Monday 3 September 2018

‘शोधिनी' राखी

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमधली गणेशगाव, वेळुंजे,ब्राह्मणवाडी, हिरडे आणि रोहिले ही पाच गावं. या गावातल्या १० वी ते १२ वीत शिकणाऱ्या २५ मुली. आदिवासी कुटुंबातल्या. 
मुलींना पुढे शिकायचंय. त्यासाठी लागणाऱ्या पैशाची सोयही त्यांनाच करायचीय. रोजगारासाठी मजुरीशिवाय पर्याय नाही. शाळा किंवा महाविद्याालयाला दांडी मारली तरी मजुरीचं काम मिळेल याची शाश्वती नाही. 
कमी खर्चात काही उद्योग सुरू करता येईल का? यावर विचार सुरू असताना रक्षाबंधन डोळ्यासमोर ठेवून राख्या तयार करण्याचं मुलींनी ठरवलं. कधी खाऊसाठी म्हणून तर कधी वाढदिवसाला, रक्षाबंधन, भाऊबीजेच्या ओवाळणीत मिळालेले पैसे, हे मुलींजवळचं भांडवल.

मुलींना साथ मिळाली, नाशिकमधल्या अभिव्यक्ती मिडीया फॉर डेव्हलपमेंट या संस्थेची. ग्रामीण भागातल्या किशोरवयीन मुलींच्या शिक्षण, आरोग्य, सक्षमीकरण या विषयांवर संस्था काम करत आहे. राखी बनविण्यासाठी मॅक्रामचे धागे, मणी, रंगीत लेस असं साहित्य, आर्थिक साहाय्य संस्थेनं पुरवलं. संस्थेच्या 'शोधिनी' प्रकल्पातंर्गत काम सुरू झाल्यानं राख्यांचं नामकरण केलं ‘शोधिनी’. अभ्यास आणि शाळा सांभाळून आधी ७० राख्या मुलींनी केल्या. संस्थेनं मित्रपरिवारात त्याची विक्री केली. राख्यांची सुबकता पाहून आणखी मागणी आली. या राख्यांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून आणखी २५० राख्या मुलींनी तयार केल्या. या पैशातून वह्या, पुस्तकं, बसप्रवासाचा खर्च निघू शकतो असं मुली सांगतात. पुढल्या काळातही सण-उत्सवानुसार लहानमोठे उद्योग करण्याचं मुलींनी ठरवलं आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासीबहुल दिंडोरी, त्र्यंबकेश्वर परिसरातल्या शाळेत जाणार्‍या १०० किशोरवयीन मुलींची निवड संस्थेनं संशोधनासाठी केली आहे.
-प्राची उन्मेष.

No comments:

Post a Comment