Saturday 1 December 2018

शर्विलला वाढवताना

आनंदवनाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक, म्हणजे इथे बाळ झाले की, सर्व आपणहून त्याचे करायला पुढे येतात. त्यामुळे एक वर्षाचा झाल्यावर माझा लेक शर्विल, काही वेळ इतरांच्या घरी जाऊ लागला. त्यानंतर गौतमने सांगितले की तू काही वेळ ऑफिसला गेलीच पाहिजेस ज्यामुळे तुलाही थोडी शिस्त लागेल. इथे मी स्वतः;शी ठरवले की, तो घराबाहेर गेला की, आपण ऑफिसला जायचे. आणि इतर नीट सांभाळतील की नाही असा संशय घेत बसायचे नाही. आया नेमक्या इथेच मागे पडतात. बाळाला मनात इतके घट्ट धरून बसतात की, तो काय करीत असेल, समोरचा त्याला
नीट वागवत असेल की नाही, या विचारांतच हरवून जातात. मी मन कठोर करून रुचितावर विश्वास ठेवून त्याला बाहेर पाठवणे सुरु केले. तीही बाळाची उत्तम काळजी घेई. चुका झाल्या तर मी तिला माफ करी. त्यामुळे आमच्या दोघींमध्ये एक उत्तम नाते तर निर्माण झालेच. पण तिलाही बाळाबद्दल एक आपुलकी निर्माण झाली. उरलेल्या वेळात मी वाचन करून शर्विलला त्याच्या वयानुसार पुणे, मुंबई, अमेरिका इथून येणार्‍यांसोबत खेळणी आणि मुख्य म्हणजे अनेक पुस्तके मागवीत असे आणि त्याला वाचून दाखवीत असे. त्याला तिसऱ्या महिन्यातच पुस्तकांची गोडी लागली. सुरुवातीला, तो आवाजाला respond करायचा. दात आले की, पुस्तके खाऊन बघे. मग हळूहळू फेकून आणि फाडून बघू लागला. त्यामुळे एका पुस्तकाशी अनेक पद्धतीने त्याला खेळता येऊ लागले. त्याच्या आजुबाजूला नेहमीच पुस्तके असत. त्यामुळे ती बघण्यात त्याचा भरपूर वेळ जाई. यातून त्याच्यात खूप patience निर्माण झाला. एका जागी एक वर्षाचे बाळ तीन तीन तास बसणे म्हणजे लोकांना कमाल वाटे. पण हे मी मुद्दाम केले कारण उन्ह्याळ्यात आमच्याकडे ४८ डिग्रीमध्ये त्याला बाहेर पाठविणे धोकादायक होते.
त्याला फार लवकर म्हणजे वयाच्या चौथ्या महिन्यापासूनच माती हाताळू दिली. वयाच्या पहिल्या वर्षीपासून रोज मातीत सकाळी दोन तास खेळायला जातो. मातीत खूप antidepressant बॅक्टेरिया असतात त्यामुळे हात खराब करून पोटात जंत होतील, ही कधीच काळजी केली नाही. दर तीन महिन्याला जंताचे औषध दिले पण त्याचे खेळणे बंद केले नाही.
बाबांच्या (बाबा आमटे) जन्मशताब्दी वर्षात, म्हणजे डिसेंबर २०१३ साली जन्मलेल्या माझ्या बाळाच्या हाताने मी दर महिन्याला एक वृक्ष लावायचे ठरवले आहे. तो पाच वर्षाचा होईपर्यंत आम्ही दोघांनी त्याच्या हस्ते साठ झाडे लावली असतील. आणि जर तो पन्नास वर्षाचा होईपर्यंत हे सुरळीतपणे करू शकला तर त्याने सहाशे झाडे लावून किती हजार पशुपक्ष्यांना अन्न व निवारा देऊ शकेल ! दर महिन्याला एकदा झाड लावायचे कारण म्हणजे कितीही अडचणी आल्या, तरी मी समाजाचे व निसर्गाचे काही देणे लागतो हे स्वत:च्या मनावर बिंबवण्यासाठी आणि आयुष्यभर जबाबदारीने ती शपथ पूर्ण करण्याची आठवण राहण्यासाठी. त्याला कदाचित ते जड जाईल. पण आईने मला काय शिकविले हे जेव्हा तो आठवेल तेव्हा, निसर्गाला अन्न व समाजाला ऑक्सिजन या सोप्या शब्दात त्याला माझी स्मृती राहील. या संकल्पनेतून अतिशय प्रखर अश्या तापमानात त्याने आजवर ४१ झाडे तर मी माझ्या गटासमवेत सुमारे आठ हजार झाडे असलेली चार मियावाकी जंगले लावली आहेत.
या सर्व प्रयोगांबद्दल इतरांशी चर्चा करावीशी वाटायची त्यामुळे 'प्रयोगशील पालक' नावाचा एक फार उत्तम whats app ग्रुप आभा भागवतसोबतच्या चर्चेतून सुरु केला. त्यात एकेक विषय घेऊन उत्तमोत्तम चर्चा होतात . त्यामुळे बऱ्याच प्रश्नांना आपसूक उत्तरे मिळू लागली. आभाच्या लेखामधून प्रेरणा घेऊन शर्विलसोबत मी पेंटिंग सुरू केले, त्याला वेगवेगळे खेळ आणून दिले. वयाच्या अडीच वर्षांपासून तो पझल्स करू लागला. सुरुवात आठ तुकड्यांपासून करून साडेतीन वर्षांचा होईस्तोवर तो २०० तुकड्यांचे मोठे पझल सहज करतो. पझल्स आणि लेगोचा फायदा असा की तो एका जागी अनेक तास बसू शकतो तसेच एक पझल तो अनेकदा करतो त्यामुळे पुस्तके आणि पझल्स च्या गराड्यात त्याला सोडून मी सहज आठ तास घराबाहेर राहू शकले. आज तो एक उत्कृष्ट ऍबस्ट्रॅक्ट पेंटर म्हणून प्रसिद्ध आहे.
शेवटी शिक्षण म्हणजे काय, शाळा, समाज आणि घर यांचा त्रिवेणी संगम! त्यामुळे मुलांना शिकवायचे असेल तर आधी आपण गोष्टी आचरणात आणाव्या लागतात हेच काय ते आम्ही आमच्या आई वडिलांकडून शिकलो आणि आता मुलांसमोर ठेवतोय. आदर्श वगैरे मला म्हणायचे नाही, पण जेवढे जमले तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. मोबाइलपासून माझ्या मुलालाही मुक्तता नाही पण कालौघात आलेल्या गोष्टी मोकळ्या मनाने स्वीकारलेल्या जास्त योग्य राहतील अशी आमची धारणा आहे.
(डॉ शीतल आमटे करजगी या आनंदवन इथल्या महारोगी सेवा समिती या संस्थेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)
- डॉ. शीतल आमटे.

No comments:

Post a Comment