Saturday 17 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 8


बारावीतच पुन्हा एकदा, पुढे काय या प्रश्नाने मला वेढलं. साधं सरळ बीए न करता काहीतरी विशेष करावं, असं मला वाटत होतं. पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्याला नक्कीच काहीतरी करता येईल असं वाटलं. बारावीच्या परिक्षेनंतर बीएमएम कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये आहे ते शोधून काढलं आणि त्याच्या प्रवेशपरिक्षेचा अभ्यास सुरू केला. खरं तर, मला प्रवेशपरीक्षा ही संकल्पनाच स्पष्ट झाली नव्हती. मी करंट इशूजचा खूप सखोल अभ्यास केला. पण, जनरल नॉलेजचा काहीच अभ्यास केला नाही. तो करावा लागतो, हे मा्हीतही नव्हतं आणि त्याबद्दल मार्गदर्शन करू शकेल असंही कोणी नव्हतं. ठरवल्याप्रमाणे लेखनिकाच्या मदतीने परीक्षा दिली पण, आवश्यक असलेल्या मेरिटमध्ये आले नाही. माझा नंबर एसआयईएस कॉलेजच्या बीएमएमसाठी लागला होता. पण, रुइया सोडण्याची इच्छा झाली नाही. कदाचित, मी होऊ घातलेल्या बदलाला तयार नव्हते हेच खरं.
बीएमएमच्या नादात मी बीएला ऍडमिशन घेऊन ठेवावं ही साधी गोष्टही विसरून गेले होते. इथे बीएमएमची लिस्ट लागली आणि त्यात माझं नावच नाही म्हटल्यावर मी अक्षरशः घाबरले. कारण, बीएची ऍडमिशन बंद झाली होती. मी आमच्या उपप्राचार्या वत्सला पै यांच्याकडे गेले आणि माझी सर्व हकिकत सांगितली. त्यांनी विशेष तरतूद करून मला बीएला प्रवेश दिला. पण, तरीही पत्रकारितेत करिअर करण्याचा किडा मात्र वळवळतच राहिला.
मी मुंबई मराठी पत्रकार संघाची माहिती काढली आणि तिथे जाऊन आले. तिथल्या सरांना भेटल्यावर आणखीच हुरूप आला आणि तो सहा महिन्यांचा कोर्स मी पूर्ण केला.
बीए उत्तीर्ण झाल्यावर मधल्या सुट्टीत मी एमएसीजे या मुंबई विद्यापीठातून चालणाऱ्या प्रोफेशनल कोर्सची माहिती मिळवली. विद्यापीठात फोन करून पत्रकारिता आणि संज्ञापन विभागाचे प्रमुख संजय रानडे यांच्याशी संपर्क साधला. यांचा उल्लेख इथं अनिवार्यच आहे. कारण, मी संपूर्णतः दृष्टीहीन असून माझी पत्रकार होण्याची इच्छा सांगितल्यावर कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया न देता त्यांनी मला “तुम्ही नक्कीच पत्रकारितेचा अभ्यास करू शकता, फक्त जिथे विडियो प्रोडक्शन करावं लागतं त्याऐवजी तुम्ही असाइनमेन्ट्समध्ये काय करू शकता याचा मला जरा विचार करू द्या. तुम्ही उद्या भेटायला येऊ शकता का?” असं विचारलं. मी ठरल्याप्रमाणे गेले, तर सरांकडे माझ्यासाठीचा पूर्ण प्लॅन डिजाइन केलेला होता. त्यांनी सर्व विषयांची माहिती दिली आणि व्हिडीओ प्रोडक्शनच्या बाबतीत सर काय म्हणताहेत याकडे माझं लक्ष लागलं. ते म्हणाले, "असाइनमेन्टमध्ये दृक्-श्राव्य माध्यमांचा वापर होईल अशा जाहिराती आणि शॉर्ट फिल्म तयार कराव्या लागतात. तू शुटिंग तर करू शकणार नाहीस. पण, त्यामागचं तंत्र समजून घेता येईल. शिवाय, रेडिओसारख्या श्राव्य माध्यमासाठीचे कार्यक्रमही तुला बनवता येतील". मी त्यांच्या या तोडग्याने खूपच प्रभावित झाले. त्यांच्या हातात मला प्रवेश नाकारण्याचा पूर्ण अधिकार होता. तरीही, माझं अंधत्व हे पत्रकारितेमध्ये अडसर ठरू शकत नाही, हे त्यांनी फक्त सहकारी शिक्षक किंवा विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर खुद्द मलाही पटवून दिलं. त्यांच्या एका ठाम निर्णयाने मी पत्रकारिता आणि संज्ञापन या विषयात एमए करू शकलेे. असं करणारी मी पहिली अंध विद्यार्थिनीही ठरले. 

- अनुजा संखे

No comments:

Post a Comment