Sunday 4 February 2018

व्यसनींची शाळा, व्यसनमुक्तीसाठी



हो. चक्क व्यसनींनीच व्यसनमुक्तीसाठी शाळा सुरू केली आहे. तुम्ही बरोबर वाचलंय.
'एए' अर्थात अल्कोहॉलिक अॅनाॅनिमसची ही शाळा रत्नागिरीतल्या देसाई हायस्कूलमध्ये, दर बुधवारी आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता भरते.
दारूच्या व्यसनामुळे कुटुंबं उद्ध्वस्त होतात. काही लोक मजा म्हणून,काही ताण,दुःख हलकं व्हावं म्हणून, तर काही सो कॉल्ड स्टेट्स म्हणून. कारणं काहीही असोत. पण एकदा हे व्यसन लागलं, की सुटणं अवघड. एकदा का दारूडय़ा म्हणून बदनामी झाली, की त्यातून बाहेर पडणं मुश्किल. दारूव्यसन सुटावं यासाठी जगभरात विविध ठिकाणी अल्कोहॉलिक्स अॅनाॅनिमसचे गट कार्यरत आहेत.
रत्नागिरीतील काही सुशिक्षित आणि चांगली नोकरी असणाऱ्या व्यक्ती काही वर्षांपूर्वी दारूच्या आहारी गेल्या होत्या. व्यसनामुळे या काळात अवहेलना झाली. वाईट अनुभव आले. कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचं लक्षात आलं आणि यावर मात करण्याची इच्छाही प्रबळ झाली. इतर कोणी करण्यापेक्षा आपण व्यसनी लोकांनीच पुढाकार घेऊन सगळय़ा दारूडय़ा लोकांनाही या व्यसनातून मुक्त केलं पाहिजे हा निर्णय त्यांनी घेतला. आणि दारू पिण्यासाठी नाही, तर ती सोडवण्यासाठी हे सगळे एका आवाहनाव्दारे 12 वर्षापूर्वी एकत्र आले आणि त्यांनी व्यसनींची व्यसनमुक्तीसाठी शाळा’ हा उपक्रम सुरू केला. सुमारे 50 ते 60 जण एकत्र जमतात.
व्यसनाच्या आहारी गेलेले लोक या शाळेत मनसोक्त गप्पा मारतात. मनापासून व्यक्त होतात. दारूचं व्यसन कसं लागलं ते सांगतात. समोरचे सर्व लोक आपल्यासारखेच आहेत, ही भावना त्यांच्यामध्ये असल्याने बोलताना भीती किंवा लाज वाटत नाही . कुचंबणा, मन मोकळं न करता येणं हे दारूच्या आहारी जाण्याचं एक कारण असतं. इथे लोक मन मोकळं करतात. खूप चांगलं मार्गदर्शन, हेच लोक एकमेकांना करतात. यातील सुमारे निम्मे लोक आता व्यसनमुक्त झाले असून आपल्या नोकरी-व्यवसायात स्थिरावले आहे्त. विशेष म्हणजे, या शाळेची कोणतीही फी वगैरे नाही. काही किरकोळ पैसे प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार गोळा केले जातात आणि त्यातून एकमेकांचे वाढदिवस, चहापान केलं जातं.
या उपक्रमातून सुधारण्याची दिशा त्यांना मिळत आहे. ज्यांना खरोखरच व्यसनमुक्त व्हायचं आहे, असेच लोक या शाळेकडे वळतात. ज्या व्यक्ती व्यसनमुक्त झाल्या आहेत, त्याही इथे गप्पा मारण्यासाठी येतात. आपण या शाळेतून कसे व्यसनमुक्त झालो, याची कथा नवीन दाखल झालेल्या व्यक्तीला ऐकवतात. एका वेगळय़ाच जगात, हे लोक अगदी मनापासून काही तास जगतात. इथे नाही कोणी टोमणे मारत, नाही फुकटचे सल्ले देत. सुधारण्याची इच्छाशक्ती ठेवा आणि मन मोकळं करा, असं सांगतानाचा दारू सोडण्यासाठी काय काय करता येईल यावर विचारविनिमय केला जातो.
दारू पिणाऱ्यांनी इतरांना दोष न देता आधी स्वतःची मानसिकता सुधारली पाहिजे. टेन्शन बाहेर ठेवून शाळेत या, सुधारायची इच्छा असेल तर माणूस सुधारतोच. स्वतःतील दोष कमी करून व्यसनमुक्त व्हा, असं आवाहन ‘एए’ ग्रुपने केलं आहे.


- जान्हवी पाटील.


No comments:

Post a Comment