Thursday 27 December 2018

बाबाचं मनोगत : बाप असल्याचा आनंद बाळाच्या सोबतीतच मिळू शकतो


विशाल पोखरकर सध्या शिक्षणविषयक विशेषांक प्रसिद्ध करत आहे. विशालचा पिंडच मुळी अभ्यासू. त्यामुळे, घरात बाळ येणार म्हटल्यावर याने बालसंगोपनाशी संबंधित तीसेक पुस्तक वाचून काढली. आयुर्वेदीक ते अॅलोपॅथीक, मानसिक आरोग्य ते बाळ कसं सांभाळावं अशी सगळ्या तऱ्हेची. पालकत्वासाठीची इतकी सजग तयारी करणारा विशाल विरळाच. विशालची पत्नी आरजू. तिला जेव्हा गुड न्यूज कळाली, तेव्हाच दोघांनी बाळसंगोपनासाठी आपल्यालाच सज्ज व्हायचंय, हे ठरवून टाकलं. विशाल सुरुवातीलाच सांगतो, "बालसंगोपन ही अति काळजीची गोष्ट आहे असं एक वातावरण तयार केलं जातं आणि ते आपल्याला जमेल का अशी भीती-धास्ती निर्माण केली जाते. सोबतच अंधश्रद्धाही येतात. बाळाची पाचवी, बारावी किंवा मग तीट लावा, दृष्ट काढा. पण हे सारं टाळायचं, हे आम्ही आधीच ठरवलं होतं. शिवाय आरजूचं माहेर आटपाडी, माझं गाव मंचर. त्यामुळे पुण्यात अधिक सोयी मिळतील, हा विचार करून इथंच बाळंतपण करायचं, हे आम्ही सुरुवातीलाच ठरवलं. तेव्हाच आम्हाला हेही माहीत होतं 


की बाळाची देखभाल करायला, तिसरा माणूस सोबत नसणार." 
"माझी आई शेतकरी आणि आरजूची आईदेखील नोकरी करणारी. त्यापैकी कुणीही पूर्णवेळ आमच्यासोबत राहू शकत नव्हते आणि आम्हालाही, त्यांनी त्यांचं रुटीन हलवून वेळ द्यावा अशी अपेक्षा नव्हती.'' 
आरजूच्या पोटात दुखू लागलं, त्यावेळेस विशाल, त्याचे दोन मित्र व दोन मैत्रिणी यांनी तिला प्रसूतीगृहात नेले. विशाल पूर्ण वेळ आरजूसोबत लेबर रूममध्ये होता. आरजूच्या कळा तर घेता येणार नाहीत, पण किमान त्या अवस्थेत आपण तिच्यासोबत आहोत, ही भावना तिच्यापर्यंत पोहचावी, यासाठी विशालचा हा आटापिटा होता. बाळ आणि बाळंतीण तिसऱ्या दिवशी सुखरूप घरी आले. आणि चक्क तीन दिवसाच्या बाळाला विशालने आंघोळ घातली. विशाल म्हणतो, "तोपर्यंत इतकं लहान बाळ हातात घ्यायचीसुद्धा मला भीती वाटायची. पण बाळाची जबाबदारी घ्यायची, हे ठरवलं तेव्हा, आंघोळीपासून सारं करायचं मनात होतं. माझी आणि आरजूची आई घरात होत्या. पण त्यांना कटाक्षाने सांगितलं की, तुम्ही घरातलं काहीही काम करा. पण बाळाचं काम मीच करणार. तुम्ही काही दिवस कराल पण पुढं आम्हालाच करायचं आहे. तेव्हा मला तुमच्या देखरेखीखाली ते सारं शिकू द्या.'' 
आई आणि सासूला अशी तंबी दिल्यावर विशालने आपल्या शिक्षणाला सुरूवात केली. ती अशी, बाळाच्या- अर्शलच्या तिसऱ्या दिवसापासूनच. बाळसंगोपनाच्या पुस्तकांतली माहिती, त्यातील विसंगती, प्रत्येक अनुभवकर्त्याचे भिन्न अनुभव असं सारं गाठीशी ठेवून विशाल तारतम्याने बाळ-बाळंतिणीची काळजी घेऊ लागला. अर्शलला मालीश करणे, आंघोळ घालणे, शी-शू काढणे, त्याचे कपडे धुणे ही सारी कामं तो शिस्तीने करू लागला. महिन्याभरानंतर, आरजूच्या मदतीने दोघांसाठी स्वयंपाक करून, अर्शलची आवराआवर करून तो ‘सुगावा’ मासिकात कामावर जाई. संध्याकाळीही पुन्हा तो बाळाच्या देखभालीत वेळ घालवू लागला. अर्शल सहा महिन्यांचा झाल्यानंतर आरजूने नोकरीवर रूजू होणं भाग होतं. आता मुख्य अडचण येणार होती. विशाल सांगतो, "आमच्यासाठी ती अडचण नव्हतीच कारण आम्हाला पहिल्यापासून हे माहीत होतं की, आमच्या कामाच्या वेळा सांभांळाव्या लागणार. आम्ही काही तासांसाठी अर्शलला पाळणाघरात ठेवायचा निर्णय घेतला. अर्शलला दुपारी 1 च्या सुमारास तिथं सोडायचं आणि संध्याकाळी सहा वाजता आणायचं असं ठरलं. आरजू सकाळी स्वयंपाक करून साडेनऊला बाहेर पडायची. त्यानंतर अर्शलसाठी गरमगरम वरणभात करणं किंवा इतर काही पदार्थ शिजवणं, त्याची स्वच्छता, आंघोळ, औषधपाणी असं सारं मी करू लागलो. त्यासोबत खेळणं, उड्या मारणं, मस्ती घालणं यात आम्ही दोघं पक्के मित्र आहोत. अशाप्रकारे पाळणाघरात सोडेपर्यंतचा पूर्णवेळ त्याच्यासोबत घालवतो.
आज अर्शल पंधरा महिन्यांचा आहे. आता, तो आमच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष देऊ लागला आहे. संस्कार हा ‘बिंबवण्याचा' प्रकार नसतो, हे त्याच्यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. साधं उदाहरण म्हणजे, आम्ही एका रॅकवर चार भाग केले आहेत. ज्यात पुस्तकं ठेवली आहेत आणि खालच्या एका भागात त्याची खेळणी. सकाळी मी जर पेपर किंवा पुस्तक वाचतो, तेव्हा, तोही खेळणी बाजूला ठेवून त्याच्या हाताला येणारी त्याची छोटी पुस्तकं घेतो. मी जर काही अधोरेखित करत असे्न, तर तोही त्याच्या पुस्तकावर काहीतरी रेघोट्या मारू लागतो. घरातलं आणि आमच्या दोघांचंही वागणं किती निर्मळ आणि संतुलित असायला हवं, याचा धडाच जणू आम्हाला अर्शलकडून मिळाला.”
बाळाशी ‘अलेले, काय रे बाळा’ असं केवळ गप्पा मारून त्याच्या मनापर्यंत पोहचता येत नाही त्यासाठी वडिलांचा संगोपनातच सहभाग हवा, असं विशालला मनापासून वाटतं. हे स्पष्ट करत त्याने एक उत्तम विचार सांगितला, "पती-पत्नी दोघांनाही वाटतं की, आता तिसरं कुणीतरी यावं तेव्हाच बाळाचा निर्णय होतो. म्हणजे दोघं मिळून जर तिसऱ्या व्यक्तीचं स्वागत करणार आहेत, तर त्याची जबाबदारी केवळ एकाकडे ढकलून कशी चालेल? आई नैसर्गिकरित्या तर मुळातच 9 महिने सांभाळते. मग बाळ झाल्यानंतर पहिली जबाबदारी तर बाबानेच घेतली पाहिजे. सहजीवनात समान वाटा नसेल, तर कसं चालेल? आणि हे वाटणी म्हणून नव्हे, तर आनंद म्हणून करायला हवं. दोघांनी मिळून कुठलीही गोष्ट केली की. निरस होत नाही आणि काम हातासरशी होऊन जातं. बाळसंगोपनही तसंच. उलट, बाळासोबत प्रत्येक क्षणी निर्भेळ आनंद मिळतो. याबाबत पूर्वनियोजन नसतं, म्हणून घोळ होतात. नोकरी सोडून देण्याची गरजही नसते. फक्त वेळेचं नियोजन आणि प्राधान्यक्रम थोडा बदलला, तरी सारं नीट होतं. बाप असल्याचा आनंद बाळाच्या सोबतीतच मिळू शकतो.'' विशाल तो आनंद मिळवत जगत आहे.
विशाल पोखरकर, मुक्त पत्रकार.
- हीनाकौसर खान

No comments:

Post a Comment