Saturday 15 December 2018

मैत्रकूल - मुलांचं हक्काचं घरकूल



एक दोन वर्षांपूर्वी फेसबुकवरील मैत्रिणींनी या मैत्रकुलची ओळख करून दिली होती. कल्याण पश्चिमेस, बापगाव इथे उभारलेल्या या मैत्रकुलमध्ये 25- 30 मुलं शिक्षणासाठी येऊन राहिली आहेत. बागशाळेच्या माध्यमातून किशोर जगताप त्यांचे वर्ग घेत असतात असं कळलं होतं. त्या वेळी, त्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून, थोडी मदत पाठवलीही होती. तेव्हा, त्यांची निधीसंचालक मौर्विका ननोरे हिच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. हल्लीच, तिनं पुन्हा एकदा फोनवर आमंत्रण दिलं की, ताई, आमचा मैत्रकूल मेळावा आहे 8 डिसेंबरला. तर तुम्ही नक्की या. मलाही तिथं प्रत्यक्ष भेट द्यावीशी वाटली आणि मी 8 डिसेंबर रोजी तिथं गेले.
कल्याण पश्चिम स्टेशनपासून तासभराच्या अंतरावरचं बापगाव. रिक्षातून उतरल्यावर मैत्रकुलचा पत्ता कुणाला विचारावा असा, विचार करत असताना एक चुणचुणीत मुलगा समोर आला आणि त्यानं मला विचारलं, “ताई, तुम्हाला मैत्रकुलला जायचंय का?” मी हो म्हणाल्यावर तो स्वतः माझ्याबरोबर आला. तो अकरावी आर्ट्सला जवळच्याच अग्रवाल कॉलेजात शिकत होता. मी पोचेपर्यंत मोर्विकाशीसुद्धा फोनाफोनी झाली होतीच. स्वतः मौर्विकाने निर्मला निकेतनमध्ये एमएसडब्ल्यू केलं आहे. आणि ही मुलगी आता पीएचडीची तयारी करते आहे, याचं मला खूपच कौतुक वाटलं. तिथली मुलं मला खूप आत्मविश्वासपूर्ण आणि हसरी, खेळकर वाटली. तिथल्या भाषणांतून कळलं की, या मुलांनी आपापसात जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. लहान मुलांची जबाबदारी मोठी मुलं घेतात. तिथे कुणाला एमपीएससीच्या परीक्षेला बसायचं आहे, कुणी एमटेक करतोय, ते ऐकून मला खूप आनंद होत होता.
किशोर जगताप हे मागील तीस-पस्तीस वर्षे बागशाळा घेत आहेत. वस्तीतील वंचित, गरीब आणि टपोरी मुलांना एकत्र करून सार्वजनिक बागेत शिकवायचं. अशा मुलांमधील हुशार, होतकरू आणि ज्यांना शिकायची आवड आहे पण, आर्थिक कारणांमुळे जमत नाहीये अशा मुलांसाठी निवासी संकुल उभारण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. किशोर हे पोलियोग्रस्त आहेत. शिवाय 2 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे त्यांचं हिंडणफिरणं बंद झालं. त्यांना मुलांचा असा लळा लागलेला. निवासी संकुलाची कल्पना 2017 साली प्रत्यक्षात आली.
तिथं अंगण शेणाने सारवावं लागतं. तेही काम ही मुलं हौसेनं करतात. घरातल्या प्रत्येक खोलीला, अगदी स्नानगृहालासुद्धा त्यांनी नाव दिलं आहे. अंगणात बसून ती पेटी, तबला, ढोलकं वाजवून गाणीही म्हणतात. किशोरदादा खालीच बसून सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकत होते. त्यांना बोलायला उद्युक्त करत होते. नवीन व्यक्ती बोलायला आली की, ढोलकी वाजवून तिचं स्वागत व्हायचं. तेवढ्यात एक छोटी मुलगी येऊन वडिलांशी बोलावं तसं त्यांना काहीतरी सांगू लागली. त्यांनी तिचं बोलणं ऐकून तिला कुणाकडे तरी पाठवलं. मला तिथे नंतर आणखीही एक कळलं की, सहावी सातवीतल्या एका मुलाला वाईट संगत लागून तो खिसेकापू बनला होता. तो मुलगाही आज मैत्रकुलमध्ये येऊन खूप चांगलं काम करू लागला आहे. शिकू लागला आहे. एका मुलानं सांगितलं, की युट्युबवर बघून आम्ही छान छान पदार्थ बनवतो. हल्लीच आम्ही सिझलर बनवले होते. आमच्या इथे कुणी चुकलं तरी परत संधी मिळते, तू नको करू असं म्हणून कुणी निरुत्साही करत नाही.
आता ही मंडळी त्यांचं छोटंसं छान घरकूल सोडून खडवलीला अधिक मोठ्या घरात चालली आहेत. हे आधीचं घर भाड्याचं होतं पण ते नवं घर त्यांचं स्वतःचं असणार आहे. त्यासाठीच त्यांचं निधी जमवणं चाललं आहे. मौर्विका म्हणाली की, एकरकमी सगळी रक्कम देतो पण आमच्या आईचं किंवा वडिलांचं नाव संस्थेला द्या, असं म्हणणारे देणगीदार आहेत. पण आम्हाला तसं करायचं नाही. त्यापेक्षा हजार लोकांनी आम्हाला थोडे थोडे पैसे द्यावेत म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत जातो. त्या सर्वांना ही संस्था त्यांची आहे, असं वाटलं पाहिजे. नवीन घरात काय काय असेल त्याचं रेखाचित्रही एका मुलाने आम्हाला सांगितलं. त्याला सगळे रावसदादा म्हणत होते. तो म्हणाला की, ही नवी जमीन तीस गुंठ्याची आहे, इथे आम्ही किचनला मोठी जागा देऊ शकू. पेंटिंगची वेगळी खोली, गायन-वादनासाठी वेगळी खोली असेल, आमचे पाहुणेही राहू शकतील, अशी सोय आम्ही करणार आहोत. त्यांनी मला बोलायला सांगितलं तेव्हा, मी त्या मुलांचं आणि त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण वागण्याचं कौतुक केलं.
खरंच, शेवटी शिक्षण हेच महत्वाचं आहे आणि त्यासाठीची जिद्द हीसुद्धा फार महत्वाची आहे. मुलांची ही जिद्द तिथे प्रत्यक्ष गेले, म्हणून अनुभवता आली. मदत म्हणून नुस्ते पैसे पाठवून गप्प बसले असते, तर या मुलांना भेटण्याच्या आनंदास मुकले असते, असं वाटलं.
- सविता दामले

No comments:

Post a Comment