Saturday 24 February 2018

एक आत्महत्या टळली; नवी वाट गवसली


जिल्हा नाशिक. तालुका निफाड. इथल्या खेरवाडी (नारायणगाव) इथल्या एका शेतक-याची ही गोष्ट. दिनकर बाकेराव संगमनेरे. द्राक्ष उत्पादक. बी.कॉम. नोकरी न करता दिनकर यांनी वडिलोपार्जित साडे तीन एकर शेती करण्याचा निर्णय घेतला होता. दोन एकरात द्राक्ष. आणि दीड एकरात भाजीपाला आणि इतर पिकांचं उत्पादन ते गेल्या अनेक वर्षापासून घेत आहेत. सगळं छान सुरळीत होतं.
मात्र, मागच्या पाच-सहा वर्षांपासून सतत पडणा-या दुष्काळामुळे आणि वातावरणातल्या बदलामुळे त्यांना शेतीत सतत प्रचंड नुकसान सहन करावं लागलं.
द्राक्षाच्या फळधारणेच्या काळात अतिवृष्टी, विविध रोग यामुळे उत्पादनाचा दर्जा खराब व्हायला लागला. उत्पादन घटलं. खर्चापेक्षा उत्पादन कमी. डोक्यावरचं कर्ज वाढू लागलं. सहकारी सोसायटींचं साडेतीन लाख, स्थानिक पतसंस्थांचं दोन लाख, सोनं तारण आणि पाहुणे, मित्रपरिवार, दुकानदार या सगळ्यांचं मिळून दहा लाख रूपयांचं कर्ज झालं.
शेती पिकत नसल्याने, हे कर्ज फेडायचं कसं? हा मोठा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा ठाकला. देणेदार पैशासाठी तगादा लावू लागले. पाहुणे, मित्र सगळ्यांनीच पैशाची मागणी सुरु केली. कुणी त्यांना सावलीला उभं करत नव्हतं. एकीकडे शेतीत राबणं सुरु होतं. गेल्या वर्षी तर दिनकररावांची परिस्थिती अधिकच गंभीर झाली. शेती पिकली नाही. कर्जाचं व्याज वाढत होतं. रात्रंदिवस फक्त कर्ज आणि देणेकरी डोळ्यासमोर येऊ लागले. झोप, अन्नावरची वासना उडाली. जे कालपर्यंत चांगले वागणारे जवळचे लोकदेखील पदोपदी अपमान करू लागले. हे सगळं बघून दिनकररावांची सहनशक्ती संपू लागली होती. निराशा मनात खोल घर करू लागली. त्यातचं निफाड तालुक्यात रोज अनेक शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या त्यांच्या कानावर येत होत्या. आता आपल्यालाही हाच मार्ग, या विचाराने त्यांना घेरलं.
याचं काळात कौस्तुभ या त्यांच्या मोठ्या मुलाने दहावीत 87 टक्के गुण घेतले. तर दुसरा मुलगा अंगद हा देखील विशेष प्राविण्यासह सहावी उत्तीर्ण झाला. या दोन्ही मुलांना दिनकरावांनीच कधीतरी आयएएसचं स्वप्न दाखवलं होतं. आता दोन्ही मुलं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत होती. नैराश्याच्या गर्तेतही, एका क्षणी, आपल्या माघारी या मुलांचं काय होणार, असा विचार त्यांच्या मनात आला. आणि त्याच क्षणी त्यांनी आत्महत्येच्या विचाराला मूठमाती दिली. तोच क्षण त्यांच्या आयुष्याचा टर्निग पाईंट ठरला. मी माझ्या मुलांना, कुटुंबाला निराधार करणार नाही. असा त्यांनी पक्का निश्चय केला.
दिनकर सांगतात, “पुन्हा माझं विचारचक्र चालू झालं. शेती पिकत नाही, तर मग या परिस्थितीतून मुक्त होण्याचा दुसरा मार्ग कोणता?” हा विचार करत असतानाचं त्यांच्या डोक्यात आलं की, आजकाल शहरांप्रमाणे खेडयातही ब्रेड, खारी, टोस्ट, बिस्कीट या बेकरी पदार्थांना खूप मागणी आहे. आपण हेच पदार्थ ग्रामीण भागात विकायचे. त्यातूनचं ‘स्वाभिमान मोबाईल बेकरी’ची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. चांगल्या दर्जाचा माल विकत घ्यायचा आपल्या गाडीवर निफाड तालुक्यातल्या खेडेगावांत विकायचा. अर्थात हे सगळं करायचं तर पुन्हा पैसा हवाच. पैसे कुठून आणायचे? डोक्यावर आधीचं लाखोंचं कर्ज; अजून पैसे कोण देणार? या परिस्थितीतही शंकरराव आवारे आणि सतीश संगमनेरे हे मित्र मदतीला धावून आले. गाडीवर माल वाहून नेण्यासाठी स्टँड आणि माल खरेदीसाठी पाच-पाच हजार रुपयांची मदत केली. दिनकररावांनी गाडीला स्टँड बसवले. शहरातून उत्कृष्ट दर्जाचा माल खरेदी केला. आणि ‘स्वाभिमान मोबाईल बेकरी’ सुरु झाली.
दिनकररावांचं वेगळेपण इथंही दिसून आलं. निराश झालेल्या शेतक-यांना व्यवसायाकडे वळण्याचा, आत्महत्या न करण्याचा संदेश द्यायचा असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी आपल्या गाडीच्या स्टॅडला बोर्ड लावला. त्यावर त्यांनी कर्जबाजारी शेतक-यांसाठी एक संदेश लिहिला– “मी एक शेतकरी, दिनकर बाकेराव संगमनेरे, कर्जबाजारी शेतकरी, कर्ज फेडण्यास असमर्थ म्हणून मी हताश नाही झालो, पोटाची खळगी भरण्याकरिता जसा मी व्यवसाय निवडला त्याचप्रमाणे माझ्या असंख्य शेतकरी बांधवाना माझे हेच सांगणे आहे, की आपणसुद्धा कोणत्याही व्यवसायाची संकल्पना मनात राबवा व तिला सुरूवात करा, परंतु चुकूनही आत्महत्या करू नका”.
दिनकररावांचं आयुष्य आता अगदी बदलून गेलं आहे. त्यांच्या या उपक्रमाचं शेतक-यांनी मनापासून स्वागत केलं. काही दिवसात त्यांचा या व्यवसायातील नव्वळ नफा दीड ते दोन हजार रूपयांवर गेला आहे. दिनकर बाकेराव संगमनेरे या शेतक-यानेे नवी वाट शोधून काढली. स्वतःचं, कुटुंबाचं जीवन तर सावरलंच. आणि नाशिक जिल्ह्यातल्याच नव्हे, तर राज्यातल्या सर्वच शेतकऱ्यांना कृतीतून नवी दिशा आणि प्रेरणा दिली आहे.
- उन्मेष गौरकर.

No comments:

Post a Comment