Monday 3 December 2018

त्यांनी शोधली आपली वाट..

नवऱ्याला किंवा स्वतःला झालेली एचआयव्हीची लागण .... औषधपाण्यावर होणारा खर्च , सग्यासोयऱ्यांनी फिरवलेली पाठ, अचानक पडलेली आर्थिक जबाबदारी. मात्र या परिस्थितीतून उभं राहून नाशिकमधल्या ५६ महिला उद्योजक झाल्या आहेत. त्यांची प्रेरणा आहे यश फाऊंडेशन. एचआयव्हीग्रस्तांना आणि त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचं काम यश फाऊंडेशन गेली १० वर्ष करत आहे. यात मोलाची साथ लाभली आहे महिंद्रा अँड महिंद्राची. ५ वर्षांपूर्वी संस्थेनं 'पुनर्वसन' प्रकल्प सुरू केला. एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या आणि ज्या महिलांना लागण झाली आहे त्यांना संस्थेनं एकत्र आणलं. त्यांची आवड, त्यांच्याकडे असणारा 
वेळ याविषयी जाणून घेतलं. त्यांना फाइल तयार करणं, हातमोजे, कापडी पिशव्या शिवणं, वारली पेंटिंग यांचं प्रशिक्षण दिलं. मग आर्थिक साहाय्य देऊन उद्योग सुरू करण्यास प्रेरित केलं. महिलांनी पुढाकार घेत पाच बचतगट स्थापन केले. सणासुदीला दिवे, आकाशकंदील अशा आवश्यक वस्तूंचे उत्पादन घेतले जाते. त्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी फाऊंडेशन आणि महिंद्रा कंपनी सक्रिय आहेत. यातून महिलांना सात हजार रुपये मिळत असून उत्सव काळातली कमाई दिवसाच्या विक्रीवर.
"एचआयव्ही किंवा एडस म्हटलं की लोकांचा दृष्टिकोन पार बदलून जातो. फाउंडेशननं आम्हाला मानसिक आधार दिला. समदुःखी भेटल्यामुळे काम चांगलं होत आहे." इथे येणाऱ्या एक ताई सांगत होत्या. समाजाचा दृष्टिकोन अजून बदलला तर महिलांनी केलेल्या उत्पादनाला अधिक चांगला प्रतिसाद मिळेल, असं फाऊंडेशनचे रवींद्र पाटील सांगतात.
एडसबाबतच्या जनजागृतीबरोबरच मंगल मैत्री मेळावा, मुलांसाठी सकस आहार योजना, विहान प्रकल्प यश फाउंडेशन राबवत आहे.
-प्राची उन्मेष.

No comments:

Post a Comment