Tuesday 26 September 2017

सुनयना 'अजात'

'ती’च्या उमेदकथा – नवरात्रोत्सव विशेष
जी जात नाही ती 'जात'! आज समाज जात, धर्मकेंद्री होत असताना एक तरूणी तिच्या पणजोबांनी शंभर वर्षांपूर्वी विदर्भात जातीप्रथेविरोधात केलेल्या बंडाची पुनरावृत्ती करीत आहे. सुनयना 'अजात' हे तिचं नाव. गेल्या वर्षभरापासून ती या लढाईत उतरली आहे. त्यासाठी विविध महाविद्यालयात जाऊन ती विद्यार्थ्यांना भेटते. त्यांच्याशी बोलते आहे.



१९२०-३० च्या दशकात सुनयनाचे पणजोबा गणपती महाराज यांनी समाजातील रूढी, परंपरा, कर्मकांडाविरोधात आवाज उठवून समाजाच्या प्रत्येक प्रश्नाला कृतीतून उत्तर दिले. जात न मानणाऱ्यांचा 'अजात' संप्रदायच त्यांनी निर्माण केला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व जाती, धर्मातील हजारो कुटुंबांनी आपल्या जातीची कवचकुंडले फेकून दिली आणि ते 'अजात' झाले. मात्र गणपती महाराजांच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीला खुद्द शासनानेच पुन्हा 'अजात' या जातीचे लेबल चिकटवले आणि त्यांना जातीच्या चौकटीत बंदिस्त केले !
सुनयना मुळची मंगरूळ दस्तगीर (ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) येथील. या परिसरात 'अजात' संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. ‘अजात’ संप्रदायाचा इतिहास रंजक आहे. यासंदर्भात सुनयना म्हणाली, "मंगरूळ दस्तगीर या गावात १८८९ साली जन्माला आलेल्या गणपती उर्फ हरी भबुतकर यांनी स्त्री-पुरूष समानतेचा लढा उभारला. सृष्टीत स्त्री आणि पुरूष या दोनच जाती असून मानवता हा एकच धर्म आहे, असे विचार गणपती महाराज आपल्या कीर्तनातून गावोगावी मांडू लागले. त्यासाठी 'श्वेत निशाणधारी अजात मानवसंस्था' त्यांनी स्थापन केली. कृतीतून समाजाला उत्तर देण्यासाठी गणपती महाराजांनी निम्न जातीतील एका विधवेशी लग्न केलं, ते साल होतं १९१७. या निर्णयाला समाजाकडून प्रचंड विरोध झाला. त्यांना बहिष्कृत करण्यात आलं. पण ते मागे हटले नाही. त्यांनी आपल्या विचारांची माणसे जोडली आणि जातीअंताची लढाई सुरू झाली. विदर्भातील सुधारणावादी विचारांचा हा पहिला लढा. समाजातील रूढी, परंपरांवर गणपती महाराजांनी 'श्री पापलोप ग्रंथा'तून सडकून टीका केली. स्त्रीशिक्षण आणि स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी 'श्वेत निशाणधारी अजात धर्मसंस्था' निर्माण केली. मंगळसूत्र, कुंकू, जोडवे हे स्त्री दास्याचे प्रतीक आहे, असं ते म्हणायचे. स्त्रियांची मासिक पाळी ही नैसर्गिक असून या काळात त्यांना घराबाहेर बसायला सांगणे हे हिंस्त्र आणि निर्दयीपणाचे कृत्य आहे, असं ते परखडपणे सांगायचे.”
‘अजात’ संप्रदायातील स्त्री-पुरूष श्वेत वस्त्रेच परिधान करतात. कपाळावर पांढरे गंध लावून पांढरा ध्वज घेऊन फिरतात, कारण पांढरा रंग हा सर्व रंगांचे मूळ असण्यासोबतच शांतीचे प्रतीक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गणपती महाराजांच्या कार्याची दखल घेतली. त्यामुळे अमरावती येथे १९२५ मध्ये झालेल्या 'अखिल भारतीय ब्राह्मणेत्तर बहिष्कृत परिषदे'चे अध्यक्षपद गणपती महाराजांना मिळालं. दुर्दैवाने गणपती महाराजांच्या निधनानंतर हा संप्रदाय बदेखल झाला. 'अजात' शिक्का बसल्याने कोणत्याच जाती-धर्माचे लोक या संप्रदायाला आपलं मानायला तयार नव्हते. तेव्हा अनेकांनी आपल्या मूळ जाती शोधून सरकारला माफीनामे लिहून देत जातीचे दाखले तयार केले. दरम्यानच्या काळात प्रशासनाने 'अजात' ही जात असल्याचा जावईशोध लावून या संप्रदायातील असंख्य विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर 'अजात'ची 'जात' म्हणून नोंद केली! गणपती महाराजांची पणती सुनयनासुद्धा या निर्णयाची बळी ठरली. सुनयनाने शासनाच्या या बेपर्वाईविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जात न मानणाऱ्यांना पुन्हा गणपती महाराजांच्या विचारांनी एकत्र आणून तिने निर्जातिकरणाचा आपला लढा सुरू केला आहे. ती म्हणते की, “तुमच्या आडनावावरून तुमची जात कोणती याचा अंदाज आजही सुशिक्षित आणि अडाणी लोक घेतातच. त्यातूनच जाती-पातीचे राजकारण सुरू होते आणि समाज विखुरला जातो. हे चित्र आजची विवेकवादी तरूणाईच बदलू शकते. शतकापूर्वी जो संदेश आपल्या कृतीतून माझे पणजोबा गणपती महाराजांनी दिला त्याचे अनुकरण करण्याची हीच योग्य वेळ आहे. याची सुरूवात मी स्वत:पासून केली आहे. मी माझ्या माहेरच्या, सासरच्या दोन्ही आडनावांची बिरूदावली काढून टाकली आहे. आता माझी ओळख केवळ सुनयना ‘अजात’ इतकीच आहे!”
आज सुनयनाने यवतमाळला 'समर्पण' नावाची संस्था स्थापन केली. जातीअंताच्या या लढाईत तरूणाईने समर्पित वृत्तीने सहभागी व्हावं, असं आवाहन सुनयनाने केलं आहे.
सुनयना अजात - संपर्क : 8275289455
- सुनयना 'अजात'
- नितीन पखाले.

No comments:

Post a Comment