जसं दोन वीर लढताना सेकंदभर दिसायचे नि नंतर त्यांची ती चमत्कारिक अस्त्रंशस्त्रं ऊन-पाऊस, आग-वारा, साप-मुंगूस खेळायची तेव्हा ते वीर गायब होऊन त्या अस्त्रांच्या चमत्कारांनी भ्रमायला व्हायचं... फेसबुकवरच्या युद्धातही माणसं मागं सरली जाऊन त्यांचे इगो, बरेवाईट मुद्दे, मुद्दे बाजूला ठेवून झडलेली मतांतरं वगैरेंनी डोकं जडावून गेलं काही काळ. - या सगळ्यात आपल्याला नेमकं काय वाटतंय नि जे वाटतंय ते या माणसांच्या पलीकडे नेता येऊन ‘योग्य कृती’ घडतेय का आपल्याकडून याचं निरिक्षण करत राहाणं रोचक होत गेलं. कळलं की फेसबुकसारखं डिजिटल माध्यमही माणसाळलंय. तेही माणसांसारखाच अंदाज देत नाही. त्याला गृहित धरता येत नाही. अखेर फेसबुक जिवंत आहे ते माणसांमुळेच! या प्लॅटफॉर्मवर नवी नाती सापडतात, घडतात तशी ती जगण्याची अक्कलही दोन ठोके देऊन शिकवून जातात. दुधारी इथंही. तेव्हा त्या भिंतीपलीकडे जातानाही सावध व प्रत्यक्ष भेटल्यावर पुन्हा भिंतीतून आजमावतानाही सावध असावं हे बरं. दिसतं त्या पलीकडं खूपच उरतं! नकारात्मकही नि सकारात्मकही.
माझे डॉक्टर अजित कुलकर्णी. कुठल्याही अतिरेकी भावनावेगाला निरूत्तर करून टाकणारे. एका जवळच्या पेशंटविषयी विचारायला मी त्यांना फोन केलेला. विचारायला म्हणण्यापेक्षा, मनातलं पोहोचवण्यासाठी की तुम्हाला वाटतंय की प्रयत्न करावेत, पण अशा स्थितीत भाजीपाल्यासारखं जगणं किती कठीण आहे नि त्यापेक्षा मृत्यू स्वीकारार्ह! - तर डॉ.कुलकर्णी म्हणाले होते, ‘‘हे बघा, एखाद्या शरीरात ९९% सगळं निगेटिव्ह आहे नि १% कुठंतरी प्रयत्नाला दाद मिळेल असं वाटतं तर मी त्या एका टक्क्याकडेच जाणार नि तुम्हालाही सांगतो की तिकडं बघण्यातली एकाग्रता ९९ भाग वाईटाच्या पेक्षा स्थिती जास्त सुसह्य करते. आपले रेडिओलॉजिस्ट डॉ.संतोष सरूडकर यांचं ‘डायग्नॉसिस’ मला फार आवडतं. दिसणार नाही अशी गोष्ट त्यांना तत्काळ दिसते. ते खोलात शिरून अवगत झालेलं कौशल्य आहे. पण आता ‘आम्ही’ जे ठळक दिसतंय त्यापेक्षा जे दिसत नाही ते हुडकण्याच्या स्टेजला आलेलो आहोत. असंख्य अडचणी ठळक दिसणं-वेळेआधी कळणं हा म्हटलं तर प्लस पॉईंट आहे. पण ते कळतंय हे तुमच्या अनुभवावरून नि त्यामुळे आलेल्या वकुबामुळे! ते आलेलं आहे, तर आता जे आलेलं नाही त्या न दिसणार्‍या भागाकडे पाहायला शिकलं तर कदाचित नवा प्रदेश कळेल, चांगल्या शक्यतांचा. तुम्ही व्हीलचेअरवर आहात हे सत्य आहे, ते कळलं आहे. आम्ही तुम्हाला बघताना तुमची व्हीलचेअर आमच्या लक्षात येत नाही... पण तुम्हीही ती विसरला आहात ना?’’
कुठच्याही ठळक गोष्टींपलीकडं जो प्रदेश उरतो त्याची लांबी, रूंदी, खोली नि घनता ठाऊक नाही... ठाऊक नाही म्हणून उत्सुकता नि भीती आहे ... तरीही, तिकडं जायला लागण्यानं बरं नि खरं वाटणारे.
- सोनाली नवांगुळ

No comments:

Post a Comment