Tuesday 11 December 2018

दुर्गम फागंदरची आदर्श वस्तीशाळा

 नाशिकच्या देवळा तालुक्यातील गिरणा नदीच्या काठावरचं फांगदर. फांगदर ही पंचवीस ते तीस घरांची, शेतमजुरी करणाऱ्या आदिवासींची वस्ती. इथं 2 जुलै 2001 रोजी ही शाळा सुरु झाली. ‘धरूया शिक्षणाची कास, करूया वस्तीचा विकास’ हे या वस्तीशाळेचं धोरण. 2007 सालापर्यंत या शाळेची इमारत म्हणजे एक कौलारू घर, पत्र्याची शेड आणि पाचटाचा झाप फक्त, अशी अपुरी बैठक व्यवस्था असलेली शाळा होती. मात्र 2007 मध्ये ही शाळा जिल्हा परिषदेकडे नियमित झाल्यावर सर्व शिक्षा अभियानातून शाळेला टुमदार इमारत मिळाली. 2016 मध्ये फागंदरची जिल्हा परिषद शाळा ही महाराष्ट्रातील पहिली आयएसओ मानांकन 

मिळविणारी वस्तीशाळा आहे. शेतमजुरांच्या आदिवासी वस्तीवर अपुऱ्या भौतिक सुविधा असूनही या शाळेला खाजगी शाळांच्या तोडीस तोड दर्जा मुख्याध्यापक आनंदा पवार आणि खंडू मोरे या शिक्षकांमुळे मिळाला आहे. अर्थात त्यात लोकसहभागाचाही मोठा वाटा आहे.
प्रयोगशील शिक्षणाच्या बाबतीत फांगदर शाळा एक पाऊल पुढे आहे. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर टाकण्यासाठी दररोज एक प्रश्न विचारला जातो. वर्गांमध्ये जमिनीवर मुळाक्षरे, गणिताचे ज्ञानरचनावादी तक्ते रंगविण्यात आले आहेत. ‘अक्षरधारा’ या उपक्रमांतर्गत गारगोटीच्या दगडांपासून, शंख-शिपल्यांपासून विद्यार्थी अक्षरे रेखाटतात. त्यांच्या नेहमीच्या खेळातल्या या वस्तू वापरून जोडशब्द शिकविण्याचीही पद्धत विद्यार्थ्यांना भावते. शाळेत मुलांच्या क्षमतांनुसार तीन गट तयार करून त्यांच्या गरजेनुसार तयारी करून घेतली जाते. फांगदर शाळेने निसर्गाच्या सान्निध्यात प्रत्येक विद्यार्थ्यांस एकेक धडा वाचावयास सांगून ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करतात.


शालेय आवारातील वृक्षसंपदेमुळे शाळेचे मनोहारी रूप मनाला भुरळ घालते. टेकडीच्या माथ्यावरची शाळेची टुमदार इमारत आकर्षक रंगरंगोटीने लक्ष वेधून घेते. पिण्यासदेखील पाणी मिळणे मुश्कील असलेल्या ठिकाणी खडकाळ माळरानावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा हिरवाईने नटविली आहे. शालेय आवारात तीनशेपेक्षा अधिक झाडे असून, त्यात बेचाळीस औषधी वनस्पती आहेत. हिरडा, बेहडा, जायफळ, कोरफड, आवळा, तुळस, रिठा, निंब, वड, अश्वगंधा इत्यादी वनस्पती आहेत. प्रत्येक वृक्षास नावे दिल्यामुळे विद्यार्थ्यांना वृक्षांची ओळख होते. आवारात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे विविध पक्ष्यांचा किलबिलाट शालेच्या आवारात ऐकू येतो.

फांगदर ही देवळा तालुक्यातील पहिली डिजिटल इ- लर्निंग शाळा आहे. संगणक, इंटरअॅक्टिव्ह स्मार्टबोर्ड आणि प्रोजेक्टरवर शाळेत अध्यापन केले जाते. आदिवासी शेतमजुरांची मुलं टॅबलेट आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून शिकतात. शिक्षकांनी विविध शैक्षणिक व्हिडिओ तयार केले असून शाळेचा स्वतंत्र ब्लॉग आहे. ह्या साधनांचा अध्यापनात वापर होत असल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणि गुणवत्तेत वाढ झाली आहे.
पारंपरिक ‘खडूफळा’ पद्धतीला फाटा देण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. ‘क्षेत्रभेट’ उपक्रमामागे चार भिंतींच्या आड मिळालेले ज्ञान बाहेरील जगाशी जोडणे हा उद्देश आहे. नदी, घाट, लघुउद्योग, बायोगॅस प्रकल्प, आदर्श आधुनिक शेती, प्राथमिक आरोग्यकेंद्र, टपाल कार्यालय, बँक, वीटभट्टी, कुक्कुटपालन उद्योग, साखर कारखाना, पोलीस ठाणे अशा अनेक ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या आहेत. क्षेत्रभेटीमुळे अभ्यासक्रमाबाहेरच्या कित्येक व्यावहारिक गोष्टी समजून घेण्यास मदत होते.

- खंडू मोरे.

No comments:

Post a Comment