Tuesday 27 February 2018

स्वयंउदयोगातून 'समृद्धी'


अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं राहणारे विपुल कुलकर्णी. अनेक नोकऱ्या करूनही जीवनात स्थैर्य काही येत नव्हतं. एका डेअरी फार्मवर व्यवस्थापक म्हणून काम करताना मनात विचार आला, 'आपणच आपला उद्योग का सुरू करू नये?' आणि तिथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. दूध आणि दुग्धजन्य उत्पादनाचा त्यांचा 'समृद्धी' ब्रॅण्ड आज पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

तीन वर्षांपूर्वी विपुल यांनी संकरित गायींची खरेदी केली. व्यवसाय सुरू करण्याआधी संगमनेर, राहुरी, राहाता इथल्या डेअरी फार्मची पाहणी करून त्यातले बारकावे त्यांनी जाणून घेतले. उत्तम व्यवस्थापनातून दर दिवसाला चांगलं दूध संकलन होऊ लागलं. सहा महिन्यांनंतर पुन्हा गायी आणल्या. सध्या विपुल यांच्याकडे 63 संकरित गायी असून दररोज सरासरी पाचशे लिटर दूध उत्पादन होतं. याशिवाय नातेवाईकांकडून अडीचशे ते तीनशे लिटर दूध विकत घेऊन त्याची ते विक्री करतात. दररोज साधारण साठ लिटर दुधावर प्रक्रिया करुन खवा, तूप, ताक, दही, श्रीखंड, लस्सी तयार करतात. जामखेड शहरात त्यांचं विक्री केंद्र आहे. लग्न, समारंभांसाठी त्यांच्या पदार्थांना मोठी मागणी असते. सकाळी सहाला सुरू झालेले विक्री केंद्र रात्रीपर्यंत सुरू असतं .



विपुल यांनी नियोजनपूर्वक आपला व्यवसाय विस्तारला. त्यांनी जामखेडमध्ये साडेसात एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली . वर्षाला एकरी बारा हजार रुपयांचं भाडं ते त्यासाठी देतात. तिथे गायींसाठी पाच लाख रुपये खर्च करून अर्ध्या एकरवर शेड उभारणी केली . गायींना मुक्त संचार करता यावा म्हणून शेडजवळच जागा केली आहे. गोठ्यातील शेण, मुत्राचं एका जागी संकलन केलं जातं. यातून निर्माण होणारं शेणखत दोन हजार रुपये प्रति ट्रॉली दरानं विकलं जातं . त्यातून पहिल्या वर्षी सव्वा लाख तर दुसऱ्या वर्षी पावणेदोन लाख रुपये मिळाले.
भाडेतत्वावरच्या अडीच एकरात चाऱ्यासाठी त्यांनी ऊस लागवड केली आहे. हा सगळा चारा ते विकत घेतात. कुट्टी यंत्राचा वापर करून तो जनावरांना देतात. सुरुवातीला चाऱ्याचा शोध घ्यावा लागायचा. आता चारा उत्पादकच थेट संपर्क करतात. शिवाय पाऊस व अन्य अडचणीच्या वेळी वापरात यावा म्हणून परिसरातून कडब्याची खरेदी केली जाते. जामखेड तालुक्‍यात कायम दुष्काळी स्थिती असते. कुलकर्णी यांच्या डेअरी फार्मवर शेतमालकाने पाण्याची सोय केली आहे. तरीही दुष्काळात पाणीटंचाई भेडसावलीच. त्या काळात दोन महिने दररोज दीड हजार रुपयांचं पाणी विकत घेऊन त्यांनी ते जनावरांना दिलं आणि व्यवसाय टिकवला.
व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला वर्षभर संस्थेला दूध दिलं. मात्र नफ्याचं प्रमाण वाढवायचं तर थेट विक्रीला पर्याय नाही हे त्यांनी ओळखलं. त्यातूनच जामखेडमध्ये थेट विक्री सुरू केली आणि दूध व उत्पादनांचा "समृद्धी' ब्रॅन्ड विकसित केला. हा व्यवसाय फळफळण्यात विपुल यांचे बंधू वैभव आणि पत्नी व भावजयीचाही वाटा आहे.
खवा, पनीर निर्मितीसाठी त्यांनी पॅकेजिंगचं यंत्र घेतलं आहे. व्यवसाय सुरू केल्यानंतर दोन वर्षांचा पशुवैद्यकीय डिप्लोमाही त्यांनी केला. येत्या काळात ग्राहकांच्या मागणीनुसार देशी गीर गायी खरेदी करून त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न आहे. व्यवसायासाठी विपुल यांनी बॅंकेकडून तेरा लाखांचं कर्ज घेतलं होतं. व्यवसायातील उत्पन्नातून त्यांनी ते केवळ अडीच वर्षात फेडलं. आता त्यांनी पुन्हा लाखांचं कर्ज घेतलं आहे. जिल्हा परिषदेतर्फे त्यांचा आदर्श गोपालक म्हणून गौरव झाला आहे.
 --- सूर्यकांत नेटके

No comments:

Post a Comment