Sunday 25 November 2018

माझ्या शाळेनं मला काय दिलं? -- ईर्शाद बागवान


शाळेचे दिवस एकत्रितपणे छान होते. आठवतात अधूनमधून. चौथीपर्यंतच्या इनामदारबाई आठवतात, चेहऱ्यावरून हात फिरवत मायेने बोटे मोडणाऱ्या. चंदा नावाची वर्गमैत्रीण, त्यावेळच्या मानाने बरीच उंच. भलीथोरली. सारखं मांडीवर बसवून घेत कौतुक करणारी. शांतीलाल, प्रवीण, संतोष यांसारखे बेरकी दोस्त. शाळेच्या वाटेवर भेटणारा येडा पांग्या आठवतो. किडक्या दातांनी हातपाय खुरडत हसतखिदळत सदा मागेमागे पळणारा. पाटीतली चिंचाबोरंपेरू विकणारी यमाईही आठवते. तसंच पाचवीनंतरच्या वर्गातले इंग्रजीचे कडक्क घाऱ्या डोळ्यांचे सावंत सर. त्यांची एक छडी इंग्रजीचा आयुष्यभराचा बेस पक्का करून गेली. दोन दिवस हात पोळत होता. असेच साबळे सर बीजगणिताचे. पण त्यांची शैली विनोदी. कधीमधी चिडायचे तेव्हा मग थेट लाथाच घालायचे. पण इतकं भारी शिकवायचे की, गणित पहिलं कुणाचं होतंय, अशी स्पर्धा लागायची आमच्यात. पीटीचे माने सर आठवतात. काळेकभिन्न. बुटके. जाड मिशा. कायम हातात छडी. शांतीत खेळायलासुद्धा न देणारे. आणि धनवे सर संस्कृतचे. कायम पान तोंडात. गोरे. धष्टपुष्ट. मिशांचा आकडा. पाठांतर छडीच्या तालावर करून घेणारे.
ही लिस्ट फारच मोठी होईल. एकूण आमच्या वेळी शिक्षणात छडीशिवाय पर्याय नव्हता. पण एक मात्र झालं. आमचा पाया बाकी भक्कम केला या छडीने. आयुष्यभर न विसरण्याजोगा. तसं तर एखादेवेळीच प्रत्यक्ष छडी खाल्ली असेल. पण छडीची खरीखुरी भीती मनात होती. मायेने जवळ घेणारे शिक्षक फक्त प्राथमिकला.
आता वाटतं, छडी नसती तरी भागलं असतं कदाचित. प्रेमाने जग जिंकता येतं. आम्ही तर, निरागस मुले होतो न कळत्या वयातली.
कधीकधी, खूप हमसून रडण्याचेही प्रसंग आले. पीटीच्या सरांनी खेळात घ्यायला कायमच नकार दिला आणि आपण कायम प्रेक्षकाचाच रोल निभावला तेव्हा. उताऱ्याची पूर्ण केलेली वही मित्राकडे राहून तो ती घरी विसरल्यावर आपल्याला मार खावा लागला तेव्हा. फुटबॉलचे खिळेवाले बूट घालून येणारे चौहान सर मित्राला लाथा घालत होते तेव्हा. कारण काय तर उत्तर येत नाही. आणि गॅदरिंगमध्ये भाग घ्यायची खूप इच्छा असूनही, गाण्याची प्रॅक्टीस करूनसुद्धा ऐनवेळी नाव घेतलं नाही म्हणून.
अशावेळी संस्कारक्षम आपण आणि अत्याचारक्षम आजुबाजूचे, असं वाटायचं. खूप रडू यायचं. मस्तीखोर नसताना, भोगाव्या लागणाऱ्या शिक्षा तर अजूनच ताप द्यायच्या.
धर्मातली ऐकीव बंधनं तर प्रार्थनेला हात जोडून नीट लक्ष केंद्रीत होऊ द्यायची नाहीत. शिक्षकांची नजर चुकवून हात हळूच पसरवले जायचे आणि तौबा तौबाचा गजर तोंडून चालू असायचा. आताशा वाटतं, आजच्या काळातल्या शाळांनीही धर्म जसा काय वाटून घेतला आहे. मराठी शाळांमध्ये सगळे मराठी सणवार, व्रतवैकल्ये, प्रार्थना, भजनं, गीता वगैरे. इंग्रजी शाळांत ख्रिश्चन धर्मपारायणं, उर्दू शाळांत मुस्लिम उपासनापद्धती. हे सगळंच, खरं तर अति होतंय.
आपण मुलांना त्यांच्या कलाने नीट वाढू देत नाही. त्यांच्यावर कायमच काही ना काही लादत राहतो. आपल्याकडे निकोप शाळा कधी निर्माण होणार? जिथे धर्म नसेल, पण संस्कार असतील. जे शिक्षकवृंदांच्या हालचाली, बोलण्या- वागण्यातून मुलांवर होतील. वातावरण मुलांच्या बौद्धिक, सामाजिक आणि शारीरिक वाढीसाठी उपयुक्त असेल. जिथून विकार वाऱ्यावर उडून जातील. आणि राहीले तरीही सामाजिक नुकसान न होण्याच्या पातळीपर्यंत राहतील. उद्याचं भविष्य म्हणून आपण मुलांकडे पाहतो. आणि त्यांच्या बाबतीत अति काळजी असल्याचं दाखवत वाढीच्या अंगाने निष्काळजी राहतो.
आजच्या माझ्या मुलीच्या मराठी शाळेचे चित्र तरी फारसे सुखावणारे खचितच नाही. आजच्या शाळा म्हणजे भरमसाठ लिखाण आणि बेसिक कमकुवत, अशी गत. पळा पळा स्पर्धा करा एवढंच का आपल्या जगण्याचं सूत्र? चांगला नागरिक बनण्याची शाळा ही पहिली पायरी आहे. हेच आपले ध्येय असावं. म्हणजे जराशाने भावना दुखण्या - दुखवण्याची वेळ कुणावरही येणार नाही. सब्र का माद्दा बढेगा. समोरच्याला ऐकून घेण्याइतकी, समजण्याइतकी कुवत आपल्यांत निर्माण होईल. जरी ते नावडते असले तरीही.
शाळेनं मला काय दिलं, हा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारतो तेव्हा बराच काळ उत्तराच्या शोधात मेंदू ब्लँक होतो. मग वाटतं, शाळेने भलेबुरे संस्कार तर केलेच. ज्ञानही दिलं. मित्र दिले. पण सगळंच मागं पडलं. जगण्यातल्या कोलाहलात हरवलं कुठेतरी. आत्ता या धावपळीच्या जगण्यात पदोपदी कामाला येतो संयम. आणि तो बहुतांशी माझ्या स्वभावाचा भाग असला, तरीही नीट विचार करता, त्याला आकार दिला शाळेनेच हेही आकळतं. ह्या बाबतीत शाळेचे अनंत आभार मानायलाच हवेत
- ईर्शाद बागवान.

No comments:

Post a Comment