Tuesday 20 February 2018

रेशीमशेतीचा धागा सुखाचा...


"दुष्काळाने बरचं काही शिकवलं. रेशीम शेतीची वाटही दुष्काळानेच दाखवली." बीडमधल्या सोनीमोहा गावचे संदीपान तोंडे सांगत होते.
बालाघाटाच्या डोंगरकुशीत वसलेलं,धारूर तालुक्यातल्या बीड जिल्ह्यातलं सोनीमोहा. तीन हजार लोकसंख्या. इथल्या ८० टक्के गावकर्‍यांचं ऊसतोडणी हेच मुख्य काम. ७५० हेक्टर शेतीजमीन. मात्र सगळी मुरमाड. त्यामुळे पिकांचं उत्पादन कमीच. वर्षातले सहा महिने ऊसतोडणीसाठी स्थलांतर, पश्चिम महाराष्ट्रात, कर्नाटकात.
या स्थलांतरामुळे आरोग्यापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत अनेक प्रश्न उभे राहायचे. खरीप, रब्बीच्या पारंपरिक पिकांभोवतीच इथली शेती फिरत होती. जेमतेम उत्पन्न हाती पडायचं. मुरमाड जमिनीमुळे रताळ्यांचं सर्वाधिक उत्पादन निघायचं पण त्याची उपवासाच्याच काळात विक्री होत असे, तेवढीच. त्यामुळे काही वर्षांपूर्वी कमी पाण्यावर येणाऱ्या तुतीच्या लागवडीकडे गावातले रावसाहेब मुळे, सुदाम साठे, विठ्ठल भोसले हे शेतकरी वळले.
चार वर्षांपूर्वी त्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला. बंगळूरु, रामनगर इथं रेशमाच्या कोषांची विक्री करून एकरी दीड ते दोन लाख रुपयांचं उत्पन्न मिळू लागलं. त्यांची ही प्रगती पाहून गावातले ८० शेतकरी रेशीम शेतीकडे वळले. त्यांना रेशीम संचालनालयाचे मार्गदर्शन मिळत आहे.
तुतीच्या पानापासून रेशीम कोष तयार होतात. अंडीपुंजापासून एक महिन्यात हे कोष तयार करण्यात येतात. यासाठी किटकांना दिवसातून दोन वेळा तुतीचा पाला टाकण्यात येतो. हे कोष विक्रीयोग्य झाल्यानंतर बंगळूरु,रामनगर येथे प्रति क्विंटल ४० ते ४५ हजार रुपये भाव मिळतो.
कोषांना चांगला भाव मिळू लागल्यानं सोनीमोहा गावात रेशीम शेतीची चळवळच सुरू झाली. पीकपेऱ्यात बदल झाला अन् गावाचं चित्र पालटलं.
रेशीमशेतीने साथ दिल्याने अनेकांच्या हातातला कोयता सुटला. ऊसतोडणीपेक्षा अधिक पैसा यात मिळू लागल्याने आर्थिक स्थैर्य आलं. स्थलांतर थांबलं, आराेग्य सुधारलं, कुटुंबाबरोबर स्थलांतरीत होणारी मुलं शाळेत जाऊ लागली, मुलींचंही शिक्षण सुरु झाले. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतूनही रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना प्रति एकरी २ लाख ९० हजार रुपये मिळतात. यंदा २० शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. विठ्ठल भोसले, प्रल्हाद तोंडे, लक्ष्मण तोंडे, गोपीचंद साठे, नवनाथ भोसले, बळीराम दराडे, सुभाष तोंडे, भास्कर तोंडे, पांडुरंग तोंडेे यांनी ऊसतोडणी थांबवली असून त्यांच्यासाठी रेशीमशेतीचा धागा सुखाचा ठरला आहे.

अमोल मुळे.

No comments:

Post a Comment