Thursday 6 December 2018

यशोवाणी: आगळं वेगळं ग्रंथालय

अहमदनगरची हीना शेख आज एका शाळेत इंग्लिश ट्रेनर आहे. तिला एम.ए. आणि बी.एड.च्या प्रत्येक परीक्षेत ‘यशोवाणी’ची साथ लाभल्याचे ती आवर्जून सांगते. अतिशय उत्तम रेकॉर्डिंग गुणवत्ता आणि वेळेत मिळणारे पुस्तकं यांच्या मदतीने ‘सेट’ पास झालेली हीना आता ‘नेट’च्या तयारीला सुद्धा लागली तेही रेकॉर्डेड पुस्तकं ऐकून! हे घडलं कसं?
प्राची अनिल गुर्जर या पूर्णवेळ गृहिणी. घरगुती स्तरावर शिकवण्या घेणं सुरू होतं. अगदी 18 वर्ष त्यांनी हे काम केलंही. पण, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, समाजासाठी काहीतरी करायला हवं ही जाणीव त्यांनी 


स्वस्थ बसू देईना. त्यातही अंधांसाठी काहीतरी करायची त्यांना मनातून इच्छा होत होती. तेव्हा मुंबईत वास्तव्य असल्याने त्यांनी 2004 साली NAB या संस्थेत जायला सुरूवात केली. प्राची सांगतात, “संस्थेत स्वयंसेवक पात्रतेसाठीचे प्रशिक्षण घेतलं. त्याचा एक फायदा झाला, हाती घेतलं जाणारं काम किती महत्त्वाचं, जटील आहे, याची कल्पना आली. त्याचबरोबर, या कामासाठी काय करावं लागणार, याची डोळ्यासमोर स्वच्छ कल्पना उभी राहिली. तिथलं प्रशिक्षण संपल्यानंतर, तिथल्याच शिक्षण विभागात, स्वयंसेवक म्हणून कामाला सुरूवात केली. अगदी नोकरी असल्याप्रमाणे, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत कामाची वेळ ठरवून घेतली.”
बरीच वर्ष दृष्टीबाधितांसाठी आणि त्यांच्यासोबत काम केल्यामुळे प्राचीताईंना त्यांच्या नक्की गरजा काय आहेत, अभ्यास करताना काय काय अडचणींना तोड द्यावं लागतं याची कल्पना आली. गरजेचं, कोणत्या स्वरूपाच्या मदतीत रूपांतर करणं जरुरी आहे ह्याचा अंदाज आला होता. मुलांचा अभ्यास करून घेणे, परीक्षेसाठी मानसिकदृष्ट्या त्यांना तयार करणे, पाठयपुस्तक वाचन, पेपर् सोडवणे, ‘रायटर’चं काम करणे, या सगळ्यांत अभ्यासक्रमाची आणि इतर पुस्तकं रेकॉर्ड करून देण्याचं काम किती महत्त्वाचं आणि उपयुक्त आहे हे प्राचीताईंना जाणवलं.
हे सर्व मुंबईत चालू होतं. पण मग मिस्टरांची पुण्याला बदली झाल्याने, पुस्तके रेकॉर्ड करून देण्याचं काम फक्त पुण्यात सुरू ठेवलं. एकटीच्या भरवशावर सुरु केलेल्या कामात समविचारी मित्रांची सुद्धा साथ लाभली, एक छानसा ग्रुप तयार झाला. कसलेही संस्थात्मक स्वरूप, नोंदणी नसलेल्या या ग्रुपचे ‘यशोवाणी’ असं नामकरण झालं. यशोवाणी: दृष्टीबाधितांसाठी विनामूल्य ध्वनिमुद्रीत पुस्तकांचे ग्रंथालय!
महाराष्ट्रातलेच नव्हे, तर राजस्थान, गुजरात राज्यातून देखील विद्यार्थी याचा लाभ उठवत आहेत. आज 2018 मध्ये यशोवाणीसाठी सुमारे 150 हून अधिक स्वयंसेवक, वाचक म्हणून काम करत आहेत आणि हे सगळे काम विनामूल्य स्वरूपात चालू आहे. 
आज या लायब्ररीमध्ये सुमारे 3500 ध्वनिमुद्रीत (1.80TB) आहेत. या लायब्ररीत, अनेक हिंदी, मराठी तसेच इंग्लिश भाषेतील पुस्तके आहेत. हे सगळे काम विनामूल्य स्वरूपात चालू आहे. जरूरी प्रमाणे हवं ते पुस्तकं रेकॉर्ड करून अंध मित्र/मैत्रिणींना पाठवलं जातं. ध्वनिमुद्रीत पुस्तक हवं तेव्हा ऐकून अभ्यास करून विविध परीक्षेत यश मिळवणाऱ्या अंध मित्र/मैत्रिणींना तर ‘यशोवाणी’ हा आपला जिवाभावाचा मित्र वाटतो. या files, मोबाईल किंवा MP3 वर साठवून ठेवल्याने, त्यात एकप्रकारचा सुटसुटीतपणा येतो आणि जरी प्रवास करायची वेळ आली तरी त्यांच्या श्रवणक्रियेत कसलाच अडथळा येत नाही. एकप्रकारे, हे ‘किंडल’ आहे, असं प्राची म्हणतात.
अशा प्रकारच्या वाचनाचा अनेक विद्यार्थी लाभ घेत आहेत. स्पर्धात्मक, विद्यापीठ परीक्षा ह्यात उत्तुंग यश प्राप्त करीत आहेत. प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंडचे सतिश नवले अगदी सुरवातीच्या काळापासून ‘यशोवाणी’च्या जडणघडणीचे साक्षीदार आहेत. ते अगदी मनापासून सांगतात की ‘यशोवाणी’ची विद्यार्थ्यांसाठी असलेली बांधिलकी ही अतिशय वाखाणण्याजोगी आहे, शिवाय हे सर्व विद्यार्थी ‘यशोवाणी’ कुटुंबाचे सदस्यच झाले आहेत.
लुई ब्रेल अंध-अपंग कल्याण संस्था, पुणे यांच्याकडून समाजभूषण पुरस्कार, लुई ब्रेल पुरस्कार, दीपस्तंभ फाउंडेशनकडून दीपस्तंभ पुरस्कार, द इंटरनॅशनल असो. लायन्स क्लबकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार असे काही प्राचीताईला मिळालेले पुरस्कार म्हणजे आजवरच्या कामाची पावतीच!
प्रत्येक शहरात एक असं ग्रंथालय असावं, हे आजचं यशोवाणीचं स्वप्न आहे.
- मेघना धर्मेश.

No comments:

Post a Comment