Monday 17 December 2018

वीटभट्टीवरील मुले शाळेत येतात तेव्हा..


चांगलं शिक्षण मिळणं हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे आणि तो मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्यांचा व्यवसाय चालतो. तिथे अनेक लहान मुले वीटभट्टीकामगार असलेल्या आपल्या पालकांसोबत राहतात. यातील बहुतांश मुले शाळेत न जाता आपापल्या पालकांसोबत काम करताना आढळून यायची. हे सर्व पाहून वाईट तर वाटायचंच, पण फक्त वाईट न वाटून घेता या मुलांना शाळेत दाखल करायचंच, असा आम्ही निश्चय केला.
आकोटच्या गटसाधन केंद्राने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं एक सर्वेक्षण हाती घेतलं. 2017 च्या डिसेंबर महिन्यात
चौहट्टाबाजार, किनखेड, करोडी, पाटसूल परिसरातील वीटभट्ट्यांचे बालरक्षक तसंच त्या परिसरातील केंद्रप्रमुख, शिक्षक यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात सर्वेक्षण केलं. वीटभट्ट्यांवर जाऊन प्रत्येक कुटुंबात किती मुलं आहेत, त्यापैकी किती मुलं शाळेत जातात आणि किती शाळाबाह्य आहेत, याचं विस्तृत सर्वेक्षण केलं.आकोट तालुक्यात एकूण 206 शाळाबाह्य मुलं असल्याचं आढळलं. त्यातील निम्म्याहून जास्त मुलं, मूळ अमरावती जिल्ह्यातील असल्याचं लक्षात आलं. ही मुलं अमरावतीतील वेगवेगळ्या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशित होती. मग अमरावती आणि अकोला DIECPD च्या संयुक्त 

विद्यमाने या शाळाबाह्य मुलांना पुन्हा शाळेत प्रवेशित करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. याकरिता अमरावती DIECPD चे प्राचार्य मा. डॉ. रवींद्र आंबेकर तसंच अमरावतीचे शिक्षक अकोला दौऱ्यावर आले.
सर्व टीमने पुन्हा एकदा प्रत्येक वीटभट्टीवर जाऊन पालकांशी संवाद साधला. मुलांना शाळेत पाठवणं का गरजेचं आहे, याबद्दल अमरावतीतील त्यांच्या ओळखीच्या शिक्षकांनी संवाद साधला. ‘तुम्ही पोटापाण्यासाठी वीटभट्टीवर काम करत असलात, तरी त्यामुळे तुमच्या मुलांची शाळा मात्र तुटतेय. मुलांचं नुकसान करू नका, त्यांना पुन्हा अमरावतीला पाठवा’, अशी विनंती केली. शिवाय वीटभट्टी मालकांसोबत दुपारी आम्ही सुसंवाद सभाही घेतल्या. त्यातही मुलांच्या शिक्षणाचं महत्त्व आम्ही समजावून सांगितलं. त्यांच्या पालकांकडून तुम्ही काम करवून घ्या, पण मुलांची फरफट थांबवा, असं सांगितलं. कारण आमच्यापेक्षा हे कामगार त्यांच्या मालकांचं नक्की ऐकतील अशी खात्री होती. आणि घडलंही तसंच! आम्हा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून अकोल्यातील सुमारे 103 मुलांना अमरावतीतील शाळेत पुनःप्रवेशित करण्यात आम्ही यशस्वी ठरलो.
मूळ अमरावतीचे असलेले विद्यार्थी सोडले तरी इतर जिल्ह्यातून/ राज्यातून आलेली आणखी शंभर एक मुलंही या वीटभट्ट्यांवर होती. यातील काही मुलं कधीच शाळेत गेलेली नव्हती, या मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून त्यांच्यासाठी ‘वीटभट्टी तिथे शाळा’ ही अनोखी संकल्पना राबविण्यात आली. 1 जानेवारी 2018 रोजी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. वीटभट्टीजवळच्या एका मोठ्या शेतात झाडाखाली ‘शांतीनिकेतन’ सारखी तात्पुरती शाळा आम्ही सुरू केली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि मुलं तसंच पालकांना गुलाबपुष्प देऊन शाळेचं उद्घाटन झालं. मोकळ्या रानातील या शाळेत हसत- खेळत अध्यापनाचे कार्य सुरू झाले. बहुतांश मुलं परप्रांतीय होती. त्यामुळे हिंदीचा आधार घेत त्यांना शिकवत होतो, उजळणी तर चक्क इंग्रजीमधून घेत होतो. मात्र अंकओळख आणि गणिती क्रिया मुलांनी सहज आत्मसात केल्या. विविध भाषिक खेळ घेऊन, गाणी म्हणत आमचा अभ्यास चालायचा.
- श्याम राऊत, 

No comments:

Post a Comment