Sunday 25 November 2018

माझ्या शाळेनं मला काय दिलं? - श्रीरंजन आवटे.

का कोण जाणे; पण सुरूवातीपासून शाळेची प्रचंड भीती माझ्या मनात होती आणि काहीही झालं, तरी अशा ठिकाणी जायचं नाही, असा चंगच मी बांधला होता. मी काही शाळेत जात नाही, हे पाहून माझ्या काकाने मला भीती घातली की शाळेत गेला नाहीस तर गुरामागं पाठवतो तुला. खरं म्हणजे आमचं काही शेत नव्हतं; पण गावात असल्याने दररोज गुरांमागे जाणा-या पोरांकडे पाहून भीतीने का असेना मी शाळेत पाऊल टाकलं. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील पारेवाडी कोर्टी आणि वीट या गावांमध्ये माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. त्यात शाळेविषयी सर्वाधिक प्रेम वाटलं ते श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट या माझ्या माध्यमिक शाळेत. ओहोळ सर आणि आवटे सर या दोघांच्या आग्रहाखातर कोर्टी या माझ्या राहत्या गावापासून ८ किमी दूर असणा-या गावी मी शिकायला लागलो. नंतर तालुक्याच्या गावाहून उलट प्रवास करत मी वीटला येत असे. ‘वीटची गोडी अवीट’, अशी कोटीही आम्ही अनेकदा करायचो. 
इयत्ता सहावी ते दहावी या पाच वर्षांच्या काळात शाळेनं जे काही दिलं त्याबद्दल आम्ही शाळेचे मनापासून ऋणी आहोत. स्कॉलरशिप असो वा एमटीएस, इलिमेन्टरी-इंटरमिजिएट चित्रकलेच्या परीक्षा असोत किंवा खोखोचा सराव सगळ्या बाबतीत आमचे शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करत राहीले. आमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षांसाठी शाळा भरण्याआधी आणि शाळा सुटल्यानंतर दोन्ही वेळेस आमचे शिक्षक आमच्यासाठी अधिक वेळ तास घेत असत. आम्ही स्कॉलरशिप, एमटीएसमध्ये नंबर पटकावले; अगदी टी एन शेषन (तेव्हा त्यांच्याविषयी फार काही माहीत नव्हतं) यांच्या हस्ते माझा सत्कारही झाला पण त्याहून अधिक त्या अभ्यासातला वेळ प्रचंड एंजॉय केला. शाळेला सुट्टी असेल तर मला बोअर व्हायचं इतकी शाळेविषयी आत्मीयता निर्माण झालेली होती. शाळेचं ग्रंथालय किंवा प्रयोगशाळा फार काही सुसज्ज नव्हती; पण आजकाल अभावानेच दिसणारी आस्था आमच्या शिक्षकांमध्ये होती. 
आमच्या शाळेला प्रशस्त पटांगण होतं. आज शहरातील अनेक शाळांमध्ये मैदानच नसतं हे पाहून वाटतं, खेळाशिवाय शाळेला काय अर्थ! शाळेतील अनेक मुलं खोखोमध्ये राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर चमकत होती; मात्र बहुतेकांप्रमाणे मला सर्वाधिक क्रिकेट आवडायचं. ‘अ’ तुकडीच्या विरूध्द ‘ब’ तुकडी अशी आमची ११ रूपयांची मॅच असे. या मॅचेस धमाल आणायच्या. मी त्यात इतका बुडून जायचो की एका मॅचमध्ये कॅच घेऊन मी पडलो आणि मला फ्रॅक्चर झालं. अर्थातच या सा-याच गोष्टीत आम्ही मिळून मिसळून सर्वत्र होतो त्यामुळे खूप चांगले मित्र मिळाले. वर्गातल्या मुली शाळेत असताना मैत्रिणी झाल्या नाहीत कारण मुलींशी बोलायची परवानगीच नव्हती. अगदी मुला-मुलींसाठी शाळेत जाण्याचे रस्तेही वेगळे होते. शाळेतून बाहेर पडल्यावर वर्गातल्या काही मुलींशी छान मैत्री झाली. शाळेची सहल गेली तेव्हाही आम्ही सर्वांनी त्या पर्यटनाच्या ठिकाणांपेक्षाही एकमेकांसोबतचं असणं अधिक एंजॉय केलं. 
आज शाळेचे मुख्याध्यापक असणारे मारकड सर आम्ही मुलांनी वाईट मार्गाला लागू नये, म्हणून आवर्जून गणिताच्या तासातच इतर गोष्टी सांगत असत. त्यांची स्वतःची अध्यात्माची एक समज आहे आणि त्यातून स्वतःच्या शोधासाठी ते आम्हा सर्वांना प्रवृत्त करत असत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता आम्हाला सतत प्रोत्साहन मिळत असे. स्लो सायकलिंग, लिंबू चमचा, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा... असे अनेक उपक्रम सुरू असत. शाळेत असतानाच आम्ही काही मित्रांनी मिळून ‘नूतन भारत’ नावाची संघटना स्थापन केलेली होती. अगदी काही महिने ही संघटना टिकली; पण नवं काही करण्याची इच्छा सतत निर्माण होईल, असं वातावरण शाळेनं आम्हाला दिलं. इयत्ता दहावीला असताना आजबे सर आमचे वर्गशिक्षक होते. आमच्या वर्गातून कोणीतरी बोर्डात यावं, अशी सर्वांची इच्छा होती. ती मात्र अपुरी राहिली. अवघ्या काही मार्कांनी माझा बोर्डातला नंबर गेला. मी मात्र प्रचंड आनंदी होतो. स्कॉलरशिप, एमटीएस या परीक्षांमधील यशाहूनही लोकांच्या नजरेत दहावी ही ग्रेट परीक्षा असल्याने मला कमालीचा आत्मविश्वास मिळाला होता. त्याहूनही अधिक म्हणजे अत्यंत खुल्या, निरोगी आणि निखळ अशा वातावरणात आपल्याला शिकता आलं, याचा मला आनंद होता. शाळेच्या अभ्यासाच्या धबडग्यात आपलं मनसोक्त वावरणं, असणं हरवलं नाही, याचं बरचंसं श्रेय माझ्या पालकांना आणि शाळेला आहे आणि लाभलेली मैत्री ही सर्वांत मोठी उपलब्धी. याहून आणखी काय हवं असतं

श्रीरंजन आवटे.

No comments:

Post a Comment