Monday 5 November 2018

ll पहिल्यांदाच जिल्हाधिकार्‍यांना पाहिलं l दिवाळीआधीच गाव सजलं ll

दिवाळी काही दिवसांवर होती. तरीही, गाव सडा, रांगोळ्यांनी सजलेलं. रस्त्यावर फुलांच्या पाकळ्या अंथरलेल्या. गावातील भजनी मंडळ हातात टाळ-मृदंग घेऊन सज्ज झालेलं. औक्षणासाठी महिलांनी आरतीचं ताट तयार केलेलं. गावच्या वेशीवर जिल्हाधिकार्‍यांची गाडी येताच भजन सुरू होतं. महिला, गावातील नागरिक पुढे सरसावतात. आबालवृध्दांचीही पाहुण्यांना पाहण्यासाठी धडपड सुरू होते. ही नवलाई स्वातंत्र्यापासून प्रथमच गावात कलेक्टर येत आहेत म्हणून होती. तुळजापूर तालुक्यातल्या वागदरी गावात कलेक्टरांचं अनोखं, दिमाखदार स्वागत झालं आणि कलेक्टरही भारावून गेले. दणक्यात स्वागत करूनही गावकऱ्यांनी कलेक्टरसाहेबांकडे काहीही मागितलं नाही, हे विशेष.
स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली नाही, असं गाव सहसा नसेल. नळदुर्ग-अक्कलकोट रोडवरच्या दीड हजार लोकसंख्येच्या वागदरी गावाने मात्र स्वातंत्र्यानंतर प्रथमच जिल्हाधिकारी पाहीले. आजवर कधीही जिल्हाधिकारी गावात आलेलेच नव्हते. म्हणूनच, गावकऱ्यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना गावात निमंत्रित केलं होतं. त्यांचा अनोखा स्वागतसोहळा शनिवारी, २७ ऑक्टोबरला साजरा झाला.
त्याचं झालं असं, वागदरी गावातले सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर दोन वर्षांपासून राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा अधिकारी वर्गात मोठा संपर्क आहे. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांना एकदा गाव पाहण्यासाठी आणा, अशी विनंती गावकर्‍यांनी मिटकर यांना केली. गावकऱ्यांची ही मागणी मिटकर यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्यापर्यंत पोहोचवली. स्वातंत्र्यानंतर एकदाही कुठलेही जिल्हाधिकारी वागदरीमध्ये गेलेले नाहीत, हे ऐकल्यानंतर गमे यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी यासाठी लगेच होकार दिला. कुठल्याही शासकीय औपचारिकतेशिवाय गावभेटीचा कार्यक्रम ठरला. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, त्यांच्या पत्नी भारतीताई आणि मुलगी ऋतुजा, असे तिघे गावात दाखल झाले. गावकऱ्यांनी मुख्य रस्त्यापासून सुमारे १ किलोमिटर अंतरापर्यंत, म्हणजे गावातील भवानसिंह महाराज मंदिरापर्यंत रस्त्यावर रांगोळी, फुलांच्या पाकळ्या अंथरण्यात आल्या होत्या. टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘रामकृष्ण हरी’च्या जयघोषात, टाळकऱ्यांनी पाऊल खेळत, महिलांनी जागोजागी औक्षण करत उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हाधिकाऱ्यांचं स्वागत केलं. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. घरांसमोर रांगोळ्या काढलेल्या, महिलांकडून औक्षण करून अंगावर फुलांचा वर्षाव केला जात होता. मिठाई वाटली जात होती. गावात प्रथमच जिल्हाधिकारी आले होते ना!
स्वागतानंतर भवानसिंह महाराज मंदिरासमोर रात्री भजनसंध्या कार्यक्रम आयोजला होता. यावेळी जिल्हाधिकारीही भजनात दंग झाले.
तीर्थक्षेत्र अक्कलकोटला जाताना नळदुर्गपासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर म्हणजे मुख्य रस्त्यालगत असलेल्या वागदरी गावाला संतविचारांची परंपरा लाभली आहे. गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती. फारशी बरी परिस्थिती नसली, तरी वारकरी सांप्रदायाच्या संस्कारांप्रमाणे गावकऱ्यांमध्ये कायम समाधान जाणवते.
गावात रस्ते, नाल्या, पाणी, अारोग्य, अशा मूलभूत बाबींचा विकास झालेला असला तरी इतर गावांप्रमाणे त्यात काही उणीवाही जाणवतात. मात्र, यासाठी गावकऱ्यांना आंदोलने, मोर्चे काढावे लागले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांची भेट ही अनौपचारिक ठरावी, अशी गावकऱ्यांची अपेक्षा होती. तरीही जिल्हाधिकारी गमे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना अडचणी जाणून घेतल्या.
- चंद्रसेन देशमुख.

No comments:

Post a Comment