
वर्ध्याला बेडयांवरती राहाणारा पारधी समाज. निरक्षरता, गरिबी, प्रचंड व्यसनाधीनता, चोरी, भीक या दुष्टचक्रात अडकलेला. त्यातून या मुलांना बाहेर काढण्यासाठी मग मंगेशीताईंनी रोठा इथं संकल्प वसतिगृह उभारलं. सध्या इथे 32 मुलं शिक्षण घेत आहेत. वसतिगृहात किमान 100 मुलांची शिक्षणाची सोय करण्यासाठी मंगेशी यांची धडपड सुरू आहे.

स्वतः चे दागिने मोडून वर्ष 2012 पासून मंगेशीताईंनी हे काम सुरू केलंय. त्यांची आईही समाजकार्य करणारी. तरीही, सुरुवातीला मंगेशीचं हे काम तिच्या वडिलांना तितकंसं पसंत नव्हतं. पण मुंबईतली नोकरी सोडून काम करण्यामागची मुलीची तळमळ लक्षात घेऊन वडील देवराव फुसाटे यांनी वसतिगृहासाठी जमीन दान केली. मंगेशीचे पती रमेश यांनी 8 लाख रुपयांचे कर्ज काढून बांधकाम पूर्ण करून दिलं. शेतात पिकणाऱ्या धान्यातून मुलांची खाण्याची सोय झाली.
मुंबईत भीक मागणारी पाच सहा मुलं मंगेशी यांनी वसतिगृहात आणली. वर्धाच्या बेड्यांवरचीही मुल आणली. व्यसनी मुलांना वसतिगृहात शिस्तीने राहायला लावायचं, हे आव्हान होतं. रात्री अपरात्री फिरून व्यसन करणार्या मुलांना शोधून मंगेशीताईंनी वसतिगृहात आणलं आहे. अलीकडेच जिल्हाधिकारी किशोर नवल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी वसतिगृहाला भेट देऊन त्यांचं काम जाणून घेतलं.
मुलांनी मागितलेल्या भिकेवर जगणारे, व्यसनाधीन, ही वंचित पारधी समाजाची ओळख मंगेशी यांना 'संकल्पच्या' माध्यमातून बदलायची आहे.
- सचिन मात्रे.
No comments:
Post a Comment