Tuesday 6 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं

प्रेग्नन्सी किटवरच्या दोन लाइन्स डार्क होत गेल्या आणि मी खूष झाले. त्यांनी कळवलं, की आम्ही लवकरच आईबाबा होणार! "आता जास्त धावपळ आणि टेन्शन घ्यायचं नाही हं", भरतच्या सांगण्याने मला गंमतच वाटली. रोज संध्याकाळी त्याने फळं आणणं, काय खावंसं वाटतंय हे विचारून आईंनी तसं बनवून देणं, हॉस्पिटलमधलं रुटिन चेकअप, सर्वच मला हवेत न्यायला पुरेसं होतं. बाळ कसं असेल आपलं? बाळाबद्दल बोलताना, स्वप्नरंजन करतानाचा नेहमीच नेहमीच थोडेफार शब्द बदलून आम्ही एकमेकांना हा प्रश्न विचारायचो. याचं उत्तर देताना मुलगा झाला तर ओजस आणि मुलगी झाली तर अवनी असंही दोघांनी ठामपणे ठरवून टाकलेलं. जेव्हा गर्भारपणाची जाणीव चिमुकले पाय लाथा मारून तर चिमुकल्या मुठी हात फिरवून देऊ लागल्या, तेव्हा मात्र मी अधूनमधून गंभीर व्हायला लागले. बाळाला नीट उचलता येईल का? त्याला छातीशी घेऊन व्यवस्थित दूध पाजता येईल का? मान सावरून खांद्यावर घेता येईल का? खूप प्रश्न. मी कधी बाळ हाताळलं नव्हतंच, असं नाही. दोन अडीच महिन्यांपासूनची चुलत, आत्ये बहिणींची बरीच बाळं मी खेळवली होती. पण, आपल्यातूनच निर्माण झालेलं, अवघ्या काही तासांचं बाळ हे माझ्यासाठी खूपच मोठं आव्हान होतं. शेवटी खेळवण्यापुरतं बाळ हातात घेणं आणि घडवण्यासाठी त्याला छातीशी घेणं यात कितीतरी फरक असतो. नाही का? मी जाणीवपूर्वक मनाची या सर्व गोष्टींसाठी तयारी करून घेत होते. पण एका प्रश्नाशी मन चरकायचं. डोळे भरून यायचे आणि अगतिकता म्हणजे काय ते त्या क्षणात समजायचं. “आमच्यासारखं बाळाला तर अंधत्व...?” आजही या प्रश्नाने पिच्छा सोडलेला नाही.
ओटीभरणाचा सोहळा आटोपून माहेरी आले आणि डॉक्टरने सक्तीची बेडरेस्ट सांगितली. मग दोन्ही भावांची आळीपाळीने माझ्यावर देखरेख असायची. मन गुंतावं, म्हणून मी सतत यूट्यूबवर काही ना काही बघत तरी रहायचे. नाहीतर मन उदास व्हायचं. आणि अंधत्वामुळे मला जे संघर्ष करावे लागले ते माझ्या बाळाला तर नाही ना करावे लागणार या विचारासरशी हुंदके देऊन रडायचे. माझ्या रडण्यामुळे घरातले सगळेच टेन्शन घेतात. हे माहीत असल्याने मी कधी बाथरूममध्ये तर कधी चादर डोक्यावर पूर्णपणे ओढून घेऊन खूप रडायचे. पण, एकदा मम्मीच्या मांडीवर डोकं ठेवून हॉलमध्ये लोळत असताना अचानक ह्या विचाराने गाठलं आणि कढ आवरणं अशक्य झालं. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराच लागल्या. तिने म्हटलं, “बाळाचा विचार करून रडतेस का? तुला माझ्यापेक्षा कितीतरी अधिक लोक माहिती आहेत ज्यांना स्वतःला दिसत नाही. पण त्यांची मुलं व्यवस्थितपणे बघू शकतात. मग, तू असा नकारात्मक विचार मनात का आणतेस? बाळ व्यवस्थितच असेल असा विचार करत जा. आणि एक वेळ, तुझ्या बाळाला अपंगत्व आलंच, तर त्याला कसं सामोरं जायचं, यासाठीचे सारे पर्याय तुझ्याकडे असणार आहेतच ना? आमच्या तर ध्यानीमनी नसताना तुला हे अपंगत्व आलं. तू शिकू शकतेस हे तर दूरच राहिलं. मी स्वतः शिक्षिका असून तुझ्यासारख्या मुलांसाठी विशेष शाळा असतात हेही मला माहीत नव्हतं. आम्ही जर तुला एवढं सक्षम बनवण्यात हातभार लावू शकतो, तर तू सगळंच करू शकतेस. मग एवढं नकारात्मक राहण्यात काय अर्थ आहे?” मम्मीचं बोलणं ऐकून मी शांत झाले. "तुझ्या बाबतीत मला काहीच कल्पना नव्हती" हे तिचं सांगणंच किती दुखरं बोचरं होतं! मी तरीही विचारलंच, “तेव्हा तुम्ही दोघांनी कसं सांभाळलंत मला? आणि स्वतःला?” ती मनात, साचून ठेवलेलं सांगत राहिली आणि मी वाढलेल्या पोटावर हात फिरवत ते त्रास मनाच्या गाभ्यातून समजून घेत राहिले.
- अनुजा संखे 

No comments:

Post a Comment