Thursday 6 December 2018

जखमींचा देवदूत



"हॅलो, संजूसेठ, अमुक रस्त्यावर अपघात झालाय. लवकर ऍबुलन्स पाठवा." जामखेड ते आष्टी असो की जामखेड ते बीड किंवा जामखेड ते करमाळा जामखेडच्या परिघात कुठंही अपघात झाला की लोक पहिला फोन घटनेची माहिती द्यायला पोलिसांना करतात. आणि दुसरा मदतीसाठीचा फोन असतो तो संजय कोठारी यांनाच.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड हे तालुक्याचे गाव बीड जिल्ह्याला अतिशय जवळचं. याच जामखेडमध्ये राहणारे संजय मनसुखलाल कोठारी. व्यवसायाने व्यापारी. वाहन आणि त्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट विक्रीचा त्यांचा
व्यवसाय. मात्र फक्त व्यापारी एवढीच त्यांची ओळख नाही तर सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. अपघातग्रस्तांना मदत करण्यास त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. परिसरात कुठंही अपघात झाला की माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी धाव घेतात आणि आपल्या ऍबुलन्समधून जखमींना नजीकच्या रुग्णालयात
  
दाखल करतात. महत्त्वाचे म्हणजे ही सगळी सेवा ते मोफत 
करतात. यासाठीचा सगळा खर्च ते स्वतःच्या खिशातून करतात. त्यांच्या या पुढाकाराने अनेक जखमींना वेळेत उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले आहे. संजय कोठारी यांचे समाज सेवेचे काम गेली पंचवीस वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.
स्व. सुवालालजी कोठारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते समाजसेवेचे काम करत असतात. शालेय विद्यार्थांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, महिलांसाठी आरोग्य शिबीर, एड्सबद्दल प्रबोधन करणारे कार्यक्रम, आषाढी दिंडीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नाष्टा, भोजनाची व्यवस्था करणे, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबवणे असे त्यांचे काम वर्षभर सुरूच असते. काही मनोरुग्ण व्यक्तींना आंघोळ घालून त्यांना वैद्यकीय उपचार मिळवून देणे यासारखे काम ही ते मनोभावे करत असतात. त्यांच्या या सर्वव्यापी समाजसेवेची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
संजय कोठारी म्हणतात, "समाज सेवेचा मला मिळालेला वारसा हा आजोबा सुवलालजी आणि वडील मनसुखलाल यांच्याकडून मिळालेला आहे. गेली २५ वर्षे मी माझा व्यवसाय सांभाळून समाजसेवेचं व्रत हाती घेतलं आहे. आमच्या प्रतिष्ठानची नाव नोंदणी जरी झालेली असली तरी आम्ही आमच्या कामासाठी शासनाकडून कोणताही निधी घेत नाही. मला माझ्या कामाचे अनेक पुरस्कार मिळाले असले तरी मला मात्र मी केलेल्या मदतीमुळे कुणाचे तरी प्राण वाचतात याचं समाधान मोठं असतं. अपघातात वाचलेल्या एखाद्या जीवापेक्षा मोठा पुरस्कार माझ्यासाठी दुसरा कोणता असेल ?"
- राजेश राऊत.

No comments:

Post a Comment