Thursday 27 December 2018

मुलांच्यासोबत वाढताना आपण फक्त माणूस आहोत, ही भावना अधिक चांगली वाढीस लागते

बाबाचं मनोगत : 
सुनील आणि संगीताने त्यांच्या मुलाच्या - अर्हाच्या जन्माआधीपासूनच नियोजन केलं होतं. संगीता पहिल्यापासून सामाजिक कामांशी जोडलेली आहे. आयडेंटी फाऊंडेशनची ती विश्वस्त म्हणून काम पाहते. सुनीलसारखाच तिच्या ही कामाचा पिंड थोडा फिरस्तीचा. कामाचे हे स्वरुप आणि आर्थिक गरज लक्षात घेऊन त्यांनी लग्नानंतर पाच वर्ष स्वत:ला दिली आणि त्या काळात थोडी आर्थिक घडी बसवून मगच बाळाचा निर्णय घेतला. बाळ आपल्याला होणार आहे तर आपणच सांभाळ करायचा इतका साधा निर्णय; पण तो दोघांनी मिळून घेतला. 
संगीताचा आठवा महिना संपला. आणि ती ऑफिसमध्ये असतानाच अचानक पोट दुखू लागले आणि रात्रीच्या वेळेस बाळंतीण झाली. प्रिमॅच्युअर डिलीव्हरी. अचानक झालेल्या या बाळंतपणाने सुनीलही घाबरला. बाळाला काचेच्या पेटीत ठेवावं लागलं. दहा दिवसानंतर बाळ - बाळंतीण सुखरूप घरी आले. त्याच सुमारास सुनील प्रभातमध्ये रूजू झाला होता. संगीताला बाळंतपणाची सहा महिन्यांची सुट्टी होतीच. त्यामुळे एक रूटीन तयार करायला दोघांनी या वेळेचा वापर करून घेतला. 
सुनील सांगतो, "पहिले सहा महिने ती सुट्टीवर होती. त्यामुळे बाळाला पूर्ण वेळ ती सोबत होतीच. मीही संपादकांशी बोलून माझी कामाची वेळ बदलण्याची विनंती केली. दैनिकाला आवश्यक असणाऱ्या बातम्या आणि इतर जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करेन, या हमीवर ऑफिसही तयार झालं. ऑफिसकडून जर नकार आलाच असता, तर मी नोकरी सोडायची तयारी ठेवली होती. कारण त्या क्षणी बाळाचं संगोपन महत्त्वाचं होतं. पण तसं घडलं नाही. याच काळात त्याची स्वच्छता कशी राखायची, त्याच्याशी कसं बोलायचं, खेळायचं हे समजून घेत होतो. संगीताने मानसशास्त्राशी संबधित कोर्सेस केले होते. शिवाय तिचं काम मुलांसोबतच होतं त्यामुळे तिच्या सूचना मी नीट मनापासून ऐकत होतो. साधारण तो तीनेक महिन्यांचा झाल्यावर मी तीन चार तास सलग त्याला सांभाळू लागलो. संगीताशिवाय त्याला सांभाळता येतं का? आपलं बाळ राहतं का? हे आम्ही पाहत होतो. मग हळूहळू संपूर्ण दिवस ती दिसणार नाही, असं पहायचो. आईचंच दूध त्याला वाटी चमच्याने पाजू लागलो. अर्हा सहा महिन्यांचा झाला आणि माझी व अर्हाची स्वतंत्रपणे गट्टी जमण्याचा काळ सुरू झाला. 
संगीता सकाळी 8 ते दुपारी अडीच बाहेर. ती परतल्यानंतर सुनील ऑफिसला जातो. अर्हा आता दोन वर्षांचा झाला आहे. मात्र, हे रूटीन कायम आहे. संगीता सकाळी फक्त स्वयंपाक करून जाते. त्यानंतर भांडी-कपडे, घरची स्वच्छता आणि पूर्णवेळ अर्हाचं संगोपन हे काम सुनीलच्या खात्यात असतं. 
सुनील सांगतो, "फीडींग सोडलं तर जे काही संगीता अर्हासाठी करू शकते. ते सारं मी करतो. सुरुवातीला, मला ते सारं शिकावं लागलं. संगीताकडून ट्रेनिंग मिळत होतं आणि मी तसं तसं करत होतो. पहिल्यापासूनच अर्हाबरोबर भरपूर गप्पा मारायचो. त्याला एकटं वाटू नये म्हणून त्याच्या नजरेसमोर राहत होतो. तंत्रज्ञान हे खूप मोठं वरदान वाटतं. मी त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात गुगलवर माहिती घेत होतो. बाहेरच्या देशांत ‘पालकत्वा'वर बरंच संशोधन, अनुभवपर लेखन झालंय. ते सारंच आपल्या मुलांना लागू होईल, असं नव्हे. पण त्यातील जेजे आपल्यासाठी शक्य आहे त्याचा अवलंब मी अर्हासाठी करत होतो. रात्री झोपताना बडबडगीते, गाणी म्हणतच झोपायचं. तोतरं न बोलता स्पष्ट बोलायचं. गोष्टी वाचून दाखवायच्या, चित्रं पहायला लावायची, असा सारा दिनक्रम आम्ही सेट केला. त्याच्या कुतूहलाला कायम जागं ठेवलं. बाबा हे काय? बाबा ते काय? या त्याच्या प्रश्नांना मी कधीच कंटाळत नाही. तंत्रज्ञानाचा आणखी एक फायदा झाला ते म्हणजे मोबाईलवर बातम्या टाईप करणे. किमान माहिती मिळवण्यासाठी फोनवर बोलता येणे. अर्हाला दुपारी 1 वाजता झोपायची सवय लावली त्यामुळे पुढच्या तासभरात मी माझ्या कामाचा काही भाग करून घेऊ शकतो. संगीता आल्यानंतर तो जागा होतो आणि मग दोघं पुढचा वेळ सोबत असतात.''
सुनील व संगीता परस्परसंवाद करताना अर्हाही त्यांच्या बरोबरीचा आहे, अशा रितीनेच बोलतात. घरकामातील एकमेकांना मदत करण्याची वृत्ती, पुस्तक घेऊन वाचणं असं तो या दोघांना पाहून शिकत आहे. बाळाच्या वाढीत बाबाचा सहभाग सुनीलला शंभर टक्के महत्त्वाचा वाटतो. सुनीलने पालकत्त्वाच्या बाबतीत एक उत्तम विचार मांडला. तो म्हणतो, "अर्भकावस्थेत बाळाला समोरची व्यक्ती आई की बाबा असं कळत नसतं. आपण म्हणजे त्यांच्यासाठी त्याची काळजी, प्रेम करणारी आणि भीतीच्या वेळेत सोबत असणारी व्यक्ती इतकंच त्यांना कळत असतं. त्यामुळे आपण त्याच्यासोबत वावरताना आपल्या डोक्यातील जेंडरच्या कल्पना पुसून टाकाव्यात. खरंतर मुलंच त्या पुसून टाकतात. मुलांच्यासोबत वाढताना आपण फक्त माणूस आहोत, ही भावना अधिक चांगली वाढीस लागते. अर्हाने त्या अर्थाने माझं माणूसपण जागं केलं असं मला सतत जाणवत राहतं.”
सुनील राऊत.
- हीनाकौसर खान-पिंजार

No comments:

Post a Comment