Thursday 13 December 2018

शाळेनं मला काय दिलं



बालपण म्हणजे व्यक्तीच्या जडणघडणीचा काळ. शाळेचे दिवस म्हणजे जीवनातील सोनेरी क्षण असतात. परळी शहरातील सरस्वती विद्यालयात माझं सातवीपर्यंतचं शिक्षण झालं. लहानपणापासून शाळेतील उपक्रम, अभ्यास याबाबत आम्ही बहिणी फार उत्साही असायचो. आमच्या घरातचं तसं वातावरण होतं. चुकून कधी शाळेला कधी दांडी मारून घरी बसलं की बाबा (दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे) म्हणायचे, “काय झालं? घरी कसं काय? तब्येत एवढी खराब झाली का सुटी घ्यायला?” बाबास्वत: कधी सुटी घ्यायचे नाही, आम्हाला कधी विनाकारण घेऊ द्यायचे नाही. 
आम्हाला टक्केवारीचा कधी ताण नव्हता. आम्ही तिघी बहिणी हुशार होतो. ‘बाबांची’ मुलं असतानाही आम्हाला कधी वेगळी वागणूक नव्हती. आमची शाळा भारी होती. सरस्वती विद्यालयाच्या आठवणींबाबत बोलायचं झालं तर शाळेने आम्हाला जीवनासाठी तयार केलं. देशभक्तीपर गीते, अभ्यास व इतर कार्यक्रम पार पडायचे. मला विटी-दांडू खेळ आवडायचा. अवांतर वेळेत त्यासाठी माझा वेळ जायचा. शाळेत आम्ही रमून जायचो. शिक्षकांच्या आपुलकीने, तळमळीने आम्हाला घडवलं. परळीत असताना कवडे सर इंग्रजी शिकवायचे. त्यांची छाप आजही आहे. आमच्या वर्गात मी नेहमी पहिली येत असे.
पुढे आठवी ते दहावी मुंबईत सेंट कोलंबा गर्ल्स स्कूलमध्ये प्रवेश घेतला. या शाळेत जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. आजची त्या कायम आहेत. खूप चांगले शिक्षक मिळाले. शाळेने शिस्त दिली. मेहनत करण्याची उर्मी दिली. एखादं काम करत असताना प्रामाणिकपणे करणे, ही शाळेतून मिळालेली शिकवण. वक्तशीरपणा शाळेने दिला. सध्याच्या काळात वेळ पाळणं कठीण होत असलं तरी शिक्षण घेत असताना आम्ही वेळेबाबत दक्ष असायचो. 
इतरांप्रमाणेच गणित माझ्यासाठी अडचणीचा विषय होता. परंतू, मुंबईत असताना वैंगणकर या वर्गशिक्षिका होत्या. त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवत माझी भीती घालवली. सुरुवातीला मुंबईतील शाळेत गेल्यानंतर इंग्रजी शब्दांच्या उच्चारांविषयी अडचणी यायच्या, कोरडे बाईंनी त्या दूर केल्या. मुंबईतही मी पहिल्या पाचात असायचे. कोलंबा शाळेत अभ्यासाबरोबरच स्पर्धा, नाटक, उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळाले. मजेची गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदा ज्या नाटकात काम केले त्यात मी चाळीचा मालक, लोकल पुढारी होते. बाबा उपमुख्यमंत्री असताना जे जाकिट घालत ते मी घातले होते. कदाचित यातूनच आजची बीजं रोवली गेली असतील. दहावीत असताना शाळेतील सौंदर्य स्पर्धेत मी सहभागी होते. रॅम्प वॉक झाल्यानंतर मला प्रश्न विचारला की आजच्या काळात स्त्रीचे समाजात काय स्थान आहे? या प्रश्नाच्या उत्तरानंतर मला ‘मिस सेंट कोलंबा’ने गौरवले. मी म्हटले होते, ‘स्त्री पुरूषाच्या बरोबरीने किंबहुना काकणभर पुढे आहे. तिला निसर्गाने स्वत:ची प्रतिक्रिया बनवण्याचे वरदान दिले आहे. समाजातील स्थान पाहिले तर प्रत्येक क्षेत्रात स्त्री अग्रेसर आहे. तिला जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती समाजाचे दायित्त्व निभावण्यासाठी तत्पर आहे.’ आज मी जे काही ते माझ्या परळी व मुंबईतील शाळेतील जडणघडणीमुळेच. 
आजची मुलं ही गॅजेट प्रिय आहेत, त्यांनी तंत्रज्ञान हाताळावे. मात्र ग्रामीण व मैदानी खेळातही सहभागी व्हावे. शाळा ही तुम्हांला घडवण्यासाठी असते, त्यामुळे न्यूनगंड न बाळगता आनंदाने शाळेत जा, शिक्षण घ्या, स्वत:ला घडवा. 

- डॉ.प्रीतम गोपीनाथराव मुंडे.

No comments:

Post a Comment