Sunday 2 September 2018

वक्तृत्त्व स्पर्धेतून तिला मिळाला वृक्षसंवर्धनाचा वसा

शिवानी प्रेरक वैद्य. बीड शहरातील संस्कार विद्यालयातील आठवीची विद्यार्थीनी. ‘वृक्षसंवर्धन’ या विषयावर आयोजित आंतर शालेय जिल्हा वक्तृत्त्व स्पर्धेत तिला प्रथम पारितोषिक मिळाले. आणि इथूनच शिवानीचा आगळा प्रवास सुरू झाला. वक्तृत्व स्पर्धेत आपण मांडलेले मुद्दे हे प्रत्यक्षातही अंमलात यावेत, या उद्देशाने ‘वृक्ष संवर्धन : एक संदेश, जागर अभियान २०१८’ तिने सुरू केले आहे. आपण झाडे जगवण्याचा भाषणातून दिलेला संदेश तेवढ्यापुरताच मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतही यायला हवा म्हणून तिने २१ हजार विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांना वृक्षारोपणाच्या मोहिमेत सहभागी करून घ्यायचं ठरवलं अन‌् एक ऑगस्ट २०१८ रोजी या उपक्रमाचा ‘श्रीगणेशा’ केला. बीड शहरातील चंपावती विद्यालयाच्या परिसरात एक रोपटे लावून विद्यार्थ्यांशी संवाद साधत ही मोहिम तिने सुरु केली.
शिवानी म्हणते, “पर्यावरणाचं संतुलन ढासळलेलं आहे. वृक्षारोपण होतेय मात्र, वृक्षसंवर्धनही महत्त्वाचं आहे. त्यामुळे सकारात्मक संदेश देत विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व संवर्धनाच्या चळवळीत सहभागी करून घेणार आहे.”
चंपावती विद्यालयात मुख्याध्यापक जे.बी.कुलकर्णी, शिक्षक रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वृक्षसंवर्धनाची गरज याविषयी तिने विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी एक रोपटेही लावण्यात आले. टप्प्या टप्प्याने तिने आतापर्यंत बीड शहर परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.
‘वृक्ष संवर्धन : एक संदेश, जागर अभियान २०१८’चा शुभारंभ करण्यापूर्वी शिवानीने शाळा व सारडी नगरीतील मित्रमैत्रिणींना एकत्र करत ‘बाल हरित सेने’ची स्थापना केली व वृक्षारोपण केले.
- अनंत वैद्य.

No comments:

Post a Comment