Tuesday 18 December 2018

क्या लोग थे, वो दिवाने..... कुछ याद उन्हे भी कर लो’...

दवाखान्यातला औषध-गोळ्यांचा वास, विशिष्ट रंगाच्या भिंती आणि पडदे, खास पोषाखातले कर्मचारी. मात्र नांदेडमधल्या दास क्लिनिक आणि सहजीवन काउन्सेलिंग सेंटरमध्ये रुग्णांना वेगळा अनुभव येतो. टिळकनगर भागात आहे हे क्लिनिक. डॉ. किशोर अतनूरकर यांचं. रुग्णसेवेसासाठी आयुष्य वेचणारे डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि समाजसेवकांच्या कार्याची माहिती देणारा कोपरा. आकर्षक रंगसंगती, प्रकाशझोतांचा सुयोग्य वापर करून सजावट केलेले माहितीपर बोर्ड. ही माहिती वाचताना आपण रुग्णालयात असल्याचं रुग्ण विसरतात. कोपऱ्याचं नावही सुरेल-‘क्या लोग थे, वो दिवाने..... कुछ याद उन्हे भी कर लो’.
2016 मध्ये रयत आरोग्य मंडळाच्या, रयत आरोग्य पत्रिकेचे संपादक म्हणून ते काम करत होते. वैद्यकक्षेत्रातील सेवाभावी व्यक्तींची चरित्र संपादित करण्याचं काम त्यांनी तेव्हा केलं. ज्येष्ठ स्नेही डॉ अरुण महाले यांनी ही माहिती भिंतीवर लिहिण्याविषयी सुचवलं.
त्यांचा सल्ला अतनूरकर यांनी लगेचच आपल्या ओपीडीत अमलात आणला. या सर्व माहितीची भिंतीवर सुंदर सजावट करण्याचं काम सुहासिनी देशपांडे यांचं.
हा कोपरा तयार करण्यामागचा उद्देश डॉक्टरांनी सांगितला. "वैद्यकीयक्षेत्रातील आजची प्रगती कित्येक पिढ्यांमधल्या संशोधक, डॉक्टरांची देण आहे. त्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांच्याविषयी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, या हेतूनं हा कॉर्नर तयार केला."
डॉ अतनूरकर यांनी स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्रात एम.डी, काउन्सेलिंग/ सायकोथेरपीमध्ये एम.एस केलं आहे.
2005 साली ‘प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिसनर अ‍ॅन्ड पॉप्युलेशन कंट्रोल प्रोग्रमः अ स्टडी ऑफ सोशल अ‍ॅन्ड मेडिकल आसपेक्ट,” यात पीएचडी मिळवली आहे. स्त्रीआरोग्य, लैंगिक शिक्षण, विवाहपूर्व समुपदेशन,संततीनियमन याबाबत ते लोकजागृती करतात. अनेक पुरस्कारांनी डॉ अतनूरकर यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
-उन्मेष गौरकर.

No comments:

Post a Comment