Sunday 25 November 2018

माझ्या शाळेनं मला काय दिलं ? --डॉ.कैलास दौंड

माझे शालेय शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भुतेटाकळी, सोनोशी आणि येळी या खेडेगावी झाले. ग्रामीण भागात मिळणारे शिक्षण हे शहरात मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा चांगले की वाईट हे त्यावेळी कळत नव्हते पण आपल्याल्या शिकवणारे शिक्षक आत्मीयतेने शिकवत आहेत. हे ध्यानात यायचे. शाळेबद्दल आपुलकी वाटायची. खेडेगावात शालेय शिक्षणासोबतच शेती व शेतीसंबंधी अनेक गोष्टी शिकायला मिळतात. तिथल्या गरीब पण प्रेमळ माणसांचा संस्कार आपोआप आतमध्ये झिरपत गेला. 
भुतेटाकळी येथे पहिली दुसरीला असताना शाळेची,
शिक्षकांची भीती कधीच वाटली नाही. मंदिर, नदी आणि पटांगणात खेळायचो. खूप मजा यायची. त्यामानाने सोनोशीत तिसरीमध्ये, अपरिचित मित्र आणि नवखे शिक्षक यांची भीती वाटली. त्यातच तो छडी वाजे छमछमचा काळ होता. ते गाणे म्हणायला कितीही चांगले वाटले तरी अनुभवताना घाम फुटे. भीती आणि धाक यामुळे अभ्यासात मागे पडलो. मग एक कमी मारणारे शिक्षक वर्गाला मिळाले आणि पुन्हा अभ्यासाने गती घेतली. एकनाथ कराड नावाचे तेव्हाचे नावाजलेले शिक्षक या शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांची शिस्त करडी होती. रोज शेवटच्या तासाला ते पाढे म्हणून घेत. गीताईचा बारावा अध्याय, समरगीते, प्रार्थना गीते ते खूप सुंदर चाली लावून म्हणून घेत .
कधीकधी दुपारी आम्हीे नदी किंवा विहिरीत पोहायला जायचो तेव्हा मग हेच शिक्षक भीती बनून आमच्यासमोर उभे राहयचे .या शाळेत दर गुरूवारी दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. त्यात सक्तीने एकेका वर्गाला सहभागी व्हावे लागे. प्रत्येकाला काही ना काही सादर करावे लागे. मला भाषण करायला आवडायचे. सातवीत स्कॉलरशिप परीक्षेला आम्हाला बसवले होते. परीक्षेच्या दिवशीच माझे वडील आजारी होते. पाथर्डीला येण्याजाण्यासाठी दहा रुपये आवश्यक होते. मी संकोचाने आजारी वडिलांकडे पैसे मागू शकलो नाही. परिणामी शिक्षक इतर मुलांना घेऊन निघून गेले. मी मात्र परीक्षेपासून वंचित राहिलो.
येळी येथील हायस्कूलचे शिक्षण बरेच काही शिकवणारे आणि स्वयंशिस्त लावणारे होते. शाळा सात किलोमीटरवर. अभ्यासात बरा होतो. घरी वीज नव्हती. चिमणीच्या उजेडात अभ्यास करावा लागे. घरची माणसे लवकर झोपत. सुरक्षिततेसाठी ते चिमणीदेखील उंचीवरील देवळीत ठेवत. परिणामी अभ्यास थांबवावा लागे. शिक्षक अवांतर वाचनासाठी पुस्तके देत. येथेसुद्धा आमले आडनावाचे एक मारहाण आणि अपमान करणारे शिक्षक होते. त्यांना वैतागून नववीत शाळेत न येताच रस्त्यात बसून तीन महिने काढले. सुदैवाने त्यांची बदली झाली आणि माझी शाळा सुरू झाली.
एक मात्र निश्चित म्हणेन की माझ्या त्यावेळेच्या खेड्यातील शाळा शहरातल्या शाळांहून कमी नव्हत्या. आजच्या इतक्या त्या बालस्नेही नव्हत्या हेही खरेच कारण अजून ही संकल्पना यायला व रूजायला अवकाश होता. ते आमच्या पिढीचे काम आहे.
-डॉ.कैलास दौंड -

शिक्षक, कवी, कादंबरीकार आणि समीक्षक

No comments:

Post a Comment