Thursday 8 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं-2


अक्षरशः फिल्मी स्टाइलमध्ये डॉक्टर म्हणाल्या, “अनुजा, कॉंग्रेजुलेशन्स! तुला मुलगा झालाय.”
माझी प्रतिक्रिया होती, “काय? मला मुलगा झालाय. अरे! मला मुलगी हवी होती.”
त्यावर डॉक्टरांनी मुलगी झाली, म्हणून तोंड फुगवणाऱ्या बायका, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणारे कुटुंबीय अशी उदाहरणं दिली आणि बाळाला पुसून नर्सच्या हातात ठेवलं. काही मिनिटातच तिनं भरतला बाळ दाखवलं. भरतने भावाच्या तिन्ही मुलांना वाढवण्यात सहभाग जरूर घेतला होता. पण, त्यानेही अगदी तान्हं बाळ कधीच बघितलं वा हाताळलं नव्हतं. ओजसला पहिल्याच वेळी दूध पाजताना काय वाटलं ते शब्दात लिहिण्यासारखं नाहीच मुळी. त्या एका स्पर्शाने मी पूर्ण स्त्री झाले असं काहीसं मला जाणवलं. दोन सिस्टर मला त्याला दूध पाजायला मदत करायच्या. त्यांनी मम्मीलाही ती पद्धत शिकवली. त्यानंतर जवळजवळ पंधरा दिवसांनी त्याला व्यवस्थित, स्वतंत्रपणे मला दूध पाजायला जमू लागलं.
खरं तर, हे सगळं एवढं विस्ताराने लिहावं का? असंही बऱ्याच मैत्रिणींना वाटू शकेल. पण, एक दृष्टीहीन व्यक्ती नेमकं काय करू शकते आणि काय नाही याबाबत खूप शंका-कुशंका असतात.
बाळंतपण मुलीच्या माहेरी ही आपल्याकडची पद्धत. त्यामुळे घरातली सगळीच माणसं सतत तिच्या अवतीभोवती असतात. यातून आपोआपच धाकट्या बहीण भावंडांचंही प्रात्यक्षिकांसह संपूर्ण ट्रेनिंगच होतं. तान्ह्या बाळाला कसं पकडायचं, अंघोळ कशी घालायची, त्याला दुपट्यात कसं बांधायचं इथंपासून ते त्या शी-शू साफ करून त्याला झोपवायचं कसं इथंपर्यंत घरातली मुलगीच नव्हे, तर पुरुष मंडळीही शिकतात. पण, दृष्टीहीन लोकांना हे सहज शक्य नसतं.
मुळात हे शिक्षण निरीक्षणातून मिळतं. तेच अंध व्यक्तीला शक्य नसतं. त्यांना हे सर्व हाताने दाखवून शिकवण्याची गरज असते. मलाही यातली कोणतीच गोष्ट शिकायला मिळाली नाही. मम्मी आणि आजी दोघीच बाळाचं सर्व काही करत होत्या. इच्छा असूनही, दूध पाजण्यापलीकडे मी काहीही करू शकले नाही. माझे धाकटे भाऊ या सगळ्यात छान तरबेज झाले. इतकं, की सहा महिन्याच्या बाळाला त्यांच्यावर सोपवून आम्ही जॉबला जाऊ शकत असायचो. कधी हा तर कधी तो असं करून त्यांनी काही दिवस माझ्या बाळाला आंघोळ, खाणंपिणं सारं केलं आहे.
मला लहान मुलांची खूप आवड. मी सातवी आठवीला असतानाची ही गोष्ट. आमच्या बिल्डिंगमध्ये एक कुटुंब नुकतंच राहायला आलेलं. त्यांचं सात महिन्याचं बाळ होतं. अगदी आवडीने मी त्याला घ्यायला जात असे. पण, त्यांनी स्वतःहून कधीही मला बाळ हातात दिल्याचं आठवत नाही. शेजारच्या मुलींनी ते बाळ घेतलं की, मी त्यांच्याकडून ते घेत असे. पण, त्यांचं वागणं मला बोचायचं. एकदा माझ्या मैत्रिणीकडून मला कळलं की, माझ्यामुळे काही अपाय होईल किंवा अपघाताने बाळाचीही दृष्टी जाईल अशी भिती त्या कुटुंबाला वाटते. त्यांना नेमकं काय म्हणायचंय ते न कळण्याएवढी मी अजाण नव्हते. माझं अंधत्व त्यांना भितीदायक वाटत होतं. अजाणता मी त्यांच्या बाळाला घेऊन पडलेच तर?... त्यांची भीती अवाजवी मुळीच नव्हती. अपघात कोणालाही आणि कधीही होऊ शकतो.
पण, मला दिसत नाही म्हणून माझ्यासोबत राहिल्याने त्या बाळाला अंधत्वाची
बाधा होईल, ही भीती मात्र चूक आणि अमानुष होती. त्यांची भीती काढायची म्हणून असेल किंवा मला नकळत दुखावल्याच्या रागातून असेल पण, त्यांना सतत हुरहूर लावून ठेवायचं काम मी करत असे. त्या बाळाला सतत घेऊन फिरवायचे.
आणखी एक असाच प्रसंग. आमच्या निवासी शाळेतल्या एका आयाकडे गूड न्यूज असल्याचं कळलं. बाळ होणार म्हटल्यावर आम्हा मुलींना त्यांच्याबद्दल अपार ओढ आणि उत्सुकता वाटायची. त्यांचा सातवा-आठवा महिना चालू असावा. एकदा जिन्यातून उतरताना माझा हात त्यांच्या पोटाला लागला आणि मी आनंदून जाऊन विचारलंही, “आता कधी बाळ होणार?” त्यांनी एकदम माझा हात पकडला आणि म्हणाल्या की, “अगं असा पोटाला हात लावायचा नसतो. माझं बाळही तुझ्यासारखं ब्लाइंड होऊ शकतं.” या शब्दांनी आधी मी घाबरून गेले. पण थोडासा विचार केल्यावर मला हे काही केल्या पटेना.
सतत अंध मुलींमध्ये वावरणाऱ्या या स्त्रीचं मन कोणी आणि कसं तयार करावं?
कसं त्यांना समजवावं? अंधश्रद्धा आहे सांगून जर समजलं असतं, तर आपला समाज
श्रद्धा आणि अंधश्रद्धा या संघर्षात पिचला गेला असता का?
 - अनुजा संखे

No comments:

Post a Comment