Friday 7 September 2018

शहिदांचे स्मारक


१३ जानेवारी २०१८ रोजी धुळे जिल्ह्यातील खलाणे गावातील योगेश मुरलीधर भदाणे देशाच्या सीमेवर झालेल्या गोळीबारात शहीद झाले. त्यांच्या भव्य स्मारकाचं काम गावकऱ्यांनी हाती घेतलं आहे. योगेश याना शहीद होऊन सात महिने झाले आहेत.
योगेश, घरात एकुलते एक. त्यांच्या जाण्याने भदाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आता, वृद्ध आई वडिलांचा सांभाळ कोण करणार, हा मोठा प्रश्न होता. मात्र खलाणे गावातील ग्रामस्थांनी आईबापांना मुलाची उणीव भासू दिली नाही. संपूर्ण गाव त्यांचा सांभाळ करत असल्याचं योगेशच्या आई मंदाबाई सांगतात.
खलाणे गावातल्या ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत शहीद योगेश भदाणे यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम हाती घेतले आहे. विशेष म्हणजे, हे काम संपूर्ण लोकवर्गणीतून केले जात आहे. गावातील शाळेला शहीद योगेश भदाणे यांचं नाव देण्यात आलं आहे.
गावाचे सरपंच भटू वाघ म्हणाले, "भदाणे परिवाराच्या सुख दुःखात ग्रामस्थ एकरूप झाले आहेत. शहीद योगेश हा एकुलता एक मुलगा भदाणे परिवाराने देशासाठी दिला आहे, याची पुरेपूर जाण गावाने ठेवली आहे". शहिदांप्रती सन्मान आणि सद्भाव असावा. येणाऱ्या पिढ्यांनी योगेशच्या जीवनापासून देशसेवेची प्रेरणा घ्यावी, असं खलाणे ग्रामस्थांना वाटतं. त्याचसाठी ही शहीद योगेशच्या स्मारकाची उभारणी. 

- कावेरी परदेशी.

No comments:

Post a Comment