Thursday 27 December 2018

भारत - पाकिस्तानातल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी केलेली कमिटमेंट

'‘भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा आपण दररोज शाळेत म्हणतो. परतु, खरंच देशासाठी आपण काय करतो? हा प्रश्न मला सतत अस्वस्थ करायचा. या अस्वस्थतेतून शालेय मुलांना भारत-पाक शांततेसाठी एकत्र आणायचं, ही कल्पना सुचली''. डिसले सर सांगतात. ''दोन्ही देशातील बंधुभाव वाढावा, यासाठी काम सुरू केलं. मायक्रोसॉफ्ट कंपनीकडे तसा प्रस्ताव पाठवला. त्यांच्याकडून टेक्निकल मदत मिळाल्यानंतर, व्हॉट्सअपच्या माध्यमातून लिंक तयार केली आणि या प्रकल्पात देशभरातील शाळांचा सहभाग नोंदवला.''

हे रणजितसिंह डिसले, ध्येयवेडे प्राथमिक शिक्षक, परितेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेतले. तालुका माढा. जिल्हा सोलापूर. त्यांच्या्च कल्पनेतला ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ हा प्रकल्प मूर्त स्वरूपात आला. या प्रकल्पाला भक्कम साथ लाभली ती मायक्रोसॉफ्ट कंपनीसह व्हॉट्सअप, स्काईप या समाजमाध्यमांची. 
'भारत आणि पाकिस्तान, दोन्ही देश धर्माच्या नावावर वेगळे झाले असले, तरी या दोन्ही देशांमध्ये कला, संस्कृतीत बरंच साम्य आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानात सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली पाहिजे'. हे मत व्यक्त केलं, दोन्ही देशातल्या काही भावी नागरिकांनी.
भारत आणि पाकिस्तानमध्ये, शांततामय संबंध प्रस्थापित करण्यासाठी तयार झाली आहे 'शांतीसेना'. सुरूवातीला, 5 हजार शांततासैनिक तयारही झाले आहेत. हे सारं घडलं, कोणत्याही सरकारी हस्तक्षेपाशिवाय. मायक्रोसॉफ्टतर्फे या प्रकल्पाला देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक प्रकल्प म्हणून नुकतंच दिल्लीत गौरवण्यात आलं.
या उपक्रमात भाग घ्यायची तयारी 580 शाळांनी दर्शवली. महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, आंध्रप्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातील 148 शाळांची प्रकल्पासाठी निवड केली. प्रकल्पात महाराष्ट्रातल्या चार शाळा. सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी आणि आकूंब या दोन जिल्हा परिषद शाळा, पुणे जिल्ह्यातील जांभूळदरा येथील जिल्हा परिषद शाळा आणि कोल्हापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय.
पाकिस्तानातूनही इस्लामाबादमधील रूट इंटरनॅशनल स्कूल, लाहोरचे मरिहा जेएआयन स्कूल या दोन मोठ्या शैक्षणिक संस्थाच्या 148 शाळांचा सहभाग. तिकडे प्रकल्पासाठी रजा वकास, हयात जहान बेग, पुरशरा लक्वी, मुस्तफा रजव्हा, अशफाक वकास या शिक्षकांनी पुढाकार घेतला.
1 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2018 या सहा आठवड्यांच्या कालावधीत या प्रकल्पाचा पहिला टप्पा पार पडला. पहिल्या आठवड्यात, स्काईपद्वारे दोन्ही देशातल्या मुलांचा प्रत्यक्ष संवाद. दुसऱ्या आठवड्यात, मुलांनी एकमेकांच्या देशातील साम्य आणि फरक यावर चर्चा केली. तिसऱ्या आठवड्यात जगातील दहा शांत देशातील शिक्षकांना ‘ग्लोबल स्पीकर’ म्हणून ऑनलाईन लाईव्ह निमंत्रित करण्यात आले. त्यात ऑस्ट्रियातील सुसान गिलका, फिनलंडमधील पेक्का ओली, कॅनडातील वर्बितो नेगी, आयर्लंडमधील मेकील पेस्तो, जपानमधील नियो होरियो यांच्यासह डेन्मार्क, न्युझीलंड, पोर्तुगालमधील शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. चौथ्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानमधील सैन्यांत संघर्ष का होतो, यावर मुलांनी चर्चा केली. पाचव्या आठवड्यात दोन देशातील संघर्ष आपण कसा थांबवू शकतो, याबाबत विद्यार्थ्यांनी आपली मतं मांडली. शेवटच्या सहाव्या आठवड्यात, भारत-पाकिस्तानचे संबंध शांततापूर्ण राहण्यासाठी मी काय करणार आहे, याबाबत एकमेकांशी ‘कमिटमेंट’ केली आहे. मुलांनी काही उपायही सुचवले. दोन्ही देशातील बातम्या आवर्जून बघायच्या असंही मुलांनी ठरवलं.
या प्रकल्पात सहभागी झालेल्या पाच हजार विद्यार्थ्यांना ‘पीस आर्मी’चं प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. हा प्रकल्प 2030 पर्यंत चार टप्प्यात होणार आहे. त्यात 50 हजार विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. दुसरा टप्पा फेब्रुवारी ते एप्रिल 2019 मध्ये असेल. या टप्प्यात दोन्ही देशातील प्रत्येकी 200 शाळा सहभागी होणार आहेत. गेल्या 70 वर्षांत युद्ध, तणाव या शिवाय दोन्ही देशांनी काहीच बघितलं नाही. युद्धाने किंवा चर्चेने प्रश्न सुटत नसतात, तर दोन्ही देशातील नगारिकांमधील संवादानेच ही दरी मिटेल, असा विश्वास या प्रकल्पात सहभागी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
- नितीन पखाले

No comments:

Post a Comment