Tuesday 11 December 2018

यंदा पिंपळवाडी शाळेतून एकही विद्यार्थी स्थलांतरित झाला नाही

साखर कारखान्यांचा गाळप सुरू होण्याचा हंगाम आला की पालकांबरोबर मुलांचं स्थलांतरदेखील ठरलेलं. पण जामखेड तालुक्यातल्या पिंपळवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून यंदा एकही विद्यार्थी स्थलांतरित झाला नाही. अहमदनगर जिल्ह्यातला जामखेड तालुका आणि बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्याच्या हद्दीवरची साकत ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीच्या हद्दीतली पिंपळवाडी. लोकसंख्या साधारण आठशेच्या घरात. बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवरच. त्यामुळे पिकपाण्यात कमतरता आली तर रोजगारासाठी ऊसतोडणी हाच पर्याय. पोटापाण्याच्या प्रश्नापुढे लेकरांचं शिक्षण दुय्यमच ठरायचं. पण २००९ पासून मनोज काशीद आणि अनिल चव्हाण या शिक्षकद्वयीनं पिंपळवाडी शाळेचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात केली आणि चित्र बदलू लागलं.
लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी झाली. आकर्षक चित्रं काढण्यात आली. डिजिटल शिक्षणासाठी संगणक आणि एलईडी टीव्ही घेतले. बाग आणि मैदान तयार करण्यात आलं. सांडपाण्याचं नियोजन करून ते झाडांना मिळण्याची सोय करण्यात आली. हँडवाश स्टेशन, दैनंदिन परिपाठ, सुंदर हस्ताक्षर , इंग्रजी वाचन , सामूहिक पाढे यासारख्या अनेक उपक्रमांमुळे शाळेला आयएसओ मानांकन मिळालं.
पुढे चव्हाण यांची बदली होऊन त्यांच्या जागी गणेश देवकाते रुजू झाले. तेही मेहनती. शाळेच्या सुधारणा आणि गुणवत्तेचा आलेख चढताच राहिला . मागच्या वर्षी काशीद यांची बदली होऊन राजेश्वर पवार रुजू झाले. त्यांनी देवकाते यांच्या सहकार्यानं शाळेची कामगिरी उंचावली. त्यामुळे पहिली ते चौथीपर्यंत असलेली वर्गसंख्या पाचवीपर्यंत वाढली. शाळेत सध्या 62 मुलं आहेत. पालकांनी रोजगारासाठी कोयता हाती घेतला असला तरी मुलांचं बोट मात्र त्यांनी गुरुजींच्या हातीच दिलं आहे.

- राजेश राऊत

No comments:

Post a Comment