Friday 2 November 2018

आईवेगळ्या कोमलला जगवणारे आरोग्य अधिकारी - कर्मचारी



निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांच्या घरी गोड बातमी समजली. सुजाताने प्रसूतीवेदना सहन करत 22 ऑक्टोबर, 2017 रोजी कोमलला जन्म दिला. 
पण, बाळाचं वजन अवघं 900 ग्रॅम. इथून पुढं, जिवंत राहाण्यासाठी दोघींचा संघर्ष सुरू झाला. सुजाता हरली, मरण पावली. कुटुंबियांनी कोमलकडे पाठ फिरवली. तरीही कोमल जगली, तिची तब्येत सुधारली. कसं घडलं हे? कोणी घडवलं?
अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी यांनी कोमलच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. ११ दिवस ती जिल्हा रुग्णालयात असताना, आजी लीलाबाई गायकवाडसोबत अंगणवाडी सेविका प्रमिला साळी, मदतनीस वृषाली शिरसाठ यांनी तिची काळजी घेतली. आईविना पोरक्या कोमलच्या तब्येतीची विचारपूस अंगणवाडी सेविका दररोज तिच्या घरी जाऊन करत होत्या. तिची शक्य तेवढी काळजी घेत होत्या.



अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना खांदवे यांनीही घरी भेट देऊन कोमलच्या कुटुंबियांना समजावलं. कमी वजनाच्या कोमलला जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करायला सांगितलं. यासाठी तिचे पालक तयार होत नव्हते. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाचे डॉ. विशाल जाधव, डॉ शुभांगी भारती यांनी पुढाकार घेतला. अखेर सर्वांच्या प्रयत्नाने कुटुंबाचं मतपरिवर्तन झालं आणि 5 महिन्यांची कोमल जिल्हा रूग्णालयातल्या शिशु पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल झाली. तेव्हा तिचं वजन होतं 3 किलो 300 ग्रॅम.
आता ती चोवीस तास डॉक्टरांच्या निगराणीत होती. त्यामुळे, योग्य आहार मिळून 15 दिवसांतच तिचं वजन 4 किलो 700 ग्रॅमपर्यंत वाढलं. केंद्रात डॉ. जाधव, डॉ. भारती यांनी तिची देखभाल केली. घरी सोडल्यानंतरही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. गावले यांनी तिच्या घरी भेटी, नियमित तपासणी सुरूच ठेवलं. अंगणवाडी सेविका आणि त्यांची मदतनीस यांनी दररोज पाठपुरावा करून, तिला पोषण आहार देऊन तिची काळजी घेतली. आता तिचं वजन तब्बल 9 किलो 700 ग्रॅम इतकं झालं आहे. नुकताच 22 तारखेला या सगळ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी विंचूर येथील अंगणवाडीत कोमलचा पहिला वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. 

- प्राची उन्मेष

No comments:

Post a Comment