Friday 16 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -7

दहावीत असतानाच, पुढे काय करायचं, असा प्रश्न मनात येई. पण, तेव्हा काहीच सुचायचं नाही. मोठे विचारायचे, त्याला उत्तर एकच. कॉलेज करायचं. मी चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण झाले. आणि माझ्या शाळेपासून जवळ असलेल्या रुइया महाविद्यालयात दाखल झाले. शाळेच्या छोट्या, मर्यादित आणि बंदिस्त जगातून बाहेर पडण्याची संधी म्हणजे हे कॉलेजजीवन होतं. आठवी ते दहावी जरी आम्ही सरस्वती हायस्कूल, नायगाव या डोळस मुलांच्या शाळेत जात असू. तरीही डोळस मुलांमध्ये वावरणं तेवढंसं शक्य व्हायचं नाही.
‘या मुलींना कसं दिसत नाही’! असं आश्चर्य मुलांना सतत असायचं. शाळेत मुलं आणि मुली वेगळे बसत. खूपच कमी मुली दृष्टीहीन विद्यार्थीनींशी मैत्री करण्याची इच्छा असणार्‍या. खरं तर, दृष्टीहीन विद्यार्थिनींना जवळ घेऊन बसा म्हणून प्रत्येक वेळी त्यांना सांगावं लागे. माझी दोघीतिघींशी छान मैत्री झाली होती. त्या मला माझ्या कविता देवनागरीत लिहून द्यायच्या अशी आठवण मी जपून ठेवली आहे. शाळेच्या अशा वातावरणातून कॉलेजमधल्या मोकळ्या वातावरणाला सरावण्यातच वर्ष गेलं.
माझ्या शाळेत जरी एकट्याने चालायला शिकवलं असलं तरी पहिल्याच दिवशी एकटीने घरी येताना उडालेली धांदल शब्दात सांगण्यासारखी खचितच नाही. हा एकटेपणा वर्गात लेक्चर्स अटेंड करताना खूपच अंगावर यायचा. प्राध्यापक वर्गात आले की, त्यांच्या विषयावर काहीतरी बोलत आणि प्रत्येकाला आपल्या परिचय देण्यास सांगितलं जाई. आम्ही जेवढे म्हणून दृष्टीहीन विद्यार्थी वर्गात असू तितक्यांना सर्वात पुढल्या बाकावर बसवलं जात असे. गंमत अशी की, कमी मुलं वर्गात असली की, ती एकदम मागचे बेंच पकडून बसत असत पण, आम्ही मात्र पहिल्याच बेंचवर बसायचं हा नियम होता. हा ना कोणत्या प्राध्यापकांनी घातलेला पायंडा होता ना एखादा नियम पण, चोख बजावला जायचा. त्यामुळे इतर डोळस विद्यार्थ्यांशी मैत्री करण्यात अडचण यायची. क्वचितच कोणी स्वतःहून बोलायला आलं तर...!
राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास यांसारख्या विषयांसाठी नेमलेली पुस्तकं ब्रेलमध्ये उपलब्ध करून घेणं, हे खूपच जिकिरीचं असायचं. मग, सगळा अभ्यास प्राध्यापकांनी दिलेल्या नोट्सवर अवलंबून. वर्गातली अशी कोण व्यक्ती असेल, जी आपल्याला नोट्स देऊ शकेल? याचा शोध
घ्यावा लागे. मग, विनंती करून जर नोट्स मिळाल्याच तर त्या रेकॉर्ड करायला किंवा ब्रेलमध्ये लिहून घेता याव्यात, म्हणून एखादी वाचून दाखवणारी व्यक्ती शोधावी लागे. त्यांच्या वेळा आणि आपल्या वेळा सांभाळत हे काम करताना एवढा वेळेचा अपव्यय व्हायचा की, अभ्यास करणं नकोसं व्हायचं. नोट्स मिळवा, मग त्या कोणाला तरी वाचून दाखवायला सांगा. मग त्या ब्रेलमध्ये लिहा. एका वेळेत जे डोळस विद्यार्थ्यांना उपलब्ध होत होतं तेच आम्हाला तिप्पट वेळ मोजून करावं लागत होतं.
आता मात्र बरेच पर्याय आहेत. पुस्तकंच्या पुस्तकं स्कॅन करून ती सरळ ब्रेलमध्ये प्रिंट करून घेता येतात. जे मोबाईल किंवा कम्प्युटर वापरतात, त्यांना पीडीएफ कॉपी मिळाली की, ते स्क्रिन रिडर सॉफ्टवेअरच्या मदतीने वाचू शकतात. तरीही इतर विद्यार्थ्यांची आणि वाचकांची गरज अधूनमधून भासतेच.
आमच्या ‘सेल्फ विजन सेंटर’तर्फे ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त मोठा, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम केला जातो. याचं आयोजन सेंटरमध्ये येणारे दृष्टीहीन विद्यार्थी करतात. सूत्रसंचलनापासून ते नृत्य, गायन, नाटक, कविता सादरीकरण, कथाकथनापर्यंत सर्व प्रकार आयोजित करण्याबरोबरच सादरही हीच मुलं करतात. माझ्या कॉलेजजीवनाची पाचही वर्षं मी ब्रेल डेच्या कार्यक्रमात सहभागी झाले आणि स्टेज फिअरवर मात करण्याचा पुन्हा पुन्हा सराव होत राहिला.
- अनुजा संखे

No comments:

Post a Comment