Tuesday 27 November 2018

भारूडकन्या कृष्णाई



तिचं वय अवघं १६ वर्षे. पण तिने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपली ओळख बनवलीय. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील आरळी गावची ही भारूड कन्या म्हणजे कृष्णाई प्रभाकर उळेकर. समाजव्यवस्थेत घडणाऱ्या अघटित घटनांपासून शेतकरी, तरूण पिढी, मुलींच्या शिक्षणापर्यंत ती सगळ्या विषयावर कडक शब्दांत आणि पहाडी आवाजात भारूडातून प्रबोधन करतेय.

अगदी पाचवीला असताना गावच्या शाळेत कृष्णाई नृत्य कलेत भाग घेऊन मंचावर नृत्याविष्कार सादर करीत होती. त्यावेळी गावकऱ्यांनाही तिच्या कलेचं कौतुक वाटायचं. पुढे तिनं भारूड सादरीकरणासाठी डोक्यावर कपड्यांचं गाठोडं, हातात काठी घेतली अन् पाहता-पाहता ती या कलेतून सबंध राज्याला परिचित झाली.
कृष्णाई पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयात कला शाखेत १२ वीत शिकत आहे. त्यामुळे पुण्यातील मोठ्या सांस्कृतिक
                                                                                          कार्यक्रमात तिचे कार्यक्रम होत आहेत. इतक्या कमी वयात भारूड कलेच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या उंचीवर गेलेली कृष्णाई एकमेव युवा भारूडकार असावी. या कलेबद्दल बोलताना ती म्हणाली, “दुसरीत असल्यापासून मला सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायला मिळाला. वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य करत होते. मला नृत्यामध्ये अनेक बक्षीस मिळाली. वक्तृत्व स्पर्धेत, ३ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत तालुका, जिल्हा विभागात पहिला क्रमांक आला होता. वडिलांनी मला ‘नाथांचं भारूड कर’, असा सल्ला दिला. मग मी भारूडाची वेगवेगळी पुस्तकं वाचायला सुरूवात केली. मला नाथांचं ‘बुरगुंडा’ हे भारूड आवडलं. मी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते सादर करायचं ठरवलं. अखेर तो क्षण आला. शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाला. एकापेक्षा एक सादरीकरण होत होते. रात्री १२ च्या दरम्यान अंगावर दंड घातलेली फाटकी साडी, डोक्यावर गठुडं, हातात काठी व त्याला सुया, पिना, फुगे, काळे मणी, कंगवे बांधून मी प्रेक्षकांमधून मंचावर प्रवेश केला. लोक अचंबित झाले. मी मंचावर गेले आणि ‘माझं बयो, तुला बुरगुंडा होईल गं’ ह्या भारूडाचं सादरीकरण केलं. तेव्हा मिळालेल्या प्रतिसादाने मी अक्षरश: भारावून गेले. त्यावेळी वाजलेल्या टाळ्या आणि शिट्ट्यांनी माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. पुढे हेच भारूड घेऊन महाराष्ट्रभर फिरते आहे. राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळतोय. हा प्रतिसाद पाहून माझ्या आई-वडिलांना आनंद झाला. भारूड हे समाज परिवर्तनाचं मोठं माध्यम असून, या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याची संधी मला मिळालीय, याचा मनस्वी आनंद वाटतो.” कृष्णाई म्हणते, “पारंपरिक भारुड लोकांना रूचत नाही, त्यामुळे मी समाजातील ज्वलंत प्रश्नावर भारूडाच्या माध्यमातून समाजप्रबोधन सुरू केलं. यामध्ये स्त्री भ्रूण हत्या, मुलगी वाचली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे, हुंडाबंदी यासह मराठवाड्यातील ज्वलंत प्रश्न असलेल्या दुष्काळावरही प्रबोधन सुरू केलं.” कृष्णाईला या कलेबद्दल राज्य शासनाचा राज्य युवा पुरस्कार मिळाला आहे. अनेक संस्था-संघटनांनी तिचा सन्मान केला आहे. तिच्या कलेबद्दल गावकऱ्यांनाही हेवा वाटतो.


- चंद्रसेन देशमुख.

No comments:

Post a Comment