Thursday 8 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 3

ओजस पाच दिवसांचा झाला. तो झाल्यावर आवश्यक त्या सर्व टेस्ट डॉक्टरांनी करून घेतल्या होत्याच. पण, मी आणि भरत त्याच्या डोळ्यांची स्थिती जाणून घेण्याबाबतीत जरा अधिकच उत्सुक होतो. आधी प्रत्येक सोनोग्राफीच्या वेळी डॉक्टरांना त्याचे डोळे व्यवस्थित दिसताहेत ना, त्यात काही लक्षात येईल,असा दोष तर नाही ना? असे प्रश्न मी विचारत होतेच. तेही माझ्या शंकांचं निरसन करायचे. पण, तरीही बाळ पाच दिवसांचं झाल्यावर आम्ही त्याला ‘बच्चूअली’ या डोळ्यांच्या दवाखान्यात घेऊन गेलो. माझी आणि भरतची संपूर्ण हिस्ट्री मी डॉक्टरांना सांगितली. सारं ऐकून त्यांनी बाळाला तपासलं. तो अर्धा तास मी कसा घालवला असेल, ते शब्दातीत आहे. ती घालमेल, ते वाट बघणं, ती भीती हे उलगडून नाही सांगता येणार. बाहेर बसून फक्त वाट पाहणं हातात होतं. डोळ्यात साचू पाहणारं पाणी सतत अडवून धरलं होतं त्या अर्ध्या तासात.
तेवढ्यात मम्मी बाहेर आली आणि मला आत घेऊन गेली. त्यांनी बाळाला माझ्या हातात देताना म्हटलं, “आपका बच्चू एकदम फिट ऍंड फाइन है. उसकी आंखो में ना अब कुछ प्रॉब्लम है ना कभी होगा, ऐसा हमें लगता है.” त्यावेळची सुटकेची जाणीव, आनंद झाल्याची भावना आसवांनी मोकळी होत गेली.
या सर्वाचा विचार करताना पटकन वाटलं की, मम्मीपप्पांना माझ्या येऊ घातलेल्या अंधत्वाची थोडी जरी कुणकुण असती तरी त्यांनी सुरुवातीपासूनच उपचार केले असते ना? त्यांनी केलेला मानसिक संघर्ष साक्षात मनात उभा राहिला.
आपल्या मुलीच्या बाबतीत डॉक्टरी उपाय हळूहळू थकत चाललेत, हे ते जागेपणी
पाहत होते. आपलं पहिलंच अपत्य आयुष्यभर कधीच बघू शकत नाही, याचा समजून उमजून स्वीकार..हे साधं सरळ नाही. माझ्या खोड्यांवर रागावणारी, मला चटकन एखादा फटका मारणारी माझी मम्मी “आधीच पोरीला दिसत नाहीये, त्रास होतोय. त्यात, तिला का मारा?” असा विचार करून स्वतःला थोपवून धरायला लागली. रोजचं वागणं या एका भयानक जाणिवेनं संपूर्ण बदलून टाकणं, वाटतं तितकं सोपं नसतं.
“डॉक्टरांचे उपाय चालत नाहीत. म्हणजे देवाचं करायचं राहून गेलं असेल, ते करा. नक्की दिसेल तुमच्या मुलीला.” मनाने खचलेल्या माझ्या मम्मी पप्पांना नातेवाइकांनी, शेजाऱ्यांनी आपले अनाहूत सल्ले द्यायला सुरुवात केली. एवढं केलंच आहे; मग हेसुद्धा करून पाहूया. काहीही करून आपल्या मुलीला दिसलंच पाहिजे असा त्यांचा ध्यास. तेव्हापासून देवादिकांचे नाना तऱ्हेचे उपाय आणि झाडपाल्याच्या औषधांचा माझ्यावर भडीमार सुरू झाला. मला काही उपाय स्पष्टपणे आठवतात.
एक बाबा मला डोळे बंद करून बसायला सांगे. मग तो काही मंत्रपाठ करून एक पावडर माझ्या कपाळापासून पूर्ण डोक्याभोवती लावत असे. ती पावडर सुकू लागायची. आणि माझं डोकं जड व्हायचं. मी तसं सांगताच तो आपल्या साधनेने फरक पडतोय, असं म्हणायचा. नंतर ती पावडर पुसून माझ्या बंद डोळ्यांवर पांढऱ्या कांद्याचे पातळ काप ठेवायचा. साधा कांदा चिरताना आपल्या डोळ्यांना धारा लागतात. माझ्यासारख्या सहा-सात वर्षांच्या मुलीच्या डोळ्यांचं काय होत असेल? दोन-तीन दिवस हे सुरु होतं. पुढं त्याची यायची वेळ झाली की, मी रडू लागे. मला होणारा त्रास सहन न झाल्याने, पप्पांनी त्याचं घरी येणं बंद केलं. हा उपचार बंद झाला. मग शेजारच्या मावशींच्या हट्टापायी आम्ही एका गावी गेलो. तिथल्या एका बाईच्या अंगात देवी येत असे. तिने माझ्या मम्मीपप्पांना बघताच कुलदैवतेला बळी द्यायचा राहिल्याने हे त्रास होत असल्याचं सांगितलं. मला बदाम आणि काळीमिरी खायला दिली आणि डोळ्यात कसले तरी दोन थेंब घातले. डोळ्यात जाळ झाल्यासारखं झोंबू लागलं. ते सहन न होऊन मी किंचाळलेच. मम्मीने पुढे झेपावून मला जवळ ओढून घेतलं आणि डोळे पुसले. त्या क्षणी हे अघोरी उपाय पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
आज अलिप्तपणे विचार करतानाही त्या वेदना ठसठसल्यासारख्या वाटतात. देवधर्म, कर्मकांड याबाबतीत एक प्रकारची चीड मनात निर्माण झाली. पप्पांनी उपासतापास पूजाअर्चा, दिवा लावलाच पाहिजे या सर्व गोष्टींबद्दल झेपेल तेवढंच करण्याची शिकवण दिली. पण, माझ्या पालकांच्या अथक प्रयत्नांमुळेच माझ्या खडतर आणि अंधत्वामुळे असह्य होऊ पाहणाऱ्या आयुष्याला मी सामान्य वळण लावू शकले. या जाणीवेने मी त्यांच्यासमोर नतमस्तक होते.
 - अनुजा संखे

No comments:

Post a Comment