Thursday 1 February 2018

मीनाक्षी इनोव्हेटिव्ह!




जिल्हा चंद्रपूर. इथल्या शिंदेवाही तालुक्यातलं सावरगाव. इथं राहणारी मीनाक्षी सोनटक्के. शिंदेवाही इथल्या कॉलेजातून बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच तिचं लग्न झालं. लग्न करून ती चंद्रपुरात आली. पुढं शिकायचं तर नवऱ्याची परवानगी मिळाली होतीच. पण, पुढच्याच वर्षी मुलगा झाला आणि शिक्षण बारगळलं. मीनाक्षी म्हणते, “शिकायचं तर अभ्यासाकडे पूर्ण लक्ष द्यायला हवं. माझं अर्ध लक्ष घरसंसार आणि मुलाकडे असणार. म्हणून मग पुढं शिकण्याऐवजी काय करता येईल याचा विचार सुरु केला.” घरी बसूनच काही उद्योग सुरु करायचं ठरवलं. तेव्हाच पती मुकेश वाळके यांच्याबरोबर राजूऱ्याला जाणं झालं. तिथं ओळखीच्या कुटुंबातल्या मुलीने त्यांना प्लास्टिक, लाकडी कुंकवाचे करंडे दाखवले.
यावर घरच्या घरी या वस्तूंना सजवून त्या विकता येतील, असं सांगितलं. असं बरंच तिने मीनाक्षीला सुचवलं. तिथून निघतानाच मीनाक्षीच्या डोक्यातही हा विचार सुरु झाला. आता मुलगाही ५-६ महिन्याचा झाला होता.
महिलांचा खरेदीचा उत्साह पाहून मीनाक्षीने आकर्षक वस्तू तयार करायचं ठरवलं. हे शिकवणार कोण? करणार कसं? आणि सर्वात महत्त्वाचं, मार्केटिंग करायचं कसं? असे अनेक प्रश्न असताना तिने जिद्दीने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला. युट्युबची मदत घेऊन त्यावर बघून बघून हे सर्व बनवण्याचं तंत्र अवगत केलं.
त्यात थ्रेड ज्वेलरीचा प्रयोग केला. यातून नेकलेस, बांगड्या, ब्रेसलेट, गृहसजावटीच्या वस्तू, पूजेची थाळी, चाबी लटकन, मूर्ती सजावट, कुशन, रेडिमेड रांगोळी, पर्स, कागदी फुलं, खेळण्यातील टेडी बेअर, वाण म्हणून देता येण्यासारखे करंडे अशा अनेक गोष्टी तिने बनवायला सुरुवात केली.





लोकांना ते आवडू लागलं. लग्रसमारंभ आणि इतर समारंभांसाठी सजावटीचं साहित्यही तिने शिकून घेतलं. एकदा तंत्र कळलं. त्यात मीनाक्षी स्वतः काही बदल करत गेली. त्यातून काम मिळू लागलं. फेसबूक, व्हाट्सॲप आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना ते माहीत होऊ लागलं. काम वाढलं.
अडीच वर्षाच्या मुलाचा सांभाळ करत दुसऱ्या कुठल्याही मदतीशिवाय ती एकटीच सध्या डेकोरेशनच्या वस्तू बनवते. छोटासा का होईना, स्वतःचा व्यवसाय सुरू करायला आणि स्थिरावायला जे-जे म्हणून आवश्यक आहे, ते परंपरेने मिळत नाही तेव्हा संघर्ष करावाच लागतो. मिनाक्षी तो करत आहे. स्वत: अर्थसंपन्न होऊन इतरांनाही सहभागी करून घेण्याची तिची योजना आहे. यातून ग्रामीण भागातील महिला- मुलींना अधिकाधिक काम मिळावं यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. बाजाराच्या मागणीबरोबर आपणही बदलावं आणि मागणीप्रमाणे उत्पादन करा्वं हा व्यवसायाचा साधा नियम समजून तिचं मार्गक्रमण सुरू आहे.
मीनाक्षीच्या अभिसार इनोव्हेटिव्हला आता महिन्याकाठी १० ते १५ हजारांचा बिझनेस मिळतो आहे. सध्या एकटीच सगळं काम बघत असली तरी हळूहळू परिसरातील मुलींनाही ती हे काम शिकवणार आहे. शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट्रच्या माध्यमातून पुढे शेतकऱ्यांच्या विधवा, निराधार महिला व गरीब मुलींसाठी आपण काम करणार असल्याचंही मिनाक्षी सांगते.

 - प्रशांत देवतळे.

No comments:

Post a Comment