Sunday 25 November 2018

माझ्या शाळेनं मला काय दिलं ?- मच्छिंद्र बोऱ्हाडे, शिक्षक.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिरोली बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माझं माध्यमिक शिक्षण जून 1979 ते मार्च 1985 या कालावधीत झालं. आमच्या गावातील या शाळेत जवळपासच्या पाच-सहा गावांतली शेतकरी कुटुंबातील मुलं शिकण्यासाठी येत. शाळेतील मुलांचा त्यावेळचा गणवेश म्हणजे पांढरा हाफ शर्ट, गांधी टोपी आणि खाकी हाफ पँन्ट तर मुली पांढरा हाफ शर्ट आणि निळ्या रंगाचा स्कर्ट घालत. आमच्या शाळेत दीक्षित सर मुख्याध्यापक असताना त्यांनी वाचनाचे संस्कार मुलांवर व्हावेत म्हणून खूप चांगले आणि अनोखे उपक्रम शाळेत राबवल्याचं माझ्या स्मरणात आहे. ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर, रणजीत देसाई यांच्याशी गप्पा त्यांच्याच मुख्याध्यापक पदाच्या काळात झाल्या. शाळेत त्यावेळी ग्रंथालय छोटं असताना सुद्धा खूप चांगली पुस्तकं मिळायची. आमच्यावेळी वाचनासाठी घेतलेलं पुस्तक आठवड्यात एकदाच बदलून मिळायचं, त्यामुळे ते पूर्ण वाचून मगच मी परत जमा करीत असे. साने गुरूजींचं 'श्यामची आई' हे शाळेत असतानाच वाचलं होतं. चांगल्या वाचनाची सवय 
शाळेतील या उपक्रमांमुळेच लागली. आमच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेच्या पुणे जिल्ह्यात तेव्हा जवळजवळ पन्नास माध्यमिक शाळा होत्या. त्या काळात बहुतांश आंतरशालेय नाट्य स्पर्धांचं आयोजन आणि साहित्यिक उपक्रम आमच्याच शाळेत झाले. मुलांना शाळेत चालत अथवा सायकलवरून येण्याशिवाय अन्य साधन त्या काळी उपलब्ध नव्हतं. तरी सुध्दा पी. टी. शिकवणाऱ्या नांगरे सरांच्या करड्या शिस्तीमुळे वेळेवर जाण्याचा तेव्हा झालेला संस्कार आजही कायम आहे. दहावीच्या वर्षी तर दीपावलीच्या सुट्टीनंतर रात्रीचे जादा वर्ग शाळेत सायंकाळी सात ते नऊ या वेळेत चालत. रात्री घरी जाण्याची सोय नसायची. मग आम्ही मुलं त्या काळात पैसे देऊन कोणाच्या तरी घरी राहत असू. मग दुसऱ्या दिवशी पहाटे उठून घरी जात असू. त्यानंतर शेतकरी असलेल्या वडिलांना थोडी फार मदत करून पुन्हा शाळेत जावं लागायचं. शाळेची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच अशी असायची. मात्र दहावीचे जादा वर्ग सकाळीही दहा ते अकरा या वेळेत चालंत. आम्हाला लाभलेल्या चांगल्या शिक्षकांमुळे ट्युशन किंवा क्लासला जाण्याची वेळ आमच्यावर आली नाही. मन लावून शिकवणारे शिक्षक असल्यामुळेच पालकंही शालेय शिस्त आणि प्रशासनात फारसा हस्तक्षेप करीत नसंत.
शाळेला प्रचंड मोठं मैदान आहे. साहजिकच शनिवारची सामुदायिक कवायत आणि ती सुद्धा वाद्यांच्या साथीत, हा आनंदाचा सोहळाच असायचा. रोजची शाळेची प्रार्थना सुद्धा शाळेच्या मोठ्या प्रांगणात होत असायची. गावातील शाळा असूनही या शाळेचे अनेक विद्यार्थी अमेरिका ते पूर्वेकडील तैवान सारख्या देशांत आणि प्रशासनात अगदी जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.
माझ्या शाळेनं मला केवळ पुस्तकी शिक्षणच दिलं नाही, तर आयुष्याकडे बघण्याची दृष्टी दिली. या अफाट जगात कुठेही गेलं तरी आपला निभाव लागेल, हा आत्मविश्वास दिला. आज मी जेव्हा मुलांसमोर शिक्षक म्हणून उभा असतो तेव्हा माझ्या शाळेनं दिलेला हा आत्मविश्वास मला माझ्या क्षेत्रात नव्या वाटा शोधण्याचं बळ देतो. म्हणूनच माझी शाळा कायम माझ्या बरोबर असते. कारण तिचं देणं आता माझ्या जगण्यात उतरलेलं आहे.
मच्छिंद्र बोऱ्हाडे, शिक्षक, बोरिवली

No comments:

Post a Comment