Thursday 27 December 2018

बाबाचं मनोगत : स्टेजवर तो मला सांभाळून घेत होता, हे पाहून तर हरखूनच गेलो!

मोठ्या मुलाच्या जन्मामुळे मागील सात वर्षांपासून तो संगोपनाचा कित्ता गिरवत आहे आणि आता दुसऱ्या अपत्याच्या निमित्ताने गेल्या सात महिन्यांपासून त्याची पुन्हा उजळणी सुरू झाली आहे. मोठ्या मुलाच्या उन्मेषच्या वेळी, लक्ष्मणची पत्नी श्वेता ही एका कॉलेजमध्ये नोकरी करत होती. बाळ पाच महिन्यांचं झालं आणि तिला कामावर रूजू होणं गरजेचं झालं. तिच्या माहेर वा सासरकडून मदतीला कुणीही येणं शक्य नव्हतं. अशा स्थितीत श्वेताने आपणच नोकरी सोडावी, असा विचार केला. पण, लक्ष्मणने त्या गोष्टीला ठाम नकार दिला. 
तो म्हणतो, बाळ जर आमच्या दोघांचं आहे तर संगोपन आम्ही दोघांनी करायला हवं. श्वेतानेच नोकरी का सोडावी? तिनेच करिअर का थांबवावं? मी नोकरी सोडून बाळाला सांभाळलं तर? बाळाला सांभाळण्यासाठी आमच्याकडे पर्यायी व्यवस्थाही नव्हतीच. मग विचार केला, आपण कामाच्या वेळेत थोडा बदल केला, तर? त्यावेळेस, मी पुण्यनगरी दैनिकात होतो. दैनिकात दररोज आलटून पालटून प्रत्येक बातमीदाराला रात्रपाळी करावी लागते. संपादकांना सुचवलं की, "इतर सर्व बातमीदारांची रात्रपाळी बंद करून रोजची रात्रपाळी मला द्या.' माझी नेमकी अडचण पाहता तेही तयार झाले आणि बातमीदार असूनही माझ्या कामाची वेळ दुपारी 4 ते रात्री साडे बारा अशी करून घेतली.''
लक्ष्मणच्या या उपायामुळे श्वेतासाठी नोकरी व बाळ सांभाळणं हे काम सोयीचं झालं. श्वेता सकाळी सात वाजता कामावर जाई आणि दुपारी अडीचपर्यंत घरी परते. या निर्णयाची कसोटी बाळाकडून येणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून होते. पहिल्याच दिवशी, बाळाने रडरड केली आणि लक्ष्मणच्या लक्षात आलं, बाळाचा सांभाळ करणं हे येरागबाळ्याचं काम नाही. लक्ष्मण म्हणतो, "श्वेताने उन्मेषसाठी फ्रीजमध्ये दूध काढून ठेवलेलं होतं, तरीही बहुदा तो आईलाच शोधत होता. त्याच्या रडण्याने मीही घाबरलो. पण, दुसऱ्या दिवसानंतर मात्र चित्र बदललं. त्याला हळूहळू माझी सवय होऊ लागली. पाच महिन्याचं बाळ असल्याने, केवळ आईचंच दूध देऊ शकत होतो. मग बाजारातून ब्रेस्टपंप आणला. श्वेता रीतसर दूध बाटलीत काढून फ्रीजमध्ये ठेवू लागली. भूक लागली की, त्याला दूध कोमट तापवून पाजायचो. त्याची शी-शू काढण्यापासून ते आंघोळ घालून तीट-पावडर करण्यापर्यंत सगळं काही करू लागलो. बाळाचे कपडे, लंगोट्यासुद्धा धुऊन, वाळवून ठेवू लागलो. माझं आणि त्याचं खास बॉण्डींग तयार होऊ लागलं. सहाव्या महिन्यानंतर, श्वेता आमच्या स्वयंपाकाबरोबरच त्याच्यासाठी वेगवेगळ्या खीरी, मऊडाळभात असं नीट रांधून जाई. बाळाला कसं भरवायचं, कधी भरवायचं, याच्या सूचना श्वेताच्या आणि अंमलबजावणी माझी असं सूत्रच तयार झालं. मग, त्याला खेळवा, त्याच्यासोबत मस्ती करा, त्याला आनंदी ठेवा या सगळ्यात माझ्यातही बदल होत होता. मीही आनंदी राहू लागलो होतो. वडील म्हणून माझी सजगता वाढली होती. बाप असून आईपण अनुभवता येणं याचा मलाच आनंद होई.'' 
लक्ष्मणने केवळ वडील म्हणूनच नव्हे, तर एक उत्तम सोबती बनून श्वेताची साथ दिली होती. श्वेताला सकाळी लवकर उठावं लागायचं. त्यामुळे तो रात्री बाळ रडलं, तरी तिला तो उठवत नसे. मूल रडू लागलं की आईकडं सोपवायचं हे सूत्रच मला पटत नाही, असं लक्ष्मण सांगतो. तो, खुद्द स्वत:त असे अनेक छोटे छोटे बदल पाहत होता. मुलासाठी तो स्वयंपाकीही झाला. तो सांगतो, "वर्ष दीड वर्षाने मी त्याच्यासाठी पोहे, उपीट, शीरा, नाचणीची खीर असं गरमगरम बनवून देऊ लागलो. आईइतकीच त्याला माझीही ओढ वाटू लागली. अडीच वर्षांचा झाल्यानंतर आम्ही त्याला शाळेत घातलं. पण त्याला आणण्या- नेण्याची जबाबदारी आम्ही, आमच्याकडे ठेवली. त्यातून त्याच्याशी रोजचा संवाद वाढला. आता तो सहा वर्षांचा आहे आणि आमच्यातला बंध ही सहा वर्षांनी पक्व झाला असं म्हणायला हरकत नाही. 
मध्यंतरी उन्मेषच्या शाळेत पालकांसोबत एखादी कला सादर करायची, अशी अॅक्टिव्हीटी होती. त्यावेळेस मी एक छोटंसं भजन लिहीलं. आम्ही दोघं मिळून टाळ वाजवत ते सादर करणार होतो. माझी प्रॅक्टीस कमी झाली होती. श्वेताने मात्र त्याच्याकडून ते भजन पाठ करवून घेतलं होतं. तो टाळही नेमकेपणे वाजवत होता. आपणच लिहिलंय, तर आपल्याला जमेलच, अशा फुशारकीत मी होतो. प्रत्यक्षात स्टेजवर चढलो तर माझ्याच ओळी मला आठवत नव्हत्या. मी अक्षरक्ष: कागद पाहून म्हणत होतो आणि तो आत्मविश्वासाने न अडखळता म्हणत होता. उलट स्टेजवर तो मला सांभाळून घेत होता, हे पाहून तर हरखूनच गेलो.''
लक्ष्मण आणि श्वेताने दुसऱ्या अपत्याचा निर्णय घेण्याआधी, श्वेताने स्वत:चा केकचा व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे केकसोबत रांगोळी, मेहंदी, इतर कुकींग आयटम अशा ऑर्डर्स तिला मिळू लागल्या. आत्ताही, आमचं सात महिन्याचं पिलू- यश्मितला, माझ्याकडे ठेवून ती व्यवसाय सांभाळत असते. 
बालसंगोपन ही अडचण वाटू द्यायची नसेल, तर कामात संतुलन हवं, असं साधं सरळ तत्त्व लक्ष्मण सांगतो. "पती-पत्नीत, जोडीदार म्हणून, तुमची समज किती चांगली आहे, यावर सारं काही अवलंबून आहे. आपण जर एकमेकांच्या कामाचा, नोकरीचा, वेळेचा आदर केला. आवश्यक तो आराम एकमेकांना देऊ केला, तर आपलं बाळ आपण एकत्रित वाढवण्याचा आनंद घेऊ शकतो. उलट बाळांची जडणघडण प्रत्यक्ष अनुभवणं यासारखा दुसरा आनंद नाही. तुमचं अंडरस्टॅण्डींग महत्त्वाचं. मग अडचणी मोठ्या होत नाहीत. आणि त्या मोठ्या होऊ द्यायच्या नसल्या की कामाच्या जबाबदार्‍यांची योग्य ती विभागणी केली की पुरे! घरकामाच सुंतलन फार महत्त्वाचं.' लक्ष्मण आणि श्वेता जबाबदाऱ्यांचं योग्य संतुलन राखत, त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये लिंगसमभावाची भावनाही नकळत रुजवत आहेत.
- लक्ष्मण मोरे. 
- हीनाकौसर खान

No comments:

Post a Comment