Tuesday 27 November 2018

शाळेनं मला काय दिलं - गुरुजी, म्या मोठा बनेल नव्हं...

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील सालनापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेतली ही गोष्ट. एका वर्षापूर्वी रडतरडत शाळेत येणारा ओम. अल्लड स्वभावाचा, माझ्या अनिल दादा सारखा! कोणताही प्रश्न असो उत्तर हमखास. माझ्या अवती भवती फिरणारा. आईने शाळेत सोडलं की खूप रडायचा, "ये मम्मी मी येस घरला", अश्रुंनी न्हालेला ओम माझ्या पायाला घट्ट धरायचा. कोणतेही काम असो ओम माझ्या अवती भवती फिरत रहायचा.
अगदी न चुकता रोजच ओम माझ्यासाठी चॉकलेट, गोळ्या आणायचा. जय आणि ओम ही मला खूप आवडणारी पण सगळयात जास्त खोड्या करणारी मुलं. आई खूप काबाडकष्ट करून मोठ्या आशेनी मुलांना शिकवित होती. ती नेहमी सांगायची, ‘गुरुजी ओमकडे लक्ष देत रहा!’
जि.प. शाळेत माझ्या आश्वासनानंतर दाखल झालेला ओम पहिल्या वर्गात सर्व क्षमता प्राप्त करून उतीर्ण झाला आणि पूर्ण गाव माझ्या शाळेची प्रशंसा करू लागला. आता इयत्ता दुसरीला ओम खूप गैरहजर राहू लागला. वारंवार सुट्टी मागू लागला. आज बरेच दिवसानी ओमची आई शाळेत आली. पण प्रकृती ढासळलेली. दुसऱ्याला प्रेरणा देणारी स्त्री आज अशक्त झालेली आढळली. बोलण्यात विलक्षण कमकुवतपणा जाणवत होता. आणि अशातही ती मला म्हणाली, ‘सर, माझ्या दुखण्याने ओमची शाळा बुडत आहे. पण, माझा ओम घरी अभ्यास करतोय त्याला एक उत्कृष्ट व्यक्ती बनवा. सुसंस्कारीत आदर्श माणूस बनवा.’ बोलताना तिला सतत रडू येत होतं.
मला माहित नाही गरीबी, श्रीमंती जात पात काय आहे पण माणसं शिक्षणाचं महत्त्वं जाणू लागली की ते मुलांना शंभर टक्के शाळेत पाठवतातच .
जवळ जवळ दोन वाजले होते. ओमचा रडण्याचा आवाज आला. ओम खूप रडत होता आणि त्याचा अप्पा मला आवाज देत होता. ओमच्या आईला आज ऑपरेशनसाठी नेत होते. ती म्हणत होतं, "माझ्या ओमला सांभाळा गुरुजी!"
ओमला मी म्हटलं, अरे, उदया जाऊ आपण भेटायला. पण हा उदया येणार नव्हता. ओमच्या आईने दवाखान्यात रात्री १०.३० ला आपला जीव सोडला. आईवर जीवापाड प्रेम करणारा, आईचा पदर न सोडणारा माझा ओम किंकाळत होता. म्हणत होता, ये आई उठणं गं. पण काळ ओमला एकटं राहण्यासाठी सोडून गेला होता. त्याच्या कपडयावर एकही डाग नसायचा मी विचारलं की तो म्हणायचा, आई म्हणते साहेब व्हायचं तुला! पूर्ण गावकऱ्यांच्या डोळयांत अश्रू आणणारा हा प्रसंग. ७ वर्षाचा ओम कधी पायाजवळ तर कधी पोटाजवळ आईला बिलगत होता. दोन रात्र पोरगा झोपला नाही. आई, आई जप सतत सुरू होता. पण आज माझा ओम शाळेत आला आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी! मी म्हटलं, ‘ओम, सर्दी झाली रे बेटा तुला!’
गुरूजी आई गेली ना देवाच्या घरी, नदीवर आंघोळ केल्यामुळे सर्दी झाली... पण मला बाम कोण लावील, गुरूजी आई नाही येईल का हो... माझ्या मांडीला बिलगून माझा ओम म्हणत होता. गुरुजी मला मोठं व्हायचं आहे... गदगदलेल्या अश्रुंना सावरत त्याला मी म्हटलं, ‘नक्कीच मोठा होशील तू.’
आईच्या विरहानंतर माझ्या ओमला शाळविषयी ममत्व वाटतं. आधार वाटतो. हे नातं आहे शिक्षक आणि विद्यार्थाचं! जगावेगळं....
- विनोद राठोड.

No comments:

Post a Comment