Monday 17 September 2018

माझं बापपण हे दुसरं बालपण होतंय...


मी एक दिवस बाबांना विचारलं, " बाबा, मी जन्मलो तेव्हा तुम्हांला आनंद झाला होता का हो?"
"हो रे," गंभीर चेहरा करत बाबा म्हणाले, "नंतर तुला पाहिलं आणि मी तुझ्या आईला म्हणालो होतो, त्याची आठवण झाली."
"काय ?"
"मी म्हणालो होतो की, यापेक्षा आपण एक चिंपांझी पाळूया. पण तुझी आई ऐकते का कधी?" बाबा करवादून म्हणाले. मला हे बापजन्मी सुचलं नसतं. पण हे डोक्यात आलं ते माओ, माझा ज्येष्ठ पुत्र यानं हा प्रश्न विचारला तेव्हा.
"अरे काय सांगू तुला, भलताच आनंद झाला होता मला."
"का हो बाबा?"
"घरात माझ्यापेक्षा लहान असलेलं कुणीतरी आलं, म्हणून मला आनंद झाला रे."
मी माझ्या आईबाबांचा एकमेव मुलगा असल्यानं मला थोरल्याच्या वाटणीचं जबाबदारीनं वागणं आणि धाकल्याच्या वाटणीचं मार खाणं, अशी दुहेरी जबाबदारी बजावावी लागायची. माओ जन्मल्यापासून माझं धाकटेपण संपलं एकदाचं. आणि आईही 'एका पोराचा बाप झालाय, तरी काडीची अक्कल नाही मेल्याला!' असा उद्धार येताजाता करू लागली.
बालपण गेलं तितक्याच सुखात आता बापपण जातंय. आठेक महिन्यांचा असताना माओ बोलायला शिकला. दीड वर्षांचा झाल्यावर त्याला पूर्ण वाक्य बोलता येऊ लागलं. अडीच वर्षांचा असताना तो
'पुलेपुले चाले माजा घोला,
बगत बशतो बाबा माजा वेला' - अशा स्वयंस्फूर्त कविता करू लागला. साडेतीन वर्षांचा झाला तेव्हा आम्ही त्याला कसंबसं गप्प बसायला शिकवू शकलो होतो. अशा या पोराचा बाप असणं म्हणजे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंगच जणू! फाटक्या पिशवीतून गहू सांडावे, तसे या पोरट्याच्या डोक्यातून प्रश्न पडत असतात. "तेवीस अठ्ठे किती?" हा प्रश्न कुण्या पोरानं बापाला विचारलाय कधी? आमच्या लेकरानं मला विचारलाय. मीही बींच्या कवितेतल्या गरीब बापासारखं (कॅल्क्युलेटरवर आकडेमोड करून) उत्तर दिलं होतं.
शाळेत जायला लागल्यापासून तर प्रश्नांच्या जोडीला तुलनाही सुरु झालीय. 'अनिशचे बाबा त्याला सोडायला कारमधून येतात, तुम्ही का येत नाही?' (आता अनिशच्या बापाचं ऑफीसमध्ये लफडं आहे, हेही याला एकदा सांगावं का?) इथंपासून 'शर्मिष्ठाची मॉम शॉर्ट्समध्ये जॉगिंगला जाते, तेव्हा तुम्ही पायजम्यात दूध आणायला का जाता?' इथपर्यंतचे प्रश्न असतात. 'बावळटासारखं तोंड उघडं ठेवून बसू नका!' हे बायकोचं वाक्यही तो शिकलाय. आधीच क्वचित तोंड उघडणारा मी गरीब बाप, अशानं मुकाच व्हायचा. टीव्हीवर क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, सिनेमा यापैकी काहीही चालू असलं की, मी बिचारा मान खाली (मोबाईलमध्ये) घालून बसतो - न जाणो पुढचा प्रश्न सप्पकन यायचा. फुटबॉलमध्ये ब्लॅकबेल्ट का नसतात, टेनिसमधला लव्ह कुणाचं कुणाशी असतं, क्रिकेट हाफचड्डी घालून का खेळत नाहीत... वगैरे सोपे प्रश्न ठीकायत. पण सिनेमा सुरु असला तर प्रश्न कुठल्या विषयावरून येईल याचा अजिबात भरवसा नाही. (त्यात हल्लीचे बालपटही फक्त प्रौढांसाठी असणारे वाटतात.) परवा सिनेमाआधी धुम्रपानाची जाहिरात बघून "परवा संध्याकाळी हरीभाऊंच्या टपरीमागं काय करत होतात हो?" असा सवाल केलेला माओनं.
हे प्रश्न विचारणं, तुलना करणं तसंही दुर्लक्ष केल्यानं चालून जातं. पण आपल्या बापाला काडीची अक्कल नाही, अशी दृढ समजूत आजी-आजोबा आणि आईनं त्याच्या इवल्यश्या डोक्यावर कोरलीय. त्याला कशाचीच जोड नाही. प्रगतीपुस्तकावर (ह्याला प्रोग्रेस रिपोर्ट म्हणतात- इति माओ) सही करायला मी शाळेत गेलो, तेव्हा मला लिहितावाचता येतं का, अशा नजरेनं हे कार्टं बघत होतं. सही करून होताच थंडपणे 'चुकीच्या कॉलममध्ये सही केलीत बाबा..' असं म्हणाला. शाळेतल्या बाईनंही 'पटलं रे बाबा' अशा अर्थानं त्याच्याकडं बघत मान हलवली.
माओ एकटा असतानाचा बापपणाचा आनंद द्विगुणित झाला, कनिष्ठ चिरंजीव- मिष्का याच्या आगमनानं. त्याची तर, मी त्याचा छोटा भाऊ आहे अशीच समजूत आहे. मला बळजबरीनं अंघोळ घालणं, कपडे घालणं, (उलट्या) चपला घालणं अशी कामं तो मोठ्या भावाच्या भूमिकेत जाऊन करत असतो. बाप म्हणजे आपला खेळगडी (आई घरगडी समजते, ते वेगळं!) असा याचा ठाम समज असल्यानं अल्टामिरा गुहेतल्या अज्ञात चित्रकाराप्रमाणं माझ्या अंगाला कॅनव्हास मानून त्याची चित्रकला बिनदिक्कत सुरु असते. एका दुपारी झोपेतून उठल्यावर मिशीची एक बाजू पिवळी आणि दुसरी निळी दिसल्यावर मी चांगलाच हादरलो होतो. आईला मात्र, लेकराला रंगसंगतीचं ज्ञान चांगलंय याचंच कौतुक!
मनुष्याचं वृद्धत्व हे दुसरं शैशव असं म्हटलं जातं. माझं बापपण हे दुसरं बालपण होतंय, असं हल्ली दिसू लागलंय. परवा एका सिनेमात हिरो-हिरॉईन लगट करू लागले तेव्हा माओ चक्क "बाबा, असले चावट प्रसंग काय पाहताय बावळटासारखे?" असं ओरडला, आणि मिष्का तर... गादी ओली कुणी केली असं विचारल्यावर बेडरपणे माझ्याकडं बोट दाखवून, ‘बाबा’ असं म्हणाला. हे असंच चालू राहिलं, तर दोन्ही पोरं मला पाळण्यात घालून झोके देतील तो दिवस दूर नाही.
बाबाचं मनोगत: ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment