Saturday 17 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -9

मी शिक्षण व्यावसायिक पद्धतीने घेतलं असलं, तरी नोकरी मिळणं तितकंसं सोपं नव्हतं. अनेक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी माझ्या नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करण्याच्या निर्णयाचं खूप कौतुक केलं. पण, पूर्ण वेळ पत्रकार म्हणून नोकरी द्यायची हिंमत कोणीही दाखवली नाही. तिथं माझं अंधत्वच आड आलं. पण, तरीही कधी या वाहिनीवर तर कधी त्या वृत्तपत्रातून इन्टर्नशिप करत मी अनुभव मिळवत राहिले.
हा खटाटोप चालू असतानाच पीजी डिप्लोमा इन मिडिया ऍंड डिसेबिलिटी कम्युनिकेशन या कोर्ससाठी माझी निवड झाली मी पुन्हा पूर्णवेळ विद्यार्थिनीच्या भूमिकेत शिरले. याच डिप्लोमाच्या आधारे मला बंगलुरूमधल्या एका फंडिंग एजन्सीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळाली असं म्हणता येईल.
भारतातल्या निरनिराळ्या राज्यातल्या ग्रामीण भागातल्या एनजीओंना फंड देऊन त्यांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या अंधअपंगांसाठी काम करवून घेणं असा फंडिंग एजन्सीचा उद्देश. मी प्रोग्रॅम ऑफिसर म्हणून २०१३ च्या जानेवारीत रुजू झाले. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि माझ्यामागे ठामपणे उभं असण्याच्या जाणिवेने, बंगळूरूसारख्या सर्वस्वी भिन्न असलेल्या शहरात आत्मविश्वासाने एकटी वावरू शकत होते, त्या माझ्या पप्पांना मे महिन्यात, काळाने कायमचं हिरावून नेलं. पप्पांचं नसणं हे मी समजूच शकत नव्हते. म्हणजे पप्पांच्या नंबरवर फोन करायचा आणि पुन्हा पप्पा कधीच ‘हॅलो बेटा’ म्हणणारंच नाहीत हे समजण्यापलीकडचं होतं माझ्यासाठी. त्यांना कधीच भेटता येणार नाही हे तर स्पष्टच होतं. पण, इतरांप्रमाणे, मी त्यांना फोटोंमधूनही पाहू शकणार नसल्याची जाणीव अक्षरशः जीवघेणीच होती.
आम्हा पाच जणांच्या कुटुंबात माझं अंधत्व आणि त्यामुळे भावनाप्रधान असलेलं मन समजू शकणारे माझे पप्पाच गेले होते. परत कधीच न येण्यासाठी. “हिच्या जागी आपली डोळस मुलगी असती आणि जर तिला उच्च शिक्षणानंतर बाहेरगावी नोकरीनिमित्त जावं लागलं असतं, तर? तर, आपण तिला थांबवलं असतं का?” त्यांनी मम्मीला विचारलेल्या एका प्रश्नानेच माझं भविष्य साकारू शकणाऱ्या नोकरीत रुजू होण्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामुळेच की काय, कोण जाणे! त्यांच्या जाण्यानंतर मी त्या नोकरीत रमूच शकले नाही.
बंगलोरला आले आणि पप्पा कायमचे दुरावले ही जाणीव सतत मन कुरतडत राहायची. मी कसंबसं एक वर्ष पूर्ण केलं आणि नोकरी सोडून पुन्हा बोइसरला आले. याच काळात भरतला बॅंकेत नोकरी लागली आणि आमच्या लग्नाचं घरच्यांनी मनावर घेतलं. घरात कोणाचा मृत्यू झाला की, वर्षभरात लग्न करावं यावर दोन्ही घरच्यांचं एकमत झालं. २०१४ च्या फेब्रुवारीत आमचं लग्न झालं आणि कॉलेजपासूनच्या आमच्या प्रेमाला एका सुंदर नात्याचं कोंदण मिळालं. त्यावेळच्या अवस्थेचं वर्णन सुखदुःखाचा मिलाफ असं करता येईल.

 - अनुजा संखे

No comments:

Post a Comment