Saturday 24 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 11

आई झालं की, कसं वाटतं? असा प्रश्न माझ्या एका मैत्रिणीने विचारल्यावर, ओजस आल्यापासून माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत काही बदल झालाय का, यावर मला जाणवलं आहे, या न त्या निमित्ताने मी सतत कोणावर तरी अवलंबून होते. अशी कितीतरी कामं होती, जी इतरांच्या मदती वा सल्ल्याशिवाय एकटीने करणं शक्य नव्हती. किंवा करणं शक्य असलं तरी करण्याची मोकळीक नव्हती. म्हणजे कोणाची तरी गरज असणं, हे माझ्यासाठी बंधनकारक होतं. अशा वेळी, आपलं दुसऱ्यावर अवलंबून असणं खूपच मानसिक क्लेश देणारं ठरतं.
अशात जेव्हा ओजस माझ्या मांडीवर आला आणि स्वतःहून दूध पिऊ लागला, तेव्हा मनात अगदी आत एका सुखाच्या भावनेचा जन्म झाला. जे मानसिक त्रास आजवर झाले होते, त्यांचं विसर्जन त्याच्या जवळ असण्याने, त्याला खरी माझी गरज असल्याच्या जाणिवेने झालं. त्याच्या लेखी आज मला जेवढं महत्त्व आहे, तेवढं अन्य कोणी कधीच दिलेलं नाही, या भावनेने मला पान्हा फुटला. आई मुलांच्या बाबतीत का एवढी पजेसिव असते, याचं मूळ सापडल्यासारखं झालं. त्याचं दिसामासाने वाढणं हे माझ्यासाठी अगदी नवीन होतं. भरतला त्याच्या भावांची तीन मुलं वाढताना जवळून बघता आल्याने तो थोडा तरी ट्रेन्ड होता असं म्हणता येईल. पण, मला त्याचा बिलकुलच अनुभव नव्हता. शेजाऱ्यांची मुलं असल्यावर कुठे आपल्याला त्यांचं काही करावं लागतं? खेळवण्यापुरतं आणलं की, झालं.
एक गंमत इथं सांगायलाच हवी. ओजस झाला. आणि आम्ही अजून हॉस्पिटलमध्येच होतो. भरत माझ्याजवळ असल्याचं पाहून मम्मी आणि आई दोघी चहा प्यायला आणि पाय मोकळे करायला म्हणून खाली गेल्या. ओजस माझ्या मांडीवर पहुडला होता. भरतने आपल्या हातात त्याचा हात धरून ठेवला होता. आम्ही गप्पा मारत होतो. अचानक ओजसने तार सप्तकातला सूर लावला. मी तोपर्यंत एकट्याने, त्याला उचलायलाही शिकले नव्हते. भरतला सांगून बघितलं, तर त्यालाही एवढ्या लहान बाळाला कसं उचलायचं, ते माहित नव्हतं. एकूण काय तर कोणीही असं नव्हतं, ज्याला आम्ही विनंती करून बाळाला उचलून घेऊ शकलो असतो. त्याचं रडणं तर मिनिटामिनिटाला वाढतच होतं. आम्ही खूपच घाबरलो. दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. पण, त्याला शांत करणं काही जमलं नाही. मम्मीच्या फोनवर भरतने फोन केला आणि बाळ खूप रडतंय, तर तुम्ही लगेचंच वर या, असंही सांगून टाकलं. मम्मी आणि आई फूल टेन्शनमध्ये वर आल्या आणि पाहतात तर काय की, ओजस, मी आणि भरत तिघंही घळघळा रडतोय. मम्मीने त्याला उचललं. त्याच्या मानेखाली माझा हात सरकवला आणि दुधाशी नेलं. त्याने एकही क्षण न दवडता चुटुक चुटुक दूध प्यायला सुरुवात केली. मम्मी नंतर खूप ओरडली. आणि त्या दोघी आम्ही रडतोय म्हणून हसतसुद्धा होत्या. हे आणखी वेगळंच! आज ही गोष्ट आठवली की, खूप हसू येतं पण, रडत्या बाळाला घेता न येणं हे कुठेतरी मनात टोचलंच!
तो दहा महिन्यांचा झाला आणि आम्ही एकट्याने संसाराची जबाबदारी घेतली. ऑफिसचा पहिला दिवस अजून स्पष्ट आठवतो. आदल्या दिवशी पाळणाघर शोधून, त्या ताईशी सगळं ठरवून आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी तयारी करून, झोपेतल्या ओजसला भरतने खांद्यावर घेतलं आणि मी आमची पांढरी काठी हातात घेऊन पुढे चालत पाळणाघरात गेलो. ताईच्या हातात, तान्ह्या ओजसला देताना गळा दाटून आला होता. त्याला तिची कणभरही ओळख नव्हती. पण, ती आपल्या आश्वस्त स्वरात मला समजावत राहिली. मी मन घट्ट केलं आणि तिच्याकडे पाठ फिरवली. सकाळी ८ वाजता सोडलेल्या ओजसला मी थेट संध्याकाळी सव्वा पाचला मांडीवर घेतलं. मी आले, तेव्हाही झोपेतच होता पण, कसं कोण जाणे त्याने मला ओळखलं. तो सताड डोळे उघडून माझ्याकडे दोन क्षण बघत राहिला आणि रडायला लागला. त्याला शांत करताना मीही रडतच होते. त्याला लगेच छातीशी घेतलं आणि पुन्हा पुन्हा भरून येणारे डोळे पुसत राहिले. लबाड! तोंडावरची ओढणी बाजूला करून ताईकडे पाहून हसायलाही लागला होता. दुसऱ्या दिवशीही याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आणि संध्याकाळी बेफाम तापाने ओजस अक्षरशः फणफणला.
नव्या घरात येऊन नुकतेच दोन चार दिवस झालेले. कोणाशीच ओळख नाही. मम्मीला बोलवावं तर तिला एवढ्या रात्री ताबडतोब निघून ये सांगणं म्हणजे तिला प्रचंड मानसिक ताण दिल्यासारखं होणार होतं. बाळाला एवढा ताप असला की, त्याला ओल्या कपड्याने पुसून घ्यावं एवढंही आम्हाला माहित नव्हतं. काय करावं ते कळेना. शेवटी शेजारच्यांचा दरवाजा ठोठावण्याशिवाय पर्याय नाही हे कळून चुकलं. बाळाचे तर डोळेही उघडत नव्हते. अत्यंत घाबऱ्याघुबऱ्या मी समोरच्या काकडे कुटुंबियांचा दरवाजा वाजवला. इथपासूनच माणुसकीच्या नात्याने मदतीला म्हणून आलेल्या अश्विनीताईंसोबत कायमचे, मनाच्या कुपीत हळूवारपणे जपून ठेवावेत असे ऋणानुबंध निर्माण झाले.
 - अनुजा संखे

No comments:

Post a Comment